आपलं मूल उत्तम, जबाबजार नागरीक व्हावं असं आपल्या प्रत्येकाला वाटत असतं. यासाठी आपण त्यांना अगदी लहान पणापासून शिस्त लावतो, चांगल्या शाळेत घालतो. त्यांना चांगल्या सवयी लागाव्यात, त्यांनी चांगले वागावे यासाठी आपण आटोकाट प्रयत्न करत असतो. मुलांनी मोठेपणी समाजात कधीही चुकीचे वागू नये असे आपल्याला सतत वाटत असते. मात्र कधी मुलं खूप हट्टीपणा करतात तर कधी सगळ्यांसमोर आपल्याला मान खाली घालावी लागेल असे वागतात. मूल जसजसे मोठे होत जाते तसे त्यांना सवयी लावणे अवघड होते. त्यामुळे लहान वयातच त्यांना जास्तीत जास्त चांगल्या सवयी लावण्याचा पालक प्रयत्न करतात. मुलांनी समाजात वावरताना आपले नाव खराब करु नये आणि उत्तम नागरीक व्हावे यासाठी पालकांनी काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे, त्या गोष्टी कोणत्या पाहूया (Parenting Tips How To Raise Child As a Responsible Citizen)...
१. रुटीन सेट करा
मुलांना नियम पाळण्यासाठी आणि नियमित रुटीन पाळण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे. त्यामुळे त्यांना त्यांच्या मर्यादा लक्षात येण्यास मदत होते. तसेच नेमक्या वेळेला झोप, अभ्यास, खाणे-पिणे या गोष्टी केल्याने त्यांना अभ्यासाच्या आणि इतर चांगल्या सवयी लागण्यास मदत होते.
२. जबाबदारी घ्यायला शिकवा
मुलं ज्या गोष्टी करतात त्या गोष्टींची जबाबदारी घेण्यास शिकवणे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. यामुळे एखाद्या गोष्टीसाठी दुसऱ्यावर आरोप न करता स्वत: त्याची जबाबदारी घेणे अतिशय महत्त्वाचे असते. योग्य विकास होण्यासाठी तुम्ही लहानपणापासून लहान-मोठ्या गोष्टींची जबाबदारी घेणे अतिशय महत्त्वाचे असते.
३. संवादकौशल्याचे महत्त्व सांगा
संवाद हा तुमच्या वाढीतील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे कोणाशीही आनंदी रिलेशन निर्माण करण्यासाठी उत्तमरित्या संवाद साधणे अतिशय महत्त्वाचे असते. हा संवाद आपल्या कुटुंबियांशी, जोडीदाराशी, मुलांशी किंवा अगदी मित्रमैत्रीणींशी असू शकतो. मुलांशी तुमचा योग्यरितीने संवाद नसेल तर मुलेही तुमच्याशी त्या पद्धतीने संवाद ठेवू शकत नाहीत. याचा भविष्यात तुमच्या नात्यावर वाईट परीणाम होतो.
४. घरातील कामात सहभागी करा
घरातील कामांची जबाबजारी ही प्रत्येकाची असते याची जाणीव मुलांना करुन द्यायला हवी. मुलांची घरकामात मदत घेणे अनेकदा पालकांना लाजीरवाणे किंवा अपमानास्पद वाटू शकते. मात्र यामुळे मुलांना घरकामाची माहिती होते आणि लहानपणापासून घरात मदत करण्याची सवय लागते. यामुळे मुलांना शिस्त लागते आणि आपण घरासाठी काहीतरी केल्याचा फिल येतो.
५. लेबल लावू नका
कोणीही एखादी गोष्ट केली की आपण त्यांना त्या गोष्टीसाठी लेबल लावून रिकामे होतो. मुलांना अशाप्रकारे जज करणे योग्य नाही. त्यामुळे त्यांच्या सेल्फ एस्टीमला धक्का लागतो आणि त्यांचा आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलांनी एखादी लहानशी गोष्ट केली तरी त्यासाठी त्यांचे कौतुक करायला हवे. ती गोष्ट सेलिब्रेट करण्याने मुलांचे बळ वाढण्यास मदत होते.