भक्ती चपळगांवकर
‘घोड्याने माझ्यावर शी केली तर?’ ती रडवेल्या स्वरात विचारते, ‘मग, आपण धुवून टाकू.’ ‘घोड्याने मला खाली पाडले तर?’ तिचा पुढचा रडवेला प्रश्न. इथे माझी पंचाईत होते. ‘उठून उभी रहा’ असे उत्तर तयार असते पण, नंतरची अश्रूंची नदी परवडणारी नसते, मग, मी म्हणते, ‘अगं असं काही होणार नाही, गेल्यावेळी पेटिंग झूला आली होतीस, तेव्हा असं काही बघितलेस का?’ एव्हाना तिच्या लक्षात आले असते, आपली आई काही आपल्याला सोडणार नाही. मग, आम्ही दोघी काऊंटरवर जाऊन हेल्मेट घेतो, पैसे भरल्याची नोंद असतेच, तिच्या नावाची पावती मिळते, तिच्या मापाचे हेल्मेट मिळते. एका झाडाच्या पारावर एकेक मूल चढत असते आणि त्याच्या नावाने नोंद केलेल्या घोड्यावर चढत असते. मी जरा मागे थांबून लेकीकडे बघत असते. डोळ्यात पाणी, हरवलेली नजर आणि उत्सुकता यांची सरमिसळ झालेली असते. ल्युसी…. घोडीच्या नावाचा पुकारा होतो. ल्युसी येते. शरयू…. लेकीच्या नावाचा पुकारा होतो. ही आपली पावती दाखवत पुढे होते. घोड्यावर कसं चढायचं हे तिचा कोच सांगतो, इकडे माझी घालमेल सुरू असते, मी पुढे होते आणि तिला एक धक्का देऊन वर चढायला मदत करते. (दुसऱ्या दिवशीपासून मला इथे प्रवेश नाकारण्यात येतो.) घोड्यावर बसून लेक प्रशिक्षणासाठी जवळच्या एका मैदानावर रवाना होते.
जापालूप या अश्वारोहण प्रशिक्षण केंद्रात जाण्याच्या पहिल्या दिवसाची अशी ही सुरुवात.
कोविडची लाट ओसरलेली आहे पण, लस नसल्याने लहान मुलांना फार गर्दीच्या ठिकाणी, शाळेला पाठवणे अजून काही दिवस तरी शक्य होणार नाही. पण, मुलांनी घराबाहेर पडायला हवे. घरात बसून आलेली मरगळ, बाहेरच्या अनिश्चित वातावरणाची वाटू लागलेली भीती झटकायला हवी. आठ वर्षांची लेक गेली दीड दोन वर्षे घरात बसून आहे, ही साथ संपेल तेव्हा ती शाळेत जाईल पण, तोपर्यंत बाहेरच्या जगाचा संपर्क होणे आवश्यक आहे. मला तिला अशा ठिकाणी घेऊन जायचे होते, जिथे मुलांना प्राणी, पक्षी निसर्गाच्या संगतीत काही तरी नवे शिकता येईल. मग, आठवलं लॉकडाऊनच्या पूर्वी मी तिला जापालूप नावाच्या हॉर्सफार्मवर प्राणी,पक्षी दाखवायला आणले होते, इथे प्रामुख्याने हॉर्स रायडिंग शिकवतात.
