Join us  

मुलं सतत फोनला चिकटलेली असतात? ३ उपाय, मुलांना स्क्रीनपासून लांब ठेवायचं तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2022 9:41 AM

Parenting Tips How to Limit Your Child Screen Time Screen Addiction : पालकांनी सुरुवातीपासून याकडे अतिशय गांभिर्याने लक्ष देण्याची आवश्यकता असून काही गोष्टी पालकांनी आवर्जून करायला हव्यात.

ठळक मुद्देमैदानी खेळ, घरात बसून खेळता येतील असे खेळ, कला, त्यांच्या आवडीच्या इतर गोष्टी अशा गोष्टी करण्यासाठी मुलांना प्रोत्साहन द्यायला हवे 

हल्ली लहान मुलं सतत मोबाईलला चिकटलेली असतात अशी तक्रार पालक वारंवार करताना दिसतात. कोरोना काळात मुलांची शाळा, क्लासेस सगळं ऑनलाईन असल्यामुळे त्यांचा स्क्रीनकडे ओढा वाढला हे खरे आहे. पण एरवीही अगदी ३ वर्षांपासून ते पुढच्या सर्वच वयोगटातील मुलांचा मोबाईलचा वापर वाढला आहे. इंटरनेटच्या आभासी जगात जगत असताना त्यांचा माणसांशी संपर्क कमी झाल्याने मानसिक आणि इतरही बऱ्याच अडचणींमध्ये वाढ झाली आहे. स्क्रीन टाईमचा मुलांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. अशात पालकांसमोर मुलांना स्क्रीनपासून दूर कसे ठेवायचे असा यक्षप्रश्न निर्माण झालेला दिसतो. मात्र पालकांनी सुरुवातीपासून याकडे अतिशय गांभिर्याने लक्ष देण्याची आवश्यकता असून काही गोष्टी पालकांनी आवर्जून करायला हव्यात. काही वेळा मुलं आपल्यामागे भुणभुण करत असतील तर आपण त्यांच्या हातात मोबाईल देतो. त्यामुळे ते रडले की त्यांना मोबाईल मिळतो हे त्यांना माहित होते आणि पुढच्या वेळी ते तशी मागणी करतात. असे होऊ नये यासाठी काय करायचे पाहूया (Parenting Tips How to Limit Your Child Screen Time Screen Addiction)...

(Image : Google)

१. मुलांसोबत वेळ घालवा

पालकांनी मुलांसोबत क्वालिटी वेळ घालवणं त्यांच्या मानसिक, बौद्धिक विकासासाठी अतिशय गरजेचे असते. त्यामुळे त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारणे, खेळ खेळणे, त्यांना फिरायला नेणे अशा गोष्टी पालकांनी त्यांच्यासोबत आवर्जून करायला हव्यात. 

२. स्क्रीनपासून दूर राहण्याचे कारण समजावून सांगायला हवे

सतत स्क्रीनसमोर राहणे आरोग्यासाठी कशाप्रकारे घातक असते हे मुलांना समजावून सांगायला हवे. पालक म्हणून आपण मुलांना एखाद्या गोष्टीसाठी विरोध करत असू आणि त्याचे पटेल असे कारण समजावून सांगितले तर मुलं आपलं ऐकतात. पण हेच त्यांना ओरडून किंवा रागाने सांगितले तर ते आपलं न ऐकता त्यांना हवं तेच करतात. त्यामुळे मुलांना योग्य ते कारण पटवून द्यायला हवे. 

३. मोबाईलसाठी त्यांना चांगले पर्याय द्या

मुलांना कंटाळा आला की ते एंगेज राहण्यासाठी काहीतरी करतात. अशावेळी मुलांना त्यांना आवडतील अशा काही चांगल्या अॅक्टीव्हीटीज द्यायला हव्यात. या अॅक्टीव्हिटीजमुळे मुलांचा शारीरिक, बौद्धिक विकास होईल याची काळजी आपण आवर्जून घ्यायला हवी. यामध्ये मैदानी खेळ, घरात बसून खेळता येतील असे खेळ, कला, त्यांच्या आवडीच्या इतर गोष्टी अशा गोष्टींचा समावेश करता येऊ शकतो.   

टॅग्स :पालकत्वलहान मुलंमोबाइल