Join us  

मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी त्यांच्या रुटीनमध्ये हव्या 4 गोष्टी, पालकांना चिडचिड न करता काय करता येईल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2022 11:49 AM

Parenting Tips : कसं आहे तुमच्या मुलांचं रुटीन? उत्तम विकासासाठी पालकांनी मुलांचं रुटीन सांभाळायला हवं...

ठळक मुद्देसगळ्या गोष्टींवर काम करताना आनंद आणि सकारात्मकता ठेवली तर मुलांचा मेंदू, मन आणि बुद्धी कायमच आनंदी, उत्साही राहील.मुलांची झोप, जेवण, खेळणे या गोष्टी वेळच्या वेळी होत असतील तर त्यांचा जास्त चांगला विकास होतो.

ऋता भिडे 

नम्रता माझ्याकडे तिच्या ५ वर्षाच्या मुलासाठी समुपदेशनासाठी आली. तिला म्हंटल तुला आई म्हणून काय वाटत आहे ते अगदी मोकळेपणाने सांग. 

“ माझा मुलगा अंगद, हुशार आहे, खेळात पण चांगला आहे, पण खूप चिडचिड करतो, त्याला सारखा कंटाळा येतो. शाळा झाली की, घरी आल्यावर थोडं खेळतो, मग परत सारखं कंटाळा आला म्हणत राहतो. (Children Routine) उशिरा जेवतो, रात्री उशिरा झोपतो. तसं आमच्याकडे सगळेच उशिरा झोपतात, पण मी त्याला लवकर झोपवयचा प्रयत्न करते. त्याला खेळायचाच असतं. मग होते चिडचिड. (Parenting Tips)”

सगळ्या गोष्टी नीट ऐकल्यावर माझ्या लक्षात आलं, की अंगदची दिनचर्या चांगली नाही. सकाळी, अर्धवट झोपेत कसबसं उठून शाळेत जातो, तिथे अभ्यास, खेळ झाल्यावर तो साहजिकच दमतो, शाळा झाली की क्लास असतो, मग खेळायला परत कमी वेळ, घरी सगळे आपल्या आपल्या कामात बिझी असतात. त्यामुळे अंगदशी कोणाचा फारसा संवाद होत नाही. अंगदला बोलायचं असतं, सांगायचं असतं, नवीन गोष्टी जाणून घ्यायच्या असतात, पण घरच्यांना या सगळ्यासाठी फक्त वीकएंडलाच वेळ, त्यातही कुठे बाहेर जायचं असलं की तोही वेळ नाही.  

पालकांनी मुलांशी बोलताना टाळायलाच हवीत अशी 5 वाक्ये, मुलांच्या मनावर होतो परिणाम

तिचे सगळे ऐकून घेतल्यावर मी नम्रताला काही गोष्टी प्रामुख्याने सांगतिल्या...

१. दिनचर्या ठरवणे - शाळा असो किंवा सुट्टी असो, मुलांची दिनचर्या ठरलेली असलेली पाहिजे. मुलांना दिनचर्या पाळायला आवडते. थोडंसं गोड बोलून, प्रेमानी सांगितलं आणि मुलं लहान असल्यापासून त्यांना काही सवयी लावल्या तर ते नक्कीच त्या गोष्टी कटकट न करता फॉलो करतात.  

२. झोपेचे गणित - मुलांच्या वयानुसार त्यांच्या मेंदूला हवी तेवढी झोप मिळाली तर मुलं शांत आणि एकाग्र होण्यास मदत होते. रात्री वेळेत झोपले, तर सकाळी वेळेत उठायला मुलांना त्रास होणार नाही. प्रत्येक घरात झोपायची वेळ वेगवेगळी असते, त्यामुळे ठराविक वेळेलाच झोपावे असे सांगणे चुकीचे ठरेल. पण लहान मूल घरात असताना घरातील सगळ्यांनीच लवकर झोपून लवकर उठायला हवे. त्यामुळे सगळ्यांचेच आरोग्य चांगले राहते आणि सकाळी लवकर उठण्यासाठी गोंधळ होत नाही. चांगली झोप ही मेंदूची प्राथमिक गरज आहे. झोप आणि लहान मुलांची एकाग्रता ह्याचा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे मुलांनी शांत आणि वेळेत झोपणं गरजेचं आहे. 

(Image : Google)

३. खाण्यापिण्याच्या वेळा - लहान मुलांचा आहार कसा असावा आणि जेवताना काय काय खायला हवं हे साधारणपणे आपल्याला माहित असतं. डाळी, भाज्या, सर्व प्रकारची धान्ये असा चौरस आहार घेतला तरच लहान मुलांची चांगली वाढ होण्यास मदत होते. ठराविक वेळेत, योग्य प्रमाणात आणि ताजा आहार हा मुलांची शारीरिक, बोद्धिक वाढ होण्यास आवश्यक असतो. मुलांच्या आहारात जंक फूड, अतिरिक्त साखर- मीठ असलेले पदार्थ तसेच प्रिझर्व्हेटीव्ह असलेले पदार्थ टाळायला हवेत. 

४. मुलांसाठी वेळ - पालक म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या निभावत असताना आपण मुलांशी सकारात्मक संवाद साधत आहोत का, हे प्रत्येकानी तपासून पाहणं तेवढंच गरजेचं आहे. मुलांसाठी दिवसातला काही वेळ काढून त्यांचं म्हणणं ऐकलं, संवाद साधला तर त्यांची चिडचिड कमी होईल. वरच्या सगळ्या गोष्टींवर काम करताना आनंद आणि सकारात्मकता ठेवली तर मुलांचा मेंदू, मन आणि बुद्धी कायमच आनंदी, उत्साही राहील. मुलांना आपला वेळ आणि सोबत हवी असते हे पालकांनी प्रामुख्याने लक्षात ठेवायला हवे. 

(लेखिका समुपदेशक आणि मेंदू व भाषाविकासतज्ज्ञ आहे.)

rhutajbhide@gmail.com

 

टॅग्स :पालकत्वलहान मुलंलाइफस्टाइल