Join us  

सतत मोबाइल पाहतात म्हणून तुम्ही मुलांना ओरडता? त्यापेक्षा करा ३ उपाय, सुटेल स्क्रिनचा नाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2023 10:40 AM

Parenting Tips For Screen Addiction : स्क्रीनचे वेड इतके वाईट असते की ते एकदा लागले की त्याचे अक्षरश: व्यसन लागते.

मोबाइल किंवा टीव्ही पाहणे हे लहान मुलांसाठी अतिशय आवडीचे काम असते. त्यातही घरातील इतर मंडळी जर सतत स्क्रीनपुढे असतील तर ते पाहून मुलांनाही तीच सवय लागते. मुलं सतत स्क्रीनचा हट्ट करतात. काही केल्या ऐकत नाहीत आणि तासनतास स्क्रीनसमोर असतात अशा प्रकारच्या तक्रारी पालक नेहमीच करताना दिसतात. यावरुन अनेकदा मुलं ओरडा खातात, प्रसंगी मारही खातात. सध्या अगदी १ ते २ वर्षाच्या मुलांनाही या स्क्रीनचे वेड असते (Parenting Tips For Screen Addiction). 

स्क्रीनचे वेड इतके वाईट असते की ते एकदा लागले की त्याचे अक्षरश: व्यसन लागते. मग वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहणे, कार्टून पाहणे, गेम्स खेळणे अशा एक ना अनेक गोष्टी मुलं मोबाईल किंवा टीव्हीवर करत राहतात. मुलांचे स्क्रीनचे व्यसन कमी करायचे असेल आणि त्याला एक विशिष्ट नियम लावायचे असतील तर काय करायला हवे याविषयी समजून घेणे गरजेचे आहे. प्रसिद्ध समुपदेशक इशिना सदाना याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याशी इन्साग्रामच्या माध्यमातून शेअर करतात. त्या कोणत्या ते पाहूया...

(Image : Google)

१. किती आणि केव्हा स्क्रीन दाखवाची हे नक्की करा

मुलांना कधी आणि केव्हा स्क्रीन दाखवायची आहे हे आधी नक्की करा. मूल थोडे मोठे असेल तर मुलांशी त्याबाबत योग्य प्रकारे चर्चा करा. त्यानुसार स्क्रीन पाहण्याची दिवसभरातील वेळ आणि किती वेळ पाहू शकतो हे नक्की करुन घ्या. 

२. रुटीन फॉलो करा 

कधी आणि किती वेळ मोबाइल किंवा टीव्ही पाहायचा आहे हे एकदा नक्की झाले की ते रुटीन फॉलो करण्याची मुलांना सवय लावा. याचा मुलांच्या स्क्रीन टाईमला शिस्त लागण्यास चांगला उपयोग होईल. मुलांनाही अमुक गोष्ट अमूक वेळेला करायची असते हे समजेल.

३. मुलांनी आणखी पाहण्यासाठी हट्ट केला तर

मुलांना स्क्रीनवर पाहणे इतके आवडते की ते त्यामध्ये पूर्णपणे गुंतून जातात. त्यामुळे त्यांचा ठराविक वेळ संपला की ते आणखी पाहण्यासाठी आपल्याकडे हट्ट करतात. अशावेळी ठाम राहून मुलांना नाही म्हणा. अशावेळी न चिडता त्यांची वेळ संपली आहे हे त्यांना शांतपणे सांगा. काही काळाने मुलांना त्यांच्या मर्यादा समजतील आणि ते हट्ट करणे बंद होईल. पण तुम्ही आधीच चिडचिड आणि त्रागा केला तर मात्र आरडाओरडी, रडारड होईल आणि त्यातून मुलं आणखी हट्टीपणा करतील.  

टॅग्स :पालकत्वलहान मुलंमोबाइल