Join us  

मी मुलांना शिस्त लावायला जाते, पण घरातले बाकीचे; अशावेळी आईने नेमकं काय करावं, तज्ज्ञ सांगतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2022 2:39 PM

Parenting Tips : आपल्या मुलांना आपण शिस्त लावायची तर इतरांकडून काही अपेक्षा करण्यापेक्षा आपण त्यांच्यासाठी काय करु शकतो याचा विचार करायला हवा

ठळक मुद्देमुलांना सांभाळण्यात घरातील इतरांचा सहभाग नसेल तर आई म्हणून आपण काय करायला हवे..पालक म्हणून मुलांना सांभाळण्यात आपली भूमिका महत्त्वाची असते

मुलांना शिस्त लावणे किंवा त्यांना चांगल्या सवयी लहानपणापासून लावणे ही घरातील प्रत्येकाची जबाबदारी असते. कुटुंब लहान असेल तर ठिक आहे. पण एकत्र कुटुंब असेल तर मुलं प्रत्येकाच्या वागण्या-बोलण्याचं अनुकरण करत असतात. अनेकदा पालक म्हणून आपण मुलांना शिस्त लावतो पण घरातील इतर लोकांमुळे मुलं आपलं ऐकत नाहीत. आपण मुलांना मोबाईल पाहू दिला नाही की मुलं कधी आजी-आजोबांचे फोन घेऊन बसतात. मी मुलांना अजिबात चॉकलेट खाऊ देत नाही पण घरातील मोठे लोक त्याला सतत चॉकलेटस आणून देतात. अशावेळी आई म्हणून आपली चिडचिड होणे अतिशय स्वाभाविक आहे (Parenting Tips). 

मात्र अशाप्रकारे चिडचिड किंवा भांडण करुन त्याचा काहीच उपयोग होत नाही. अशावेळी आई म्हणून आपण काय करु शकतो हे समजून घेणे गरजेचे आहे. पॅरेंटींग डायरीज विथ प्रिती यामध्ये समुपदेशक प्रिती याविषयीच्या काही महत्त्वाच्या टिप्स आपल्याशी शेअर करतात. आपल्या मुलांना आपण शिस्त लावायची तर इतरांकडून काही अपेक्षा करण्यापेक्षा आपण त्यांच्यासाठी काय करु शकतो याचा विचार करायला हवा असे प्रिती यांचे म्हणणे आहे. यासाठी त्या महत्त्वाच्या टिप्स देतात. 

(Image : Google)

१. मोठ्यांना समजवा 

आपल्या घरात असणारे सासू-सासरे, आई-वडील यांना ते करत असलेली गोष्टी कशी चुकीची आहे त्याबाबत जास्तीत जास्त वेळा समजवा. शांतपणे आपले म्हणणे मांडले तर कदाचित ते त्यांच्यापर्यंत पोहोचू शकते. वाद घालण्यापेक्षा त्यांना समजून सांगितले तर त्यांना आपले म्हणणे पटेल. 

२. तुमचे म्हणणे मुलांसाठी जास्त महत्त्वाचे 

तुम्ही मुलांना काय सांगता हे इतर कोणापेक्षाही मुलांसाठी जास्त महत्त्वाचे असते. त्यामुळे आपण काय बोलतो आणि करतो हे मुलांसाठी जास्त महत्त्वाचे असते. त्यामुळे इतर गोष्टींकडे फोकस करण्यापेक्षा आपण मुलांशी कसे वागतो याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 

३. मुलांशी स्ट्रॉंग बॉंड ठेवा

तुमच्या मुलांशी तुमचा स्ट्रॉंग बॉंड असेल तर आजुबाजूला कितीही नकारात्मक वातावरण असेल तरी त्याचा मुलांवर तितका परीणाम होणार नाही. मुलांशी योग्य पद्धतीने आदरपूर्वक संवाद साधला तर मुलं आपलं म्हणणं समजून घेऊन त्याप्रमाणे वागतात. त्यामुळे आपलेही फ्रस्ट्रेशन कमी व्हायला मदत होईल. घरात आपले कोणाशी वाद झाले की घरातले वातावरण नकारात्मक होते. हे वातावरण मुलांसाठी चांगले नसते.

टॅग्स :पालकत्वलहान मुलं