Join us  

मुले किती वेळ मोबाईल पाहतात? पालकांनी लक्षात ठेवून करायला हव्या २ गोष्टी, स्क्रीन टाइम वाढला असेल तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2023 9:37 AM

Parenting Tips clarification about Screen time for kids : स्क्रीन टाइम किती असावा आणि पालकांनी कोणती काळजी घ्यायला हवी याबाबत

स्क्रीन टाइम हा आपल्या आयुष्यातील ज्याप्रमाणे एक अविभाज्य भाग आहे, त्याचप्रमाणे मुलांच्या आयुष्यातलीही ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. सकाळी झोपेतून उठल्यापासून आपल्या डोळ्यासमोर काही ना काही कारणाने सतत स्क्रीन असतो. यामुळे डोळे, मेंदू, पाठीचा मणका यांवर विपरीत परीणाम होत असल्याचे आपण पाहतो, ऐकतो. त्याचप्रमाणे मुलांच्या आरोग्यावरही या स्क्रीनटाइमचा विपरीत परीणाम होत असतो. मात्र आताच्या काळात स्क्रीनला पर्याय नसल्याने एका मर्यादेपेक्षा आपण मुलांना त्यापासून लांब ठेवू शकत नाही. पण त्यांच्या स्क्रीन पाहण्यावर ठराविक बंधने नक्की घालू शकतो. पण ही बंधने घालताना पालक म्हणून आपल्याला त्या गोष्टींबद्दल स्पष्टता असणे जास्त महत्त्वाचे असते (Parenting Tips clarification about Screen time for kids).

 सर्वच वयोगटातील लहान मुलांना सध्या स्क्रिनची इतकी जास्त प्रमाणात सवय लागली आहे की स्क्रीन शिवाय त्यांना काहीच सुधरत नाही. या स्क्रीनमुळे पालक आणि मुलांमध्ये होणारे वादही आपण अनेकदा ऐकतो आणि पाहतो. स्क्रीनवर वेगवेगळे गेम्स खेळण्यासाठी, युट्यूबवर काही पाहण्यासाठी, कार्टून नाहीतर बाकी कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी मुलं मोबाइल, लॅपटॉप, टीव्ही, टॅब यांसारख्या स्क्रीनवर असतात. मात्र मुलांना स्क्रीनचा अॅक्सेस देताना काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे. स्क्रीन टाइम किती असावा आणि पालकांनी कोणती काळजी घ्यायला हवी याबाबत समुपदेशक प्रिती वैष्णवी २ महत्त्वाच्या टिप्स पालकांना देतात, त्या टिप्स कोणत्या ते पाहूया..

१. स्क्रीन टाइम असे म्हटल्यावर घरात उपलब्ध असणारे सर्व प्रकारचे स्क्रीन यामध्ये येतात. हे पालकांनी आवर्जून लक्षात ठेवायला हवे. नाहीतर मुलांचा अर्धा किंवा एक तास स्क्रीन टाइम असेल तर मुलं मोबाइलवर हा वेळ घालवतात आणि नंतर पुन्हा काही वेळा टिव्ही किंवा लॅपटॉपवर वेळ घालवताना दिसतात. त्यामुळे त्यांचा स्क्रीनवर असण्याचा एकूण कालावधी खूपच जास्त होतो. म्हणूनच स्क्रीनचा विचार करताना मोबाइल, टॅबलेट, लॅपटॉप, टीव्ही अशा सगळ्या उपकरणांचा विचार होणे गरजेचे आहे. नाहीतर मुलांसाठी हे फारच स्वातंत्र्य देणारे आणि त्यांच्या एकूण वाढीत अडथळा आणणारे ठरु शकते हे पालकांनी वेळीच लक्षात घ्यायला हवे. 

२. अर्धा तास स्क्रीन टाइम आहे असे म्हटल्यावर दिवसभरातून अर्धा तास असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे आपल्या मुलाने सकाळी १० मिनीटे स्क्रीनवर घालवली असतील तर दिवसभरात आता त्याच्याकडे स्क्रीनवर काही पाहण्यासाठी केवळ २० मिनीटे उपलब्ध आहेत. त्या २० मिनीटांची विभागणी पालक आणि मुलांच्या सोयीनुसार होऊ शकते. पण एकूण अर्धा तास म्हणत असताना ३० मिनीटांचे योग्य पद्धतीने विभाजन आणि नोंद होणे गरजेचे आहे हे लक्षात घ्यायला हवे. नाहीतर हा वेळ प्रमाणापेक्षा जास्त होण्याचीच शक्यता असते. जे मुलांसाठी तोट्याचे ठरु शकते. 

 

टॅग्स :पालकत्वलहान मुलं