Join us  

किती प्रश्न विचारतात मुलं, भोचक कार्टी, असा त्रागा करता तुम्ही? मुलांनी प्रश्न विचारणं चांगलं की उद्धटपणा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2023 1:09 PM

Parenting Tips About Kids Asking Questions : मुलांना एवढे प्रश्न का पडतात?, त्यांच्या सगळ्याच प्रश्नाची उत्तरं द्यायची का? याविषयी...

ठळक मुद्देप्रश्न विचारले तर कटकट न वाटता त्यांना त्यांच्या वयाला साजेशी अशी उत्तरं द्यायचा प्रयत्न करुया. तुला सतत किती प्रश्न पडतात, जरा गप्प बस किती प्रश्न विचारतो असं म्हणून त्यांना डावलू नका.

ऋता भिडे 

आपल्या घरी मुलं असतील तर “अरे , शांत बस आता. मला काम करुदेत. मी आता तुझ्या एकपण प्रश्नाचं उत्तर देणार नाही.” असं आपण कधी ना कधी तरी म्हणतोच. मुलांना सतत वेगवेगळे प्रश्न पडत असतात आणि मुलं ते विचारुन आपल्याला कधी कधी भंडावून सोडतात. काही वेळेस पालकांकडे त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तरं नसतात. तर काही वेळा मुलांचे प्रश्न हे त्यांच्या वयाला अनुसरून असतातच असंही नाही (Parenting Tips About Kids Asking Questions). 

पॉल हॅरिस हे हार्वर्ड विद्यापीठातीस मानसशास्त्रज्ञ म्हणतात, की २ ते ४ वर्षात मुलं  जवळपास ४०,००० प्रश्न विचारतात. मुलं बोलायला लागल्यापासून त्यांची जशी शब्दसंपदा वाढत जाते आणि त्यांना ज्या प्रकारे त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणाची जागरूकता येते त्यानुसार मुलं प्रश्न विचारायला लागतात. पण मुलांना एवढे प्रश्न का पडतात?, त्यांच्या सगळ्याच प्रश्नाची उत्तरं द्यायची का? असे प्रश्न काही पालकांना पडतात, त्याविषयीच आज आपण काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

(Image : Google)

मुलं प्रश्न का विचारतात?

१.  निरीक्षण क्षमता - लहान मुलांची निरीक्षण क्षमता खूप चांगली असते. मुलं मोठ्या माणसांना, इतर मुलांना पाहून त्यांचं अनुकरण करत असतात. ह्या दोन्हीमुळे मुलांना प्रश्न पडतात आणि ते प्रश्न मुलं पालकांना किंवा घरातल्या इतर व्यक्तींना विचारतात. 

२.  कुतूहल - मोठ्या माणसांच्या एकूण एक हालचालींकडे लहान मुलांचं अगदी बारकाईने लक्ष असतं. त्यामुळे खूपदा मोठी माणसं जसं बोलतात, चालतात किंवा त्यांच्या इतर लकबी मुलं जशाच्या तशा करताना दिसतात. पण हे अनुकरण करत असताना जर एखाद्या वेळेस काही वेगळेपण झाला, तर मुलांना प्रश्न पडणं साहजिक आहे. कुतुहलामध्ये काकूच्या पोटात बाळ कसं आलं?, आपल्यलाला प्राण्यांसारखी शेपूट का नाही कारण माणूस पण एक प्राणीच आहे ना? वगैरे अनेक प्रश्न मुलांना पडतात. 

(Image : Google)

३. भावनिक आणि बौद्धिक विकास – लहान मुलांचा मेंदू जेव्हा विकसित होत असतो, त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये अनेक विचार येत असतात. हे विचार त्यांना आलेल्या अनुभवांवर अवलंबून असतात. शाळेमध्ये आपला मित्र आज आपल्याशी का खेळाला नाही? असा विचार येऊन त्याचं रूपांतर प्रश्नामध्ये होतं. भावनिक आणि बौद्धिक विकास होत असल्यामुळे मुलांना 'असं का ?' हे 'तसं का?' यांसारखे प्रश्न पडतात. 

४. ज्ञान मिळविण्यासाठी- तुमची मुलं तुम्हाला जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा त्यांना त्या गोष्टीचं ज्ञान, त्या गोष्टीसंदर्भातली माहिती जाणून घ्यायची असते. नवीन गोष्टींची ओळख करून देण्यासाठी मुलांनी प्रश्न विचारणं गरजेचं आहे. 

प्रश्न विचारणं ही आपल्या मुलाची गरज आहे. त्याला त्याच्या वयानुसार उत्तरं द्यायला हवीत. त्यामुळे तुमच्या मुलाची शब्दसंपदा, विचार करण्याची क्षमता, नवीन अनुभव घेण्याची भावनिक क्षमता वाढण्यास मदत होते. त्यामुळे त्यांनी प्रश्न विचारले तर कटकट न वाटता त्यांना त्यांच्या वयाला साजेशी अशी उत्तरं द्यायचा प्रयत्न करुया. तुला सतत किती प्रश्न पडतात, जरा गप्प बस किती प्रश्न विचारतो असं म्हणून त्यांना डावलू नका. यामुळे त्यांचा विकास थांबण्याची शक्यता असते. 

(लेखिका समुपदेशक आणि मेंदू व भाषाविकासतज्ज्ञ आहे.)

rhutajbhide@gmail.com

टॅग्स :पालकत्वलहान मुलं