आपलं मूल हेल्दी असावं अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. यासाठी महिला गर्भवती असल्यापासून आपण तिला सकस आहार घेण्याचा आग्रह करतो. इतकेच नाही तर मूल वरचे अन्न खायला लागल्यावरही आपण त्यांना जास्तीत जास्त पौष्टीक पदार्थ खाऊ घालतो. मात्र तरीही मुलांमध्ये काही ना काही कमतरता राहतातच. आपण खात असलेल्या अन्नाची गुणवत्ता, जंक फूडचे सर्वच वयोगटात असलेले आकर्षण आणि मुलांचे खाण्या-पिण्याबाबत असणारे नखरे यांमुळे अन्नातून मुलांना म्हणावे तसे पोषण मिळतेच असे नाही (Parenting Tips for how Nutrition supplements necessary for kids).
बरेचदा मुलांना खाऊ घालताना पालक मेटाकुटीला येत असल्याचे आपण आजुबाजूला पाहतो. मुलांनी काहीही करुन खावं यासाठी त्यांना त्यांच्या आवडीचे पदार्थ करुन देणे, खाताना मोबाइल दाखवणे, खाल्ले तर अमुक करेन, तमुक करेन असे अमिष दाखवणे असे काही ना काही पालकांना करावे लागते. मुलांनाही याची सवय होते आणि तेही खाण्याच्या बाबतीत जास्तच हट्टी बनत जातात. पण यात पालकांचाही फायदा नसतो आणि मुलांचाही. परिणामी मुलांनी अन्नातून पोषण मिळत नसल्याने त्यांना सप्लिमेंटस द्यायची वेळ येते.
मुलांना सप्लिमेंटस देण्याची आवश्यकता भासते कारण...
१. बी १२ ची कमतरता
जी कुटुंबे शाकाहारी असतात त्यांच्यामध्ये बी १२ ची कमतरता असते. कारण बी १२ हे फक्त प्राणीज पदार्थांमध्ये असल्याने शाकाहार करणाऱ्यांमध्ये त्याची कमतरता जाणवते. अशावेळी बी १२ ची सप्लिमेंटस घेण्याशिवाय पर्याय नसतो.
२. खूप गोड खाणारी किंवा कमी आहार असणारी मुले
ज्या मुलांची भूक मुळात कमी असते त्यांचे नीट पोषण होत नाही. तसेच जी मुलं साखर, गोड पेय, विशिष्ट आजाराची औषधे दिर्घकाल घेतात त्यांच्या पोषणावरही परीणाम होतो आणि त्यांना सप्लिमेंट देण्याची गरज पडते.
३. लोहाची कमतरता
बहुतांश मुलांना त्यांच्या आहारातून पुरेशा प्रमाणात लोह आणि कॅल्शियम मिळत नाही. विविध बिन्स आणि पालक यांमध्ये लोहाचे प्रमाण चांगले असते. लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी आणि स्नायूंची वाढ होण्यासीठी लोह फायदेशीर असते. मात्र आहार योग्य नसेल तर लोहाची कमतरता जाणवते.
४. व्हिटॅमिन डी कमतरता
भारतात पुरेसे ऊन असूनही बहुतांश लोकांना व्हिटॅमिन डी ची कमतरता असते. आहारातून कॅल्शियम शोषण्याचे महत्त्वाचे काम व्हिटॅमिन डी करते. हाडे आणि दातांच्या आरोग्यासाठीही व्हिटॅमिन डी आवश्यक असते.
संतुलित आहार म्हणजे नेमके काय? सप्लिमेंटस केव्हा गरजेची असतात
वयानुसार मुलांना जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कर्बोदके कोणत्या पदार्थांतून किती प्रमाणात मिळतील याकडे पालकांनी विशेष लक्ष द्यायला हवे. त्यादृष्टीने फळे, भाज्या, कडधान्य, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, धान्ये, डाळी, अंडी, विविध बिया, दाणे या सगळ्या गोष्टींचा आहारात कशाप्रकारे समावेश होईल याचे योग्य ते नियोजन करायला हवे. हे सगळे आहारात योग्य प्रमाणात असेल तर मुलांची शारीरिक आणि बौद्धिक वाढ योग्य रितीने होण्यास मदत होते. मुलांना सप्लिमेंटस देण्यापूर्वी डॉक्टरांशी योग्य ती चर्चा करणे आवश्यक आहे. काही वेळा मुलांना सप्लिमेंटसची नक्कीच आवश्यकता असू शकते. पण त्यासाठी डॉक्टरांशी योग्य ती चर्चा करुन मग ही सप्लिमेंटस सुरु करायला हवीत.