Join us  

मुलं त्रास देतात, मोबाईल पहायला दिला नाही तर खातच नाही? त्यावर हा घ्या प्रभावी उपाय..

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2022 9:29 AM

Parenting Tips : फळे व भाज्या यांचा मुलांच्या रोजच्या जेवणात समावेश करायचा म्हणजे पालकांना नवनवीन प्रकार करणे भाग आहे.

मुले हा कुटुंबाचा, घराचा केंद्रबिंदू असतात. याचे एक महत्त्वाचे स्वाभाविक कारण म्हणजे मुलांचे पोषण. आज जेव्हा भारत स्थूलपणा व चयापचयसंबंधी आजारांचे प्रमाण सर्वाधिक असलेला देश बनत चालला आहे तेव्हा मुलांच्या पोषणाकडे गांभीर्याने लक्ष देणे अतिशय गरजेचे आहे. निरोगी आहाराच्या सवयींचा समावेश करण्याबाबत जेव्हा आपण विचार करतो तेव्हा या सवयी जास्तीत जास्त लहान वयापासून लावल्या जाणे आवश्यक असल्याचे जाणवते. आरोग्यासाठी हितावह गोष्टींची निवड करण्याचे शिक्षण मुलांना लहान वयापासूनच दिले गेले पाहिजे. नियती नाईक (क्लिनिकल डाएटिशियन कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई) यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (How to take care of child health)

संतुलित आहारावर सर्वाधिक भर दिला गेला पाहिजे. सूक्ष्म व बृहत पोषक घटकांचा सुयोग्य मेळ आणि कोणते खाद्यपदार्थ किती प्रमाणात खाल्ले जावेत यावर नियंत्रण ठेवण्याचे शास्त्र ही निरोगी भविष्याची अगदी साधीसोपी गुरुकिल्ली आहे. मुलांचे ताट निरोगी असावे म्हणजे काय, तर त्यामध्ये प्रथिने (अंडी, चिकन, दुग्धजन्य पदार्थ, कडधान्ये आणि डाळी), कार्बोहायड्रेट्स (संपूर्ण धान्यांमधून अधिक कॉम्प्लेक्स कार्ब्स व प्रक्रिया करण्यात आलेल्या खाद्यपदार्थांमधून कमी सिम्पल कार्ब्स, निरोगी फॅट्स (दाणे, बीजे) आणि योग्य प्रमाणात पाणी या सर्वांचा समावेश असला पाहिजे.  वेगवेगळ्या रंगांची फळे व भाज्या यांचा समावेश केल्याने मुलांच्या आहारात फायबर तर वाढतेच शिवाय सूक्ष्म पोषक तत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स देखील मिळतात. 

यामुळे मुलांच्या शरीरात कमतरता निर्माण होणे टाळले जाते व मुलांच्या कामगिरीत सुधारणा होते. फळे व भाज्या यांचा मुलांच्या रोजच्या जेवणात समावेश करायचा म्हणजे पालकांना नवनवीन प्रकार करणे भाग आहे.  भाज्यांच्या प्युरे बनवून, त्यांचा वापर करून आणि फळे आकर्षक आकारांमध्ये कापून देऊन तुम्ही मुलांसाठी रोजचे जेवण आकर्षक आणि आवडीचे बनवू शकता.

मुलांना भरवताना बरेच पालक खाण्याचा वापर बक्षीस किंवा शिक्षा म्हणून करतात आणि ही बाब मुलांच्या मनात कायमस्वरूपी राहते. या गोष्टीचे गांभीर्य ओळखून पालकांनी आपल्या या सवयी सोडून दिल्या पाहिजेत व सर्वात जास्त भर संतुलित आहारावर दिला पाहिजे. मुलांना खाण्याच्या निरोगी सवयी लावत असताना जंक व प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांचे प्रमाण खूप कमी करणे गरजेचे आहे.  ऑनलाईन फूड ऑर्डरींग ऍप्सचा जमाना आहे, त्यांच्या मार्केटिंग ट्रिक्स सुरु असतात, टेलिव्हिजनवरील जाहिराती या आगीत तेल ओतण्याचे काम करतात आणि मुले या सगळ्या प्रकारांना अगदी सहज बळी पडतात. जंक खाद्यपदार्थ दिसायला जरी आकर्षक असले तरी त्यामध्ये अति फॅट्स, भरपूर मीठ यामुळे कॅलरीज् खूप जास्त असतात.  त्यामुळे वाढत्या वयातच स्थूलपणा, चयापचय क्रियेतील असंतुलन या समस्यांना मुलांना सामोरे जावे लागू शकते.

निरोगी आहाराबरोबरीनेच शारीरिक हालचाली होत राहणे देखील मुलांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.  शारीरिक हालचालींमुळे स्नायू बळकट होतात आणि मुलांची शक्ती वाढते. स्थूलपणा, चयापचयाशी संबंधित आजार देखील शारीरिक सक्रियतेमुळे दूर राहतात.  सध्याच्या आधुनिक काळात मुलांमध्ये या समस्या वेगाने वाढत असल्याचे आढळून येत आहे, हे आजार गंभीर झाल्यास मुलांना मल्टी-डिसिप्लिनरी देखभाल व उपचार द्यावे लागू शकतात.

सध्याच्या काळात मुलांच्या आरोग्यासंदर्भात विचारात घेतला गेला पाहिजे असा अजून एक महत्त्वाचा घटक म्हणजे कॉफी, चहा आणि ऍरेटेड पेयांचे सेवन. ही पेये सहज उपलब्ध असतात त्यामुळे अगदी लहान वयापासून त्यांची सवय लागते.  या पेयांचे अति सेवन केल्याने शांत व पुरेशी झोप न लागणे, आकलनशक्तीमध्ये बिघाड या समस्या होऊ शकतात आणि या दोन्ही गोष्टी मुलांसाठी घातक आहेत.

सारांश असा की, सुसंतुलित आहार, भरपूर पाणी आणि शारीरिक हालचाली ही मुलांना निरोगी व आनंदी राखण्याची त्रिसूत्री आहे. पालकांनी माहितीसाठी व मार्गदर्शनासाठी तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

टॅग्स :सोशल व्हायरलपालकत्व