Join us  

Parenting Tips : शाळेच्या पहिल्या दिवशी मुलं खूप रडतात; शाळा नकोच म्हणतात? अशावेळी पालकांनी काय करावं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2022 2:06 PM

Parenting Tips : शाळेत जाण्यासाठी लागणारी मनाच्या तयारीकडे आपण लक्ष देणार आहोत की नाही?

ठळक मुद्देशाळा कशी छान आहे याबद्दल त्यांना सांगितल्याने त्यांच्या मनात सुरुवातीपासूनच त्याबद्दल भिती निर्माण होणार नाही. शाळेबद्दल सकारात्मकरित्या मनाची तयारी केल्यास या नव्या आयुष्यात जाणे मुलांसाठी अवघड होणार नाही.

ऋता भिडे 

जून महिना चालू झाला आणि आता सुट्टी संपून सगळ्यांचं मुलांना शाळेचे वेध लागायला लागले आहेत. गेल्या दोन वर्षात शाळा बंद असल्याने नव्याने शाळेत जाणाऱ्या मुलांचे रडणारे आवाज आपल्याला आले नाहीत. मात्र यावर्षी बऱ्याच गॅपनंतर शाळा सुरू झाल्याने पालकांची नवीन दप्तर, डबा, वह्या पुस्तकं अशी खरेदी करून झालेली असेल. (Parenting Tips) आता ही झाली प्रत्यक्ष तयारी पण मुलांच्या आणि पालकांच्या मनाच्या तयारीचे काय? शाळेत जाण्यासाठी लागणारी मनाच्या तयारीकडे आपण लक्ष देणार आहोत की नाही? आपलं मुलं शाळेत रमेल का, त्याला काही त्रास होणार नाही ना, डबा नीट खाईल का, अभ्यास समजेल का वगैरे प्रश्न एव्हाना काही पालकांना पडले असतील. 

(Image : Google)

नव्याने पहिल्यांदाच शाळेत जाणाऱ्यांची गोष्टच वेगळी, पण दोन वर्षांनी शाळेत जायचं असल्याने नवीन शिक्षिका, नवीन अभ्यास, वर्ग वगैरे कसं असेल याची उत्सुकता आणि भिती अशी मिश्र भावना मुलांच्या मनात आहे. पालकांच्या आणि मुलांच्या मनात येणाऱ्या या भावना साहजिक आहेत. याचं कारण इतके दिवस घरामधल्या कम्फर्टेबल वातावरणात सुरू असलेले शिक्षण आता आपलं आपल्याला एकटं जाऊन घ्यावं लागणात आहे. तर नव्याने शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये आणि पालकांमध्येही नवीन वातावरणात वातावरणामध्ये मुलांना सोडताना भावनिक ओढाताण होते. मुलाला शाळेत सोडताना रडणं, पालकांनाच घट्ट पकडून बसणं, स्वतःच्या सामानालाच पकडून बसणं, खूप भावनिक होणं असं करणारी मुलं शाळेच्या दरवाज्यावर दरवर्षी जूनमध्ये दिसतात. 

मुलांना शाळेमध्ये जाण्यासाठी कम्फर्टेबल कसं करता येईल?

१.  पालकांनी सकारात्मक राहणं - शाळेबद्दल, शिक्षकांबद्दल मुलांना आधीपासून सांगा. त्यांच्याशी त्या बद्दल सकारात्मक बोला. कोणत्याही नवीन वातावरणात जाताना त्याबद्दल मनात चांगल्या भावना असतील तर मुलांना नवीन वातावरणात रुळायला मदत होईल. 

२.  शाळा-शाळा खेळा - मुलांशी शाळा -शाळा, शिक्षक, व्हॅनवाले काका अशा प्रकारचे खेळ खेळा. यामुळे त्यांना नवीन व्यक्ती, नवीन वातावरण यांची नकळत माहिती होईल. या सगळ्या गोष्टी एकाएकी त्यांच्यासमोर आल्यास ते बावचळून जाणे साहजिक असते. त्यामुळे आधीपासून त्यांना या सगळ्या गोष्टींची कल्पना द्या. 

३. शाळेची तयारी - शाळेची तयारी करताना मुलांना बरोबर घ्या. त्यांना त्यांचा डबा , वह्या , पुस्तक, कंपास वगैरे गोष्टी त्यांच्या बॅगमध्ये ठेवायला द्या. यामुळे त्यांना त्यांच्या गोष्टी नीट सांभाळायची सवय लागेल आणि जबाबदारी सुद्धा समजेल. ही तयारी करत असताना नकळत त्यांच्या मनाचीही तयारी होईल. 

४. शाळेच्या शिक्षकांशी संवाद - पालकांचा शिक्षकांशी संवाद शाळेच्या सुरुवातीपासून असेल तर शाळेच्या संदर्भातल्या गोष्टी, अभ्यास मुलांकडून पालकांना करून घेता येईल. त्यामुळे शिक्षकांशी आपला चांगला संवाद असेल असा प्रयत्न करा. 

(Image : Google)

५. मुलांचं ऐका - खूपदा शाळा चालू झाल्यावर या नवीन ठिकाणी काय केलं, काय पाहिलं याबद्दल मुलांना काही सांगायचं असू शकतं. त्यावेळी त्यांच्याशी संवाद साधणे अतिशय महत्त्वाचे असते. हे बोलणं फक्त डबा खाल्लास का, शिक्षिकेने काय शिकवलं एवढ्यापुरतंच मर्यादित नको. तर तू आज नवीन काय शिकलास?, आज मित्रांशी काय खेळलास वगैरे विषयांवरही गप्पा मारा. लहान मुलं तुम्हाला सगळंच सांगतील असं नाही पण ही सांगायची सवय त्यांना आधीपासूनच लावा. शिवाय तुम्हीसुद्धा तुमचा दिवस कसा गेला याबद्दल मुलांशी बोला. 

६. शाळा सुंदर आठवण - शाळा ही आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वार्थाने जडणघडणीचा भाग असते. ही आयुष्यभराची आठवणींची पुंजी मुलांना कायम साथ देणार असते. त्यामुळे शाळेचा प्रत्येक दिवस खास असतो आणि त्याचा मुलांना पुरेपूर आनंद लुटू द्या. शाळा कशी छान आहे याबद्दल त्यांना सांगितल्याने त्यांच्या मनात सुरुवातीपासूनच त्याबद्दल भिती निर्माण होणार नाही. 

(लेखिका समुपदेशक आणि मेंदू व भाषाविकासतज्ज्ञ आहे.)

rhutajbhide@gmail.com

 

टॅग्स :पालकत्वलहान मुलंशाळा