Join us  

मुलं सतत मोबाइलला चिकटलेली? कोणत्या वयाच्या मुलांनी किती वेळ स्क्रीन पाहणं योग्य? तज्ज्ञ सांगतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2023 11:19 AM

Parenting Tips For Screen Time of Children : मुलांचा स्क्रिन टाइम खूप जास्त आहे म्हणून पालकच डोक्याला हात लावून बसलेले दिसतात.

ठळक मुद्देमुलांना किती वेळ मोबाइल दाखवावा याचं भान आपल्याला पालक म्हणून असायला हवंमुलं सतत मोबाइलला चिकटलेली असतील तर ते त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही योग्य नाही.

स्क्रिन हा आता अगदी १ वर्षाच्या बाळापासून ते ८० वर्षाच्या ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांसाठीच करमणुकीचे एक महत्त्वाच साधन झाला आहे. गाणी, गेम्स ते विविध प्रकारच्या सिरीयल, ओटीटी सिरीज अशा गोष्टींसाठी आपण सगळेच स्क्रिम पाहतो. मग कधी तो मोबाइल असतो तर कधी टॅब किंवा लॅपटॉप नाहीतर टीव्ही. गेल्या काही वर्षात स्क्रिनचे वेड सगळ्याच वयोगटात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. लहान मुलं तर हल्ली कित्येक तास मोबाइललाच चिकटलेली दिसतात. मुलांना स्क्रिनशी ओळख करुन देण्यात पालकच जबाबदार असतात. मात्र नंतर मुलांचा स्क्रिन टाइम खूप जास्त आहे म्हणून पालकच डोक्याला हात लावून बसलेले दिसतात (Parenting Tips For Screen Time of Children). 

स्क्रिन ही अशी गोष्ट आहे की ज्याचे लहान वयात पटकन व्यसन लागते. एकदा हे व्यसन लागले की ते सोडवणे अतिशय कठिण असते. मात्र किती वयोगटाच्या मुलांनी किती स्क्रिन पाहिला तरी चालतो याविषयी इन्स्टाग्रामवर पॅरेंटींग विथ ब्रेनिफाय या पेजवरुन समुपदेशक आपल्याशी काही महत्त्वाच्या गोष्टी शेअर करतात. अमेरिकन अॅकॅडमी ऑफ पेडीएट्रीक्सच्या म्हणण्यानुसार, ठराविक वयातील मुलांना ठराविक काळच स्क्रीन दाखवायला हवा. त्यासाठी पालकांनी लक्षात ठेवायला हव्यात अशा गोष्टी...

(Image : Google)

१. मूल जन्माला आल्यापासून ते २ वर्षाचे होईपर्यंत त्यांना अजिबात मोबाइल, टीव्ही, लॅपटॉप दाखवू नये. त्यांना अशाप्रकारच्या स्क्रिनपासून पूर्णपणे दूर ठेवायला हवे. त्यामुळे मुलांची भाषा, आकलन, सोशल स्कील्स यावर त्याचा परिणाम होतो. किमान वेळासाठी व्हिडिओ कॉल करणे ठिक आहे. 

२. मूल २ ते ५ या वयोगटात असेल तर त्याला १ तास स्क्रिन टाइम चालू शकतो. मात्र त्याकडेही पालकांचे योग्य पद्धतीने लक्ष असणे आवश्यक आहे. मूल काय पाहते आहे त्याविषयी पालकांनी त्याला समजावून सांगायला हवे म्हणजे पालकांशी मुलांचे इंटरअॅक्शन होईल. 

३. ५ वर्षाच्या पुढील मुलांना किती वेळ मोबाइल दाखवावा याबद्दल कोणतेही नियम सांगितलेले नाहीत. मात्र या वयोगटातील मुलं शारीरीकरित्या अॅक्टीव्ह असायला हवेत. तसेच या वयातील मुलांची झोप पूर्ण होते की नाही याकडेही पालकांनी विशेष लक्ष द्यायला हवं. मात्र स्क्रीन टाइममुळे या दोन्ही गोष्टींवर परीणाम होता कामा नये.

टॅग्स :पालकत्वलहान मुलंमोबाइल