पहिल्यांदाच अश्वारोहण शिकत असल्याने तिला एकसलग सराव करता यावा म्हणून दहा बारा दिवस सोमाटण्याच्या घरी येऊन राहिलो. या सगळ्या काळात एक नाव सतत कानावर पडत होते, रोहन. रोहन मोरे आणि त्याची आई लोरेन यांनी मिळून ही प्रशिक्षण संस्था सुरू केली. रोहनने जापालूपचा इतिहास थोडक्यात सांगितला. खरं तर, त्याच्या आजोबांना घोड्यांच्या शर्यतीचा नाद आणि घोड्यांवर निरतिशय प्रेम. १९७२-७३ च्या सुमारास त्यांनी एकदा मोठी रेस जिंकली त्यात त्यांना सव्वा लाख रुपये मिळाले. त्यांनी घोषणा केली, आजपासून मी पुन्हा रेसवर पैसे लावणार नाही, मिळालेल्या पैशांत जागा विकत घेणार आणि घोड्यांची पैदास करणार. जे काम रोहनच्या वडिलांनी आणि नंतर रोहनने सुद्धा केले. मात्र त्याचे स्वप्न वेगळे होते, आणि त्यातून जापालूप उभे राहिले. इथे आज एकाहत्तर घोडे आहेत आणि पश्चिम भारतातील सर्वात मोठे अश्वारोहण प्रशिक्षण केंद्र म्हणून याचा लौकिक आहे.
मी पहावे उमलताना..
‘माझे मूल’ नाव असलेली ती इंग्रती कविता, त्याचा हा भावानुवाद.
माझे मूल
माझे मूल म्हणजे माझ्या चित्रातले रंग नाहीत
नाही ते एखादा हिरा ज्याला मला पैलू पाडायचे आहेत
माझे मूल नाही मला मिळालेला चषक, ज्याचा विजयोत्सव मला साजरा करायचा आहे
नाही ते, मला मिळालेला बिल्ला, जो, मला जगाला दाखवायचा आहे
ना तर, ते माझा अभिमान आहे, ज्याला मी जपायला हवे, ना तर, ते एखादी परिकथा आहे.
नाही ते माझे प्रतिबिंब किंवा माझा वारसा, माझे मूल नाही माझे पपेट किंवा प्रोजेक्ट
ना मी त्याचा सेनापती आणि ते सैनिक, माझे मूल इथे आले आहे पडायला, धडपडायला
भानगडीत अडकायला… बाहेर पडायला
माझे मूल इथे आले आहे प्रयत्न करायला, खाली पडायला, पुन्हा उभे राहायला
माझे मूल इथे आले आहे अज्ञाताच्या शोधात
स्वतः शिकायला, स्वतःचा इतिहास घडवायला
माझे मूल इथे स्वतःचे निर्णय स्वतः घेईल, कधी चुकेल, त्याचे परिणामही भोगेल
पालक म्हणून ….
माझ्या मुलाला सक्षम बनवणे माझे काम आहे.
माझा अहंकार बाजूला ठेवून त्याला साथ देणे माझे काम आहे
त्याला लागणारा मार्गदर्शक बनणे माझे काम आहे
पण त्याच्या विफलतेने विकल होणे माझे काम नाही
त्याने विचार करावा
मी त्याला उमलताना बघावे…..
ही कविता वाचल्यावर मला वाटले, कदाचित हे पंधरा दिवस लेक इतकी आनंदी राहील की, तिला पुन्हा इथे यावेसे वाटेल, कदाचित नाही, पण, हे पंधरा दिवस तरी ती आनंदी राहील. आता मी तिची फक्त मार्गदर्शक बनायचे होते. मग, काही गोष्टी निग्रहाने केल्या. सारखे आज तू काय केलेस सारखे प्रश्न स्वतःहून विचारले नाहीत. ती मनापासून सांगायला लागली. आपण आयुष्यात माथेरान शिवाय कुठेही घोड्यावर बसलो नाहीत, तेही पंधरा वर्षांपूर्वी, हे सतत लक्षात ठेवले आणि ज्या गोष्टींची माहिती नाही त्याबद्दल, तू आज असे करायला हवे होते, तसे कर, अशा प्रकारचे सल्ले दिले नाहीत. आता मी आणि ती भटकायला निघतो, दीड वर्षाच्या घर बंदिवासानंतर ती घराबाहेर पडायला तयार झालेली असते.
(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)
bhalwankarb@gmail.com