ऋता भिडे
“माझ्या मुलाला किती वेळा सांगितलं तरी ऐकतच नाही. अगदी सगळ्या पद्धतींनी सांगितलं तरी पण पालथ्या घड्यावर पाणी. तेच तेच परत परत सांगून मी दमले. आता शाळेतून पण तक्रारी येतात, खाली खेळायला जायलासुद्धा ह्याला सारख सांगावं लागतं. ” अपर्णा माझ्याशी सेशनमध्ये बोलत होती. तिच्याशी अजून जरा डिटेलमध्ये बोल्यावर समजलं की तिचा मुलगा विहान, वय वर्ष ९ तिच्यावर खूप छोट्या छोट्या गोष्टींसाठी अवलंबून आहे. त्यात एकत्र कुटुंब आणि विहान शेंडेफळ असल्यामुळे थोडा जास्त लाडावलेला आहे (Parenting Tips How To make Child Independent).
आता ही समस्या बऱ्याच मुलांची असू शकते. आपण मुलांना आपल्यावर खूप अवलंबून करत आहोत का? हे तपासून पाहायला हवं. अनेकदा पालकांना आपलं मूल ह्या गोष्टींमधून जात आहे आणि म्हणून आपल्याशी वेगळ्या पद्धतीने वागत आहे हेच समजत नाही. मुलांच्या वेगळ्या वागण्यामुळे पालक वैगतात, त्यांची चीडचीड होते, मग हा राग मुलांवर काढणं, मग वाद असं सगळं पुढे सुरू होतं. पण ह्या सगळ्याची सुरुवात होण्याआधीच आपण जर मुलांना स्वावलंबी बनवण्याकडे लक्ष दिलं तर तुमचं पालकत्व खूप सोप्प होईल आणि आनंदात जाईल.
मुलांना स्वावलंबी बनवण्यासाठी काय कराल?
१. मुलांना पर्याय द्या - यातून मुलांची निर्णय क्षमता वाढेल. हे तुम्ही साधारण साडेतीन वर्षाच्या पुढे असणाऱ्या मुलांबरोबर करू शकता. पर्याय देताना तुला लाल टी -शर्ट घालायचा आहे का निळा टी - शर्ट घालायचा आहे? असा पर्याय देऊ शकता. अशाप्रकारे विविध गोष्टींमध्ये त्यांचे मत विचारात घेता येऊ शकते.
२. मुलांना भावनिकदृष्ट्या सामर्थ्यवान बनवा - मुलं एकमेकांशी खेळत असताना त्यांच्यात वाद झाले, तर लगेच मध्ये पडू नका. तुम्हाला विचारल्याशिवाय त्यांना सल्ला द्यायचा टाळा. तुमची मुलं एखाद्या गोष्टीला, व्यक्तीला टाळत असतील तर त्यामागचं कारण शोधून , मुलाशी शांतपणे संवाद साधून मुलाला भावनिक दृष्या सामर्थ्यवान बनव. तुम्ही त्याच्या बरोबर कायम आहात हे सांगा.
३. वैचारिक आणि निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य द्या - अगदी लहान मुलांना म्हणजे ३ - ४ वर्षाच्या सुद्धा मुलांना विचार करता येतो आणि आपण संधी दिली तर मुलं निर्णय घेऊन त्याची जबाबदारी सुद्धा घेतात. उदाहरणार्थ , शाळेच्या गॅदरींगमध्ये मी नाटकात भाग घेऊ का डान्स मध्ये? अश्या छोट्या निर्णयांपासून दहावी नंतर काय करायच आहे ह्या बद्दलचे निर्णय सुद्धा मुलं घेऊ शकतात. पालकांना जसं त्यांचं मत आहे तसंच मुलांना पण आहे. मुलांना त्यांची मतं मांडायची संधी पालकांनी दिली पाहिजे.
४. लाड करा पण लाडोबा बनवू नका - मुलांचं कौतुक करणं, त्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. कोणतीही गोष्ट पूर्ण केली की मुलांना शाब्बासकी द्यायला हवी. पण त्याचा अतिरेक झाला झाला तर मात्र मुलं लाडोबा बनू शकता.असे लाडोबा मग पुढे हट्टी होण्याची जास्त शक्यता असते. मुलांना शिकण्याची संधी द्या. मुलं चुकत, धडपडत शिकतील. प्रत्येक मुलाला समान वेळ लागेल असं नाही, त्यामुळे तुमच्या मुलाला शिकण्यासाठी लागणारा वेळ त्याला द्या.
मुलांना स्वावलंबी बनवणं सुरुवातीला त्यांना आणि तुम्हालाही अवघड जाऊ शकतं. पण तुम्ही ते नक्कीच करू शकता. कारण, तुमच्या मुलांचा तुमच्यावर विश्वास आहे.
(लेखिका समुपदेशक आणि मेंदू व भाषाविकासतज्ज्ञ आहे.)
rhutajbhide@gmail.com