एक मूल असणे ही सध्या अतिशय सामान्य गोष्ट झाली आहे. पालकांचे करिअर, वाढती महागाई आणि कुटुंबव्यवस्थेत झालेले बदल यांमुळे बहुतांश जोडपी एक मूल असण्याचाच विचार करतात. काळ बदलतो तसे समाजव्यवस्थेत बदल होत जातो त्यातीलच हा एक महत्त्वाचा भाग आहे. एकटे मूल असले की त्याच्या वाढीवर परीणाम होतो. त्याला शेअरींग-केअरींगची सवय लागत नाही, मोठेपणीही ते एकटे पडते अशा सगळ्या गोष्टी आजुबाजूला ऐकत असल्याने काही पालकांना आपल्या मुलाचे भविष्यात काय होणार अशा चिंताही सतावण्याची शक्यता असते (Parenting Tips about having Single Child).
मात्र व्यावहारीकदृष्ट्या २ मुलांचा सांभाळ करणे शक्य नसल्याने किंवा जोडीदारांपैकी एकाची दुसऱ्या मुलासाठी तयारी नसल्याने एकच मूल होऊ देण्याचा निर्णय नक्की होतो. एकटे असल्याचा मुलाच्या वाढीत काही अडथळे येतात का, त्याचा मुलांच्या मानसिकतेवर आणि भावनिकतेवर काय परीणाम होतो अशा प्रश्नांचा उहापोह बरेचदा केला जातो. नुकताच याबाबत एक अभ्यास प्रकाशित झाला असून प्रसिद्ध समुपदेशक प्रिती वैष्णवी यांनी याबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी शेअर केल्या आहेत. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून त्या या गोष्टींची माहिती देतात.
काय सांगतो अभ्यास?
मुलांच्या विकासात त्यांना बहिण-भाऊ असणे किंवा नसणे याचा फारसा फरक पडत नाही. मुलांची निर्णयक्षमता, सामाजिक भान किंवा त्यांचे पर्सनल कॅरेक्टरवर बहिण-भाऊ असण्याचा विशेष परीणाम होत नाही असे या अभ्यासात सांगण्यात आले आहे. पण मुलांच्या वाढीवर परीणाम करणाऱ्या २ महत्त्वाच्या गोष्टी असतात, पालकांनी त्या समजून घेणे अतिशय महत्त्वाचे असते हे लक्षात घ्यायला हवे.
१. पालकांची सामाजिक आणि अर्थिक स्थिती
२. पालकांचे एकमेकांशी असलेले संबंध
पालकांनी या दोन्ही गोष्टींमध्ये जास्तीत जास्त सुधारणा करणे मुलांच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचे असते. मात्र आपल्याला किती मुले हवीत हा सर्वस्वी पालकांचा प्रश्न असून आपली परिस्थिती लक्षात घेऊन त्यानुसार योग्य ती पाऊले उचलायला हवीत. पण वरच्या २ गोष्टी सुधारण्याकडे पालकांनी जास्तीत जास्त भर द्यायला हवा.