आपलं मूल इतर मुलांपेक्षा कमी उंचीचं आहे अशी चिंता काही पालकांना सतावत असते. मुलांची उंची आणि जाडी चांगली वाढावी असं पालक म्हणून आपल्याला वाटणं अगदी स्वाभाविक आहे. पण त्यामागे बऱ्याच गोष्टी असतात हे लक्षात घेऊन विनाकारण त्यासाठी अट्टाहास करणे आणि आपले मूल किती बुटके आहे अशी भावना मनात बाळगणे किंवा तसे सतत बोलून दाखवणे योग्य नाही. कोणतीही व्यक्ती उंच असेल की ती छान दिसते आणि तिच्या व्यक्तिमत्त्वाची एक वेगळीच छाप पडते हे नक्की. व्यक्तीची उंची एका ठराविक वयापर्यंत वाढते आणि मग ही वाढ थांबते. लहान मुलांची उंची वाढावी यासाठी काही पालक खूप अटोकाट प्रयत्न करताना दिसतात. मात्र तरीही मुलांची उंची अपेक्षेप्रमाणे वाढली नाही की हे पालक निराश होतात. बच्चो की डॉक्टर म्हणून इन्स्टाग्रामवर पेज असलेल्या डॉ. माधवी भारद्वाज मुलांच्या उंचीबाबतच्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्या फॉलोअर्सशी शेअर करतात. मुलांच्या उंचीबाबत ज्या पालकांना सतत काळजी वाटते अशा पालकांना त्या काही गोष्टी या पोस्टमधून समजावून सांगतात (Parenting Tips about Hight of Child Important Facts).
पालकांनी लक्षात घ्यायला हव्यात या गोष्टी...
१. जेनेटीक्स - अनुवंशिकता
मुलगा किंवा मुलीच्या आई वडीलांची उंची किती आहे यानुसार मुलांची उंची किती असणार हे ठरते. त्यामुळे पालकांनी आपल्या उंचीवरुन मुलांच्या उंचीचा अंदाज बांधावा किंवा त्यानुसारच मुलाची उंची वाढणार आहे हे लक्षात ठेवावे.
२. आहारातून मिळणारे पोषण
उंची वाढण्यासाठी मुलांना आहारातून मिळणारे पोषण अतिशय गरजेचे असते. आहारात प्रोटीन, कॅल्शियम, लोह व्हिटॅमिन डी या गोष्टींची आवश्यकता असते. हे घटक योग्य प्रमाणात मिळत असतील तर मुलांची उंची चांगली वाढण्यास मदत होते. मात्र हे घटक पुसेरे मिळत नसतील तर मात्र त्याचा उंचीवर परीणाम होतो.
३. शारीरिक हालचाली
मुलं जितक्या शारीरिक हालचाली करतील तितक्या त्यांच्या शारीरिक आणि बौद्धिक वाढीसाठी अतिशय गरजेच्या असतात. रांगणे, बसण्याचा उभं राहण्याचा प्रयत्न करणे, चालण्याचा प्रयत्न करणे या सगळ्या हालचाली मुलांच्या योग्य वाढीसाठी अतिशय गरजेच्या असतात. त्यामुळे मूल सतत इकडे तिकडे जाते म्हणून त्याला सतत पाळण्यात किंवा आणखी कशात ठेवणे योग्य नाही तर त्याला जास्तीत जास्त हालचाल करु द्यायला हवी.
उंचीचा साधारण चार्ट
वय उंची
१) जन्मत: ४८ ते ५० सेंमी
२) ६ महिने ६६ सेंमी
३) ९ महिने ७० सेंमी
४) १ वर्ष ७५ सेंमी
५) २ वर्ष ८७ ते ९० सेंमी
साधारणपणे वयाच्या ६ महिन्यानंतर मुलांची ऊर्जा खर्च व्हायला सुरुवात होते आणि त्यांची हालचाल जास्त प्रमाणात वाढल्याने उंची वाढण्यास सुरुवात होते. दिवसाला उंची किती वाढते हे न पाहता महिन्यांमध्ये त्याची किंवा तिची उंची किती वाढते हे पाहायला हवे. प्रत्येक मुलाच्या वाढीचा ग्राफ वेगळा असतो त्यामुळे आपल्या मुलाची इतर मुलांशी तुलना करणे योग्य होणार नाही. तसेच वय वाढत जाते तसे मूल रांगायला लागते, उभे राहायला लागते आणि त्याची एकूण शारीरिक हालचाल, धडपड वाढते. त्यामुळे उंची वेगाने वाढते पण वजन मात्र कमी प्रमाणात वाढते. हे अगदी सामान्य असून पालकांनी याबाबत कोणतीही चिंता करण्याची आवश्यकता नाही.