Join us  

थंडी वाढली, लहानगी गारठली; मुलांना सर्दी कफ झाला तर...डॉक्टर सांगतात खास टिप्स....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2023 3:00 PM

Parenting Tips For Cold and Cough in Kids : सर्दी-कफ झाल्यास मुलांच्या आहार-विहारात कोणकोणते बदल करावेत याविषयी...

ठळक मुद्देरोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उत्तम चौरस आहार आणि च्यवनप्राश किंवा बदामप्राश द्यायला हवे. वाफ देणे, काढा, तेलाने मसाज, कोमट पाणी देणे असे उपाय करावेत. 

राज्यभरात थंडीचा कडाका वाढला असून बाहेरच्या तापमानाशी जुळवून घेणे काहीसे अवघड होत आहे. थंडीचा कडाका वाढल्याने लहान मुले, वयस्कर व्यक्ती यांची प्रामुख्याने काळजी घ्यावी लागते. थंडीचा परिणाम म्हणजे लहान मुलांना लगेचच सर्दी-कफ होतो, हे वाढले तर ताप येणे, खोकला होणे यांसारखी लक्षणेही दिसू लागतात. सर्दी-तापामुळे अन्न न जाणे, चिडचिड होणे अशा तक्रारी निर्माण होतात. वेळेत ही सर्दी बरी झाली तर ठिक नाहीतर नीट झोप होत नाही, सर्दी साठून राहीली तर नीट श्वास घेता येत नाही आणि मग मुलं अस्वस्थ होतात. अशावेळी मुलांची काय आणि कशी काळजी घ्यायची हे समजून घ्यायला हवे. आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. पूनम यांनी इन्स्टाग्रामवर यासंबंधी काही खास टिप्स शेअर केल्या आहेत. त्यामध्ये मुलांच्या आहार-विहारात कोणकोणते बदल करावेत यासंबंधी त्या महत्त्वाच्या गोष्टी सांगतात, त्या कोणत्या पाहूया (Parenting Tips For Cold and Cough in Kids)...

१. लहान मुलांना सकाळी उठल्यावर दूध पिण्याची सवय असते. मात्र त्यामुळे कफ वाढतो अशावेळी जेष्ठमध, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा वेलची पावडर एक कप पाण्यात 3-4 मिनिट उकळावे आणि नंतर त्यामध्ये निम्मे दूध घालावे आणि वरून १ चमचा खडीसाखर घालून असे दूध मुलांना द्यावे.

(Image : Google)

२. कफ असेल तर केळी, सिताफळ, ड्राय फ्रूटस ही फळे टाळावीत

३. मुलांचा छातीचा भाग उबदार ठेवावा. स्वेटर, कानटोपी आणि सॉक्स घालावेत.

४. पाणी उकळून कोमट केलेले द्यावे, तसेच प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिण्याने कफ वाढतो.

५. आजारी पडल्यानंतर मुलांची भूक मंदावते अशावेळी त्यांना भाताची पेज द्यावी, त्यामुळे भूक वाढते.

६. अंगामध्ये ताप असताना तूप खाऊ नये, कारण या वेळी जठराग्नी मंद असल्याने तूप पचत नाही आणि कफ वाढतो.

७. सर्दी, कफ झाल्यावर लगेचच औषधांचा भडिमार न करता मुलांना आजारातून बरे होण्यास वेळ द्यावा, सहाय्यक उपचार म्हणून घरगुती उपाय करावेत. यामध्ये वाफ देणे, काढा, तेलाने मसाज, कोमट पाणी देणे असे उपाय करावेत. 

८. थोडा हवाबदल झाला की मुलांना लगेचच इन्फेक्शन होते, असे होऊ नये म्हणून त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी वर्षभर प्रयत्न करावेत. यासाठी उत्तम चौरस आहार आणि च्यवनप्राश किंवा बदामप्राश द्यायला हवे. 

टॅग्स :पालकत्वआरोग्यथंडीत त्वचेची काळजीहेल्थ टिप्स