लहान मुल घरात असेल की त्या घरातील आईची नुसती तारांबळ सुरू असते. एकीकडे घरातली कामं, मुलांना प्रेमाने खायला घालणे, त्यांचे आवरणे, त्यांच्याबरोबर खेळणे, त्यांच्या उद्योगांकडे लक्ष देणे आणि घरातील इतरांचे सगळे करता करता स्वत:ची तब्येत सांभाळणे. असं सगळं करताना मुलं जर आईपासून अजिबात सुटी होत नसतील तर मात्र त्या आईचे फारच अवघड होऊन जाते. सतत मुलांना कडेवर किंवा मांडीत घेऊन बसावे लागत असेल तर त्या आईला काहीच सुधरत नाही. घरात-बाहेर सगळीकडे मूल सतत तुम्हाला चिकटून असेल तर काय करावे असा प्रश्नही अनेक पालकांना पडतो. आता लहान मुलांना आई हीच व्यक्ती सगळ्यात जवळची आणि सेफ वाटत असल्याने काही वेळा ते असं करतात. पण मुलं सतत आईला चिकटून असतील तर काय करावं याविषयी ‘पॅरेंटींग डायरीज विथ प्रिती’ या इन्स्टाग्राम पेजवर प्रिती याविषयी काही महत्त्वाच्या टिप्स सांगतात (Parenting Tips For Clingy Child).
१. भावनिक गरज
मूल सतत चिकटून राहतं याला नक्कीच काहीतरी कारण असतं. मुलांची भावनिक गरज काय आहे हे आईने अशावेळी समजून घ्यायला हवे. मुलांची भूक, झोप किंवा इतर गोष्टी ज्याप्रमाणे वेगवेगळ्या असतात. त्याचप्रमाणे त्यांच्या भावनिक गरजाही वेगळ्या असू शकतात. त्यामुळे आपल्या मुलाची भावनिक गरज काय आहे हे आईने ओळखायला हवे. अशावेळी मोबाईल किंवा इतर कोणतीही कामे समोर न घेता आपण मुलासोबत पाऊण ते १ तास वेळ घालवतो आहोत की नाही हे बघा.
२. बाहेर गेल्यावरही मूल चिकटून बसत असेल तर
अनेकदा आपण नातेवाईक किंवा मित्रमंडळींकडे काही कार्यक्रमासाठी जातो. त्यावेळी इतर मुलं छान खेळत असतात आणि आपलेच मूल आपल्याला चिकटून बसलेले असते. अशावेळी आपल्या मुलाने इतर मुलांसोबत खेळावे अशी आपली इच्छा असते. मात्र भावनिक अॅडजस्टमेंटची प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते. दुसऱ्या वातावरणात गेल्यावर काही मुलांना लगेचच सेफ वाटेल असे नाही. त्यामुळे जोपर्यंत त्यांना सेफ वाटत नाही तोपर्यंत ते वेगळ्या वातावरणात एकटे वावरत नाहीत. अशावेळी आपण त्यांच्या मागे न लागता त्यांना पुरेसा वेळ द्यायला हवा. जेणेकरुन त्यांना सेफ वाटल्यावर ते आपल्याला सोडून मोकळे खेळायला लागतील.
३. परिस्थिती बदलेल यावर विश्वास ठेवा.
आज आपलं मूल आपल्याला चिकटलेलं असलं तरी ते कायम तसंच राहणार नाही हे पालकांनी समजून घ्यायला हवे. ठराविक काळाने मुलांचे असे चिकटून बसणे आपोआप कमी होते आणि ती सुटी होतात. त्यामुळे ही गोष्ट तितकी ताण घेण्यासारखी नाही हे पालकांनी समजून घ्यायला हवे.