Join us  

डोके धुवायचे, केस विंचरायचे म्हणजे नुसती रडारड; बाळाच्या केसांची काळजी घेताना लक्षात ठेवा 'या' गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 4:29 PM

Parenting Tips : बाळांच्या डोक्याची त्वचा आणि केस मळू शकतात, केसांमध्ये गुंता होऊ शकतो आणि काहीवेळा त्यातून वास देखील येऊ लागतो.  म्हणूनच बाळांच्या केसांची काळजी घेण्याचा नित्यक्रम ठरवणे महत्त्वाचे आहे.

लहान बाळांना कपडे कोणते घालायचे, त्यांच्या त्वचेची आणि आरोग्याची काळजी कशी घ्यायची याकडे बरेच लक्ष पुरवले जाते.  पण बाळांच्या केसांची देखील विशेष काळजी घेणे आवश्यक असते.  जन्मानंतर सुरुवातीचे काही आठवडे बाळ दिवसाचे बरेच तास झोपलेले असते असे जरी असले तरी बाळांच्या डोक्याची त्वचा आणि केस मळू शकतात, केसांमध्ये गुंता होऊ शकतो आणि काहीवेळा त्यातून वास देखील येऊ लागतो.  म्हणूनच बाळांच्या केसांची काळजी घेण्याचा नित्यक्रम ठरवणे महत्त्वाचे आहे. याबाबत पेडियाट्रिशियन व नेओनॅटोलॉजिस्ट डॉ. रशना दास हजारिका यांनी अधिक माहिती दिली आहे.  

केस धुण्याचा चांगला नित्यक्रम 

काही बाळांना जास्त केस आलेले नसतात पण जेवढे केस असतील ते धुण्यासाठी एखादा सौम्य शाम्पू वापरल्याने डोक्यावरील संवेदनशील त्वचेची काळजी घेण्यात मोठी मदत मिळते.  यामुळे बाळांना, खासकरून नवजात बाळांना आपल्या डोक्यावर पाण्याच्या स्पर्शाची सवय करून घेता येते.  बाळ पाठ जमिनीला टेकून पडलेल्या अवस्थेत डोके इकडे-तिकडे फिरवत असते, अशावेळी केसांचा गुंता होतो, त्यामुळे बाळाच्या केसांची काळजी घेण्यासाठी योग्य नित्यक्रम ठरवलेला असणे आवश्यक असते.

बाळांसाठी म्हणून खास तयार करण्यात आलेला शाम्पूच वापरावा कारण बाळांचे केस मोठ्या व्यक्तीच्या केसांपेक्षा पाच पट पातळ असतात.  पॅराबेन्स, सल्फेट्स आणि रंग न मिसळलेला, हायपोअलर्जेनिक व पीएच संतुलित असलेला, क्लिनिकली सौम्य सिद्ध झालेला शाम्पू अंघोळीच्या वेळी वापरून बाळांचे केस आणि डोक्यावरील त्वचा हळुवारपणे स्वच्छ करावी.

अंघोळ घालताना बाळाच्या डोळ्यात शाम्पू जाऊ नये यासाठी बऱ्याचदा बाळाचे डोळे हाताने झाकले जातात.  काळजीपूर्वक अंघोळ घालणे महत्त्वाचे आहे पण आता असे काही खास शाम्पू तयार करण्यात आले आहेत ज्यामध्ये हेतुपूर्ण सामग्रीचा उपयोग करण्यात येतो आणि डोळे लाल होणे किंवा डोळ्यांमध्ये खाज, वेदना होणे असे प्रकार टाळले जातात.  बाळाचे केस धुताना नेहमी कोमट पाण्याचाच वापर करा.  सर्वात आधी केस ओले करावेत, त्यावर शाम्पू लावावा, केसात, डोक्यावर सर्वत्र हळुवारपणे हात फिरवत शाम्पूचा फेस येऊ द्यावा आणि नंतर पाण्याने तो स्वच्छ धुवावा.  

बाळाचे डोके तुमच्या दिशेने थोडे मागे झुकवल्यास त्याच्या/तिच्या डोळ्यात पाणी जाणे टाळले जाऊ शकते.चांगला, सौम्य शाम्पू हळुवारपणे स्वच्छता करतो, इतकेच नव्हे तर, पाण्याने सहजपणे निघूनही जातो आणि याने बाळाच्या डोळ्यांना त्रास देखील होत नाही.  ज्यांचे पहिलेच बाळ आहे अशा पालकांना बाळाचे केस धुण्याची भीती वाटते पण हळुवारपणे स्वच्छता करणारा, डोळ्यांना त्रासदायक न ठरणारा शाम्पू जर असेल तर बाळाचे केस धुणे अगदी सहज जमते, कशाचीही चिंता करावी लागत नाही, बाळ आणि पालक दोघांसाठी ते आनंददायी ठरते.  सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाळाचे केस मऊशार, चमकदार व स्वच्छ राहतात, त्यामध्ये एक तजेलदार सुगंध कायम दरवळत राहतो.

