Join us  

शाळेत-पाळणाघरात गुणी असतात, घरी आले की चिडचिड - असं मुलं का वागतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2023 1:00 PM

Parenting Tips about Children's Behavior at Home After Coming from School : आता नीट असणारं आपलं मूल एकाएकी असं का वागायला लागलं असा प्रश्न आपल्याला पडतो.

शाळा सुरू होऊन आता जवळपास १५ दिवस झाले. नव्याने शाळेत जाणारे आणि पुढच्या वर्गात नवे शिक्षक, नवे मित्रमैत्रीणी यांच्यासोबत शाळेत जाणारे अशी सगळीच मुले एव्हाना काही प्रमाणात शाळेत रुळली असतील, काही अजून रुळत असतील. शाळा, पाळणाघर याठिकाणी जाणारी मुलं सुरुवातीला जरी कुरबुर करत असतील तरी नंतर मात्र हीच मुलं त्याठिकाणी अतिशय छान वागतात. सोबत दिलेला डबा नीट संपवणे, सगळ्या अॅक्टीव्हिटीजमध्ये चांगल्या पद्धतीने सहभागी होणे, आपल्या वस्तू नीट ठेवणे असं सगळं करतात. पण घरी आले की हिच मुलं मात्र एकाएकी विचित्र वागायला लागतात. शाळेत असणारं गुणी बाळ अचानक हट्टी आणि वात्रट बाळ होतं. मग ही मुलं लहान सहान गोष्टीवरुन रडणे, हातपाय आपटणे, एखाद्या गोष्टीसाठी सतत खूप मागे लागणे असं करायला लागतात. अशावेळी आता नीट असणारं आपलं मूल एकाएकी असं का वागायला लागलं असा प्रश्न आपल्याला पडतो (Parenting Tips about Children's Behavior at Home After Coming from School).  

याच प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न वैशाली बीके यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन केला आहे. काही वर्षांपासून पॅरेंटींग विषयात काम करत असलेल्या वैशाली यांचे इन्स्टाग्रामवर अम्मा टुडे नावाचे अकाऊंट आहे. त्या माध्यमातून त्या पालकांशी विविध विषयांवर संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतात. आताही मुलं घरी आली की चिडचिड किंवा रडरड का करतात, त्यांना असं करावसं का वाटतं याबाबत त्यांनी अतिशय नेमकेपणाने माहिती दिली आहे. त्यामुळे पालक म्हणून आपला बराचसा ताण कमी होण्यास मदत होते. पाहूयात त्या नेमकं काय सांगतात आणि मुलांच्या अशा वागण्यावर पालकांनी कशा पद्धतीने प्रतिक्रिया दिल्या तर मुलंही लवकर रिलॅक्स होण्यास मदत होईल. 

१. घरी आले की मुलं अचानक रडायला, ओरडायला आणि खूप दंगा करायला सुरुवात करतात. काहीवेळा ते हात उगारणे, चुकीचे शब्द वापरणे असेही करतात. साधारण ५ ते ६ वर्षापर्यंतची मुलं असं सगळं करतात. पण हेच जर मूल थोडं मोठं असेल तर ते आपल्याशी अतिशय उद्धटपणे बोलणे, विचित्र पद्धतीचा अॅटीट्यूड कॅरी करणे असे काही ना काही करतात. हे सगळे अतिशय नॉर्मल आहे हे आपण सगळ्यात आधी समजून घ्यायला हवे. 

२. संशोधन असं सांगतं की शाळा, पाळणाघर अशा काहीशा कॉम्प्लेक्स वातावरणात मुलं असतात तेव्हा मुलांची बहुतांश एनर्जी मानसिकदृष्ट्या स्वत:ला स्थिर ठेवण्यात, भावनिकदृष्ट्या सांभाळण्यात आणि शारीरिक संयम राखण्यात जाते. 

३. शाळेत किंवा पाळणाघरात त्यांची एनर्जी चांगलं वागणं, सगळे टास्क पूर्ण करणे, एका जागी जास्त वेळ बसणे, खूप राग आलेला असतानाही हसणे, आपला नंबर येण्यासाठी थांबून राहणे, गोष्टी एकमेकांशी शेअर करणे अशा सगळ्या गोष्टींमध्ये जात असते. त्यामुळे एकप्रकारे ते या सगळ्या गोष्टींसाठी स्वत:ला तयार करण्याचा प्रयत्न करत असतात. 

४. मात्र जेव्हा ते घरी येतात तेव्हा ही आपल्यासाठी अतिशय सुरक्षित जागा आहे हे त्यांना माहित असते. आपल्याला इथे कोणीही जज करणार नाही याची त्यांना कल्पना असते. त्यामुळे इतका वेळ दाबून ठेवलेल्या भावना, मनाची झालेली कुचंबणा बाहेर काढण्याची वेळ असते. 

अशावेळी पालकांनी नेमकं काय करायला हवं? 

आपण मुलांना शाळेतून किंवा पाळणाघरातून आल्यावर आज त्यांनी काय केलं ते विचारतो. मात्र अशावेळी त्यांना मोकळं सोडणं आणि कोणतेही प्रश्न न विचारणं अधिक सोयीचं असतं. त्यावेळी त्यांना स्पेस देणं, त्यांचा वेळ देणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. काही वेळ गेला की त्यांच्या आत असलेल्या सगळ्या गोष्टी हळूहळू बाहेर येतील आणि तेव्हा ते स्वत:हून आपल्याला शाळेत किंवा पाळणाघरात काय झालं ते सगळं आनंदाने सांगू शकतील. मात्र आल्यावर लगेच आपण त्यांना एखादी गोष्ट करण्यास सांगितली तर मात्र ते त्यांना ताणाचं किंवा ओझे वाटू शकते. 

टॅग्स :पालकत्वलहान मुलं