लहान मुंल रांगण्याच्या स्टेजमधून थोडी बाहेर येऊन बसायला लागली की पालकांना त्यांना आपण काहीतरी शिकवावं. गाणी, गोष्टी, अंक, बाराखडी या माध्यमातून आपण मुलांचा अभ्यास घ्यायला हळूहळू सुरुवात करावी असं पालकांना वाटतं. रांगणारं किंवा सतत इकडे तिकडे करणारं बाळ या निमित्ताने का होईना थोडा वेळ तरी एका जागेवर बसेल आणि त्याला शांतपणे एखादी गोष्ट करण्याची सवय लागेल असा आपल्या त्यामागचा उद्देश असतो. तसंच मूल इतर मुलांच्या मागे पडू नये आणि त्याला सगळं यायला हवं या अट्टाहासापायीही अनेकदा पालक खूप लहान मुलांनाही बाराखडी, आकडे म्हणून दाखवतात, बोबड्या भाषेत म्हणायला लावतात Parenting Tips How to (Make Study of 1 to 6 Years old Childrens Tips).
आता मुलांना हे सगळं करायला लावण्याचं योग्य वय कोणतं? त्यांचा अभ्यास घ्यायचा म्हणजे नेमकं काय करायचं आणि शांतपणे मुलांच्या कलाने घेत त्यांना एखादी गोष्ट कशी शिकवायची हे पालकांनाही अनेकदा माहित नसतं. आपल्याला हवं तसं मुलाने करावं आणि तसं तो करत नसेल तर आपण जबरदस्तीने, ओरडून, प्रसंगी मारुन त्याच्याकडून ते करुन घेतो. पण ही प्रक्रिया पालक आणि मूल दोघांसाठीही जिकरीची न होता आनंदाची कशी करता येईल त्यासाठी प्रसिद्ध मेंदूतज्ज्ञ डॉ. श्रुती पानसे काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याशी शेअर करत आहेत, त्या कोणत्या पाहूया...
मुलांचा अभ्यास नेमका कोणत्या वर्षापासून सुरू होते?
जन्माला आल्याच्या पहिल्या दिवसापासून मुलांचं शिक्षण खऱ्या अर्थाने सुरू होते. त्याला आपण सहज शिक्षण असं म्हणतो, विविध आवाज, स्पर्श, चव, दृष्टी यांच्या माध्यमातून न्यूरॉन कनेक्शन्स होणं हे त्यांच्यासाठी शिक्षणच असतं. त्यामुळे पहिल्या ५ महिन्यातच अनौपचारीक शिक्षण सुरू झालेलं असतं. पण औपचारीक शिक्षण मात्र आपण मुलाला शाळेत घालतो तेव्हाच सुरू होतं.
२. साधारण ३ वर्षाचं मूल शाळेत जायला लागतं, तर त्याने कसा अभ्यास करावा?
या वयात लेखन, वाचन असं काहीच घेऊ नये. या वयात गाणी, गोष्टी, इतर हातांच्या अॅक्टीव्हीटीज असं घ्यायला हवं. इतकंच नाही तर मूल ४ आणि ५ वर्षाचं होतं तेव्हा लेखन पूर्व आणि वाचन पूर्व अशा अॅक्टीव्हिटीज घ्यायला हव्यात. आपल्याकडे शाळांमध्ये अतिशय घाईने लेखन आणि वाचन सुरू करतात. मात्र तसे करणे मुलांच्या विकासासाठी योग्य नाही. त्यामुळे ३ ते ५ वर्षे वयाचे मूल रेघोट्या, चित्र काढणे, रंगाने काहीतरी रंगवणे किंवा मोठ्या बहिण-भावंडांचे, इतर मुलांचे पाहून लिहीण्याची नुसती अॅक्टींग करणे असे करत असेल तर ठिक आहे. मात्र त्यांना प्रत्यक्ष लिहायला आणि वाचायला लावण्याची आवश्यकता नसते.
३. वय वर्ष ६ नंतरच मुलांना लिहायला द्यावं यामागे काही नेमकं कारण आहे का?
वय वर्षे ६ पर्यंत स्नायूंची पूर्णपणे वाढ होते. त्याआधी मूल हाताने खात असेल, रेघोट्या काढत असेल किंवा बॉल फेकणे-झेलणे यांसारख्या क्रिया करत असेल तरी सुसूत्रताबद्ध ओळींमध्ये, चौकटीत लिहीण्यासाठी आवश्यक असणारी ताकद त्याआधी स्नायूंमध्ये आलेली नसते. तसंच एखादी गोष्ट डोळ्याने पाहणे आणि मग ती लिहीणे यासाठी आवश्यक असणारे कौशल्य मुलांमध्ये वयाच्या ६ वर्षानंतर येते. त्यामुळे मुलांना त्याआधी लिहीण्याचा अट्टाहास करु नये. यांमुळे मुलांच्या मनावर एकप्रकारचा ताण येण्यास सुरुवात होते.
४. लेखन-वाचन पूर्वतयारी म्हणजे काय?
माझं मूल इतर मुलांपेक्षा अभ्यासात किंवा इतर बाबतीतही मागे पडलं तर काय अशी एक भिती बहुतांश पालकांच्या मनात असते. पण आता लहान वयात त्यांना लिहायला लावल्याने किंवा वाचायला लावल्याने प्रत्यक्ष सातवी किंवा आठवीमध्ये आणि त्यानंतरही जेव्हा त्यांना खूप लिखाण असतं तेव्हा मात्र ते लिहीत नाहीत. याचं कारण म्हणजे लहान वयापासून त्यांच्या हातावर खूप ताण आलेला असतो. मात्र तेव्हा आपल्याला ते असं का करतात याचा उलगडा होत नाही आणि मग मूल लिहीत नाही म्हणून आपण खूप अस्वस्थ होतो.