बाळाच्या केसांना तेल लावणे 

बाळाचे सुरुवातीचे भावनिक बंध शारीरिक स्पर्शातून निर्माण होतात आणि पुढील जीवनातील भावनिक व बौद्धिक विकासाची पायाभरणी देखील यामधूनच होत असते. बाळाच्या केसांखालील त्वचेची काळजी घेण्यासाठी  बाळांच्या केसांसाठी खास बनविलेले तेल वापरणे लाभदायक ठरते.  बाळ आनंदी राहावे, त्याचा निरोगी विकास होत राहावा यासाठी महत्त्वाच्या संवेदना उत्तेजित होण्यात देखील यामुळे मदत मिळते. 

यासाठी बाळाच्या पालकांनी पुरेशा प्रमाणात तेल बाळाच्या डोक्यावर लावावे आणि जराही दाब न देता, अगदी हळुवारपणे आपली बोटे सर्वत्र गोलाकार फिरवत मसाज करावा. ही पद्धत आणि त्यासोबत पालकांचा मायेचा नाजूक स्पर्श यामुळे बाळासोबत त्यांचे भावनिक बंध अधिकाधिक दृढ होत जातात, इतकेच नव्हे तर, असा तेल मसाज केला जात असताना हळूहळू बाळ शांत होते व गाढ झोपते.

दररोजच्या वापरासाठी सौम्य ठरेल असे तेल निवडा.  हे तेल सौम्य असल्याचे क्लिनिकली सिद्ध झालेले असले पाहिजे, जेणेकरून त्याने बाळाच्या डोक्याच्या नाजूक त्वचेला काही त्रास होणार नाही.  अतिशय हलके आणि चिकट नसलेले तेल वापरणे सर्वात उत्तम! ऍव्होकॅडो आणि प्रो-व्हिटॅमिन बी५ युक्त बेबी हेअर ऑइल्स देखील आहेत ज्यामुळे बाळाचे केस मऊ आणि निरोगी राहतात.

बाळाचे केस आणि डोक्याची त्वचा नाजूक असल्याने त्यांची काळजी सौम्यपणे आणि तरीही प्रभावी पद्धतीने घेतली गेली पाहिजे.  बाळाच्या डोक्याला आणि केसांना कसे व कधी तेल लावावे हे देखील महत्त्वाचे आहे.  अंघोळीच्या आधी बाळांच्या केसांसाठी बनविलेले तेल वापरावे, त्याचप्रमाणे बाळाच्या डोक्याची त्वचा जेव्हा-जेव्हा कोरडी होईल तेव्हा त्यावर तेल लावावे.  बाळाच्या डोक्याच्या कोरड्या त्वचेवर तेलाने हळुवार मसाज केल्यास ती मऊ होते.

बाळाचे केस दाट आणि कुरळे असतील तर त्यामध्ये गुंता होतो.  केसांच्या गाठी आणि गुंता होऊ नये यासाठी मोठे आणि मऊ दात असलेली फणी घेऊन दिवसातून किमान एकदा त्याचे/तिचे केस हळुवारपणे विंचरा.  बाळाच्या डोक्याच्या त्वचेला फणी लागणार नाही याची पुरेपूर दक्षता घ्या कारण ती त्वचा खूप संवेदनशील असते.  शाम्पू केल्यानंतर जेव्हा केस ओलेच असतात तेव्हा विंचरणे सर्वात चांगले असते. 

आजकाल बरेच पालक स्टायलिंगसाठी केसांचे  हेअर ऍक्सेसरीज आणि क्लिप्सचा वापर करतात.  असे करत असताना बाळाच्या केसांना आणि डोक्याच्या त्वचेला इजा होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली पाहिजे.  बाळाचे केस आणि डोक्याची त्वचा नाजूक व संवेदनशील असते याचे भान ठेवूनच या ऍक्सेसरीजचा वापर करावा. या सूचनांचे पालन केल्यास तुमच्या बाळाचे केस आणि डोक्याची त्वचा स्वच्छ व निरोगी राहील.  बाळांमध्ये बऱ्याच प्रमाणात आढळून येणाऱ्या क्रेडल कॅपसारख्या समस्या देखील उद्भवणार नाहीत.

टॅग्स :पालकत्वआरोग्यस्त्रियांचे आरोग्य