मुलं काही केल्या ऐकत नाहीत, सतत दंगा मस्ती करत राहतात आणि खूप ओरडायला लावतात. अशी तक्रार बहुतांश पालक कायम करताना दिसतात. मूल लहान असल्याने त्यांना समोर येणारी प्रत्येक गोष्ट एक्सप्लोअर करायची असते. इतकेच नाही तर मुलांना सतत काहीतरी धडपड नवीन काहीतरी करुन पाहायचं असतं. अनेकदा त्यांना इजा होईल किंवा घरात पसारा होईल या कारणापोटी आपण त्यांच्या नावाने सतत ओरडत राहतो. मुलांना लहानपणापासून चांगली शिस्त लागावी, त्यांनी अभ्यास करुन मोठे व्हावे यासाठीही आपला त्रागा होत असतो. मुलं काही केल्या ऐकत नाहीत आणि सतत ओरडायला लावतात असा त्रागा करणारे पालक आपल्या आसपास नेहमीच दिसतात. पण मुलांना दोष देत असताना पालकांचेही वागणे चुकते हे अनेकदा आपल्या लक्षात येत नाही. पाहूया पालकांनी कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यायला हवे (Parenting Tips Avoid 3 Mistakes while growing Child).
१. मुलं काय म्हणतात ते ऐकून न घेणे
अनेकदा आपण मुलं काय म्हणतात ते ऐकून न घेता त्यांना फक्त सुचना देत राहतो. अशामुळे आपले कोणी ऐकून घेत नाही ही भावना बळावते आणि मुलं आपलं न ऐकता जास्त बंडखोरी करतात.
२. इतर मुलांशी त्यांची तुलना करणे
बरेचदा आपल्याही नकळत आपण मुलांसमोर अमुक मुलाने असे केले आणि तुला ते जमत नाही असे म्हणून जातो. अशाप्रकारे इतर मुलांशी आपल्या मुलाची तुलना करणे योग्य नाही. यामुळे मुलांचा आत्मविश्वास नकळत कमी होतो. तेव्हा या गोष्टीकडे पालक म्हणून आपण आवर्जून लक्ष द्यायला हवे.
३. मुलांना ओव्हर प्रोटेक्ट करणे
काही पालक आपल्या मुलाच्या बाबतीत खूप जास्त पझेसिव्ह असतात. अशावेळी ते मुलांना प्रोटेक्ट करत राहतात. इतकेच नाही तर हे पालक आपल्या मुलांच्या सगळ्या समस्या सोडवतात. यामुळे या मुलांमध्ये चिकाटीचा अभाव राहतो आणि ती काही प्रमाणात मागे पडण्याची शक्यता असते. त्यामुळे अशाप्रकारच्या चुका करणे शक्यतो टाळा.