लहान मुल घरात असलं की घरात हसतं-खेळतं वातावरण असते. पण हेच ते लहान मूल जर आजारी पडले तर संपूर्ण घरच शांत होऊन जाते. अनेकदा मुलं सारखी आजारी पडतात अशी तक्रार पालक डॉक्टरांकडे बहुतांशवेळा करताना दिसतात. बऱ्याचदा आपलं मूल सारखं आजारी पडतं म्हणजे त्याची प्रतिकारशक्ती चांगली नाही का? आपण त्याची नीट काळजी घेत नाही का असे प्रश्न पालकांना पडतात आणि यामुळे ते आपलंच मन खात राहतात. आता मूल मोठं होईपर्यंत म्हणजेच ५ वर्षाचे होईपर्यंत किती वेळा आजारी पडते आणि त्याला कोणकोणत्या आरोग्याच्या समस्या होऊ शकतात याविषयी आपल्याला फारशी विस्ताराने माहिती असेलच असे नाही. म्हणूनच डॉ. हायफाय म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. सय्यद मुजाहिद हुसैन याबाबत महत्त्वाची माहिती शेअर करतात (Parenting Tips About Children’s Health).
डॉ. हुसैन यांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक लहान मुलाला वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत काही इन्फेक्शन्स नक्की होतात. प्रतिकारशक्ती तयार होण्यासाठी शरीर तयार होत असल्याने ही इन्फेक्शन्स होणे सामान्य असते.
कोणत्या वयात मूल किती वेळा आजारी पडते...
१. पहिल्या वर्षात मुलांना साधारणपणे ८ ते १० वेळा वेगवेगळ्या प्रकारचे संसर्ग होतात. यामध्ये साधारणपणे सर्दी, ताप, कफ, जुलाब, यांसारख्या गोष्टींचा समावेश असतो.
२. तर वयाच्या दुसऱ्या वर्षापासून ते तिसऱ्या वर्षापर्यंत मूल साधारणपणे ६ ते ८ वेळा आजारी पडते.
३. साधारण ३ ते ६ या वर्षात ही मुले ३ ते ५ वेळा म्हणजे वर्षातून १ ते २ वेळाच आजारी पडतात. याचाच अर्थ मूल जसे मोठे होत जाते तसतशी त्याची प्रतिकारशक्ती वाढते आणि आजारी पडण्याचे प्रमाण आपोआपच कमी होत जाते.
बहुतांशवेळा औषधोपचारांची आवश्यकताच नसते, कारण....
साधारपणे मुलाला ताप आला किंवा जुलाब झाले तर पालक आणि घरातील इतर मंडळी घाबरुन जातात. अशावेळी घाईने डॉक्टरांकडे नेऊन उपचार घेतले जातात. मात्र प्रत्यक्षात त्याची गरज असतेच असे नाही. तर लक्षणे पाहून काही वेळा तात्पुरते उपचार केले जातात आणि काही दिवसांतच या समस्या दूर होण्यास मदत होते. मात्र एकूण लहान मुलांपैकी केवळ ५ ते १० टक्के जणांनाच डेंगी, मलेरीया यांसारखे मोठे संसर्ग होतात. त्यावेळी औषधोपचार आणि काही वेळा रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासते. मात्र मूल आजारी पडल्यावर पालकांनी पॅनिक होता कामा नये. तसेच एका डॉक्टरकडून दुसऱ्या डॉक्टरकडे फिरत बसण्याचीही आवश्यकता नसते. अँटीबायोटीक्स, ब्लड टेस्ट यांसारख्या गोष्टी आवश्यकता असेल तर डॉक्टर सांगतातच नाहीतर आजारी असलेले मूल आपले आपणच बरे होते. मात्र काही वेगळी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा हेही तितकेच खरे.