- डॉ. राजेश कुलकर्णी
आपले मूल व्यवस्थित जेवत नाही आणि त्याची उंची किंवा वजन वाढत नाही अशी बऱ्याच पालकांची तक्रार असते. मुलांची शारीरिक वाढ अनेक गोष्टींवर अवलंबून असते. प्रामुख्याने आई-वडिलांची उंची व वजन, गरोदरपणात आईने घेतलेला आहार, बाळाचे जन्माच्या वेळीचे वजन, बाळाचा आहार व काही शारीरिक आजार या बाबींचा मुलांच्या शारीरिक वाढीवर परिणाम होतो. अनेकदा पालकांच्या बाळाच्या वजन किंवा उंचीबाबत अवाजवी अपेक्षा असतात. आता इंटरनेटवर अनेक वेबसाइट आहेत जिथे पालक आपल्या मुलांची वाढ व्यवस्थित आहे की नाही हे स्वतः तपासू शकतात. उदा. इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स (IAP) नेही अशाप्रकारचे एक मोबाईल अॅप्लिकेशन तयार केले आङे. पालकांना शंका असल्यास (Parenting Tips) आपल्या बालरोगतज्ज्ञांशी चर्चा करून मुलाची शारीरिक वाढ योग्य आहे की नाही, याची खात्री करून घेता येऊ शकते. बालरोगतज्ज्ञ मुलांची शारीरिक वाढ योग्य आहे की नाही, हे तपासण्यासाठी ग्रोथ चार्ट (Growth Chart) चा वापर करतात. ज्या मुलांची उंची किंवा वजन वाढत नाही आणि ज्यांना काही शारीरिक आजार नाही ( उदा. क्षयरोग, किडनीचा आजार, रक्त कमी असणे) त्यांच्या पालकांनी खालील साधेसोपे उपाय करावेत.
१. आहार
आईचे दूध हे बाळाच्या आहाराच्या सर्व गरजा पूर्ण करते, म्हणून पहिल्या सहा महिन्यांपर्यंत हे पूर्ण अन्न आहे.
६ ते ९ महिने - भाताची पेज, डाळीचे पाणी, मटणाचे सूप, नाचणीची किंवा डाळ, तांदळाची पेज, फळांचा रस द्यावा.
९ ते १२ महिने - वरण-भात, उकडलेला बटाटा दुधात कुस्करून, पोळी दुधात बारीक करून, फळे द्यावीत.
१ वर्षानंतर - एक वर्षानंतरचे मूल घरी सर्वांसाठी जे जेवण बनविले जाते ते खाऊ शकते (family pot feeding), अर्थात लहान मुलांना जेवण देताना त्यात मसाल्याचे, साखरेचे व मिठाचे प्रमाण बेताचे ठेवावे.
मुलांचा आहार संतुलित असणे महत्त्वाचे आहे. आहारामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट आणि व्हिटॅमिनची योग्य मात्रा असावी. रोज एकच प्रकारचे जेवण (पोळी-भाजी) करून मुलांना त्याचा कंटाळा येऊ शकतो. मुलांना त्यांच्या आवडीचे; परंतु पौष्टिक पदार्थ द्यावेत. भाजी-पोळी, वरण-भात अश्या पदार्थांतून मुलांना कार्बोहायड्रेट, प्रोटीन मिळते. दुधात व दुग्धजन्य पदार्थांमध्ये ( पनीर, दही) कॅल्शियम व प्रोटीनचे प्रमाण उत्तम असते. फळे आणि भाज्यांमध्ये फायबर व जीवनसत्त्वे (व्हिटॅमिन) भरपूर प्रमाणात असतात. अंड्यांमध्ये असे सगळे पदार्थ आहेत जे मुलांच्या वाढीसाठी आवश्यक असतात. वारंवार बाहेरचे पदार्थ (चोकलेट, बिस्कीट, चिप्स) खाल्ल्यामुळे मूल घरचे जेवण करीत नाही, त्यामुळे हे पदार्थ टाळावेत.
२. खेळ व व्यायाम
मुलांना मैदानी खेळ, दोरीवरच्या उड्या, योगासने, सायकलिंग, पोहणे यांचा खूप फायदा होतो. रोज कमीत कमी एक तास खेळणे मुलांच्या विकासासाठी खूप महत्त्वाचे आहे. खेळण्याने मुलांची भूक वाढते आणि अन्न पचन व्यवस्थित होते. स्नायूंच्या बळकटीसाठी तसेच व्यायामासाठी खेळणे महत्त्वाचे असते.
३. चांगली झोप
मुलांसाठी गाढ झोप निरोगी वाढीसाठी आवश्यक आहे. झोपेत मानवी वाढीचे संप्रेरक स्रवतात त्यामुळे पुरेशी झोप न मिळाल्यास, मुलांची योग्य दराने वाढ होऊ शकत नाही. आजकाल मोबाइलच्या अतिवापरामुळे मुलांची झोप व्यवस्थित होत नाही. त्यामुळे मोबाइलचा वापर कमीत कमी करावा व झोपण्यापूर्वी कमीत कमी दोन तास आधी मोबाइल किंवा कॉम्प्युटरचा वापर करू नये. मुलाची भूक किंवा वजन कमी झाल्यास अथवा त्यांना इतर लक्षणे असल्यास मात्र वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
(लेखक बालरोगतज्ज्ञ असून पीजीआय-वायसीएम रुग्णालयात सहयोगी प्राध्यापक, आहेत.)