Join us  

नव्या वर्षात बेस्ट पालक व्हायचंय? करा फक्त ३ गोष्टी, मुले आणि पालक दोन्ही खुश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2023 5:08 PM

Parenting Tips How To Be Best Parent : आपण बेस्ट पालक असावं अशी पालक म्हणून आपली स्वत:कडून अपेक्षा असते.

ठळक मुद्देआपल्याला मुलांनी जसं करायला हवं आहे तसं आपण आधी करायला हवं. तरच मुलं आपल्याला हवं तसं करतील.  पालकत्व निभावताना काही गोष्टी आवर्जून समजून घ्यायला हव्यात

आपण उत्तम पालक असावं आणि आपल्या मुलांचा सांभाळ, पालनपोषण आपल्याला सर्वोत्तमरितीने करता यावं असं प्रत्येक पालकांना वाटते. त्यादृष्टीने आपण प्रयत्नही करतो. मात्र तरीही मुलांना काही वाईट सवयी लागतात, मुलं हट्टीपणा करतात. आपण म्हणू तसं मुलं वागत नाहीत. अशा तक्रारी पालक म्हणून आपल्या असतातच. मुलं वाढत असताना पालक म्हणून आपणही खरंतर त्यांच्यासोबत वाढत असतो. आपण बेस्ट पालक असावं अशी पालक म्हणून आपली स्वत:कडून अपेक्षा असते. पाहूयात उत्तम पालक व्हायचं तर करायलाच हव्यात अशा ३ गोष्टी कोणत्या. पॅरेंटींग डायरीज विथ प्रिती या अकाऊंटवरुन प्रिती यांनी काही महत्त्वाच्या टिप्स शेअर केल्या आहेत (Parenting Tips How To Be Best Parent). 

१. मुलांना तुमची ४० ते ४५ मिनिटे रोज द्या

अनेक पालक नोकऱ्या करणारे असतात. तसंच महिला वर्गाला घरातील कामांचाही ताण असतो. अशावेळी आपण मुलांना वेळ देऊ शकत नाही हे जरी खरे असले तरी दिवसातला ठराविक वेळ हा मुलांसाठी आवर्जून राखून ठेवायला हवा. यामध्ये मोबाईल, टीव्ही, इतर लोक असे कोणीच असता कामा नये. तो वेळ फक्त तुम्ही आणि तुमचे मूल यांचा असायला हवा. यामध्ये तुम्ही मुलांशी गप्पा मारणे, खेळणे, काही अॅक्टीव्हीटीज करणे असे काहीही असू शकते. ही वेळ रोज एकच असेल तर आणखी चांगले. प्रत्येक नात्याला गुंतवणूकीची आवश्यकता असते आणि मुलांना वेळ देणं ही एकप्रकारची अतिशय महत्त्वाची गुंतवणूक आहे.  

(Image : Google)

२. तुम्ही आनंदी आहात का?  

हा प्रश्न प्रत्येक पालकाने स्वत:ला आवर्जून विचारायला हवा. कारण तुम्ही आनंदी असाल तरच मूल आनंदी राहू शकतं. त्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल अशा गोष्टी तुम्ही आवर्जून करा. तुमच्याकडे असलेला आनंद तुमचे हास्य, मिठी, व्हायब्रेशन्स, शब्द यांच्या माध्यमातून नकळत तुमच्या मुलामध्ये जातो. त्यामुळे तुम्ही आनंदी असाल तर तुमचे मूल नकळत आनंदी होईल.

३. मूल जसे हवे तसे होण्याचा प्रयत्न करा. 

आपले मूल हुशार, आत्मविश्वासू, प्रेमळ, माणुसकी असलेले असावे असे प्रत्येकाला वाटते. त्याने स्वच्छता, नीटपणा, शिस्त यांसारख्या गोष्टी आत्मसात कराव्यात आणि तो मोठेपणी चांगला व्यक्ती व्हावा अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. असे वाटणे अगदीच स्वाभाविक आहे. मात्र त्यासाठी पालक म्हणून आपण तसे असायला हवे. मुलं आपल्या कृतीतून गोष्टी शिकत असतात. त्यामुळे आपल्याला मुलांनी जसं करायला हवं आहे तसं आपण आधी करायला हवं. तरच मुलं आपल्याला हवं तसं करतील.  

टॅग्स :पालकत्वलहान मुलं