दही म्हणजे प्रोटीनचा महत्त्वाचा स्त्रोत. एरवी आपण आहारात आवर्जून समावेश करतो. लहान मुलांनाही कधी पोळीसोबत तर कधी भाताशी आवर्जून दही खायला देतो. पण थंडीच्या दिवसांत दही द्यावे की नाही असा प्रश्न अनेक पालकांना पडतो. दही थंड असल्याने शक्यतो थंडीत दही देणे टाळले जाते. मात्र दही बऱ्याच मुलांना आवडते आणि तो प्रोटीनचा उत्तम स्त्रोत असल्याने योग्य प्रमाणात, योग्य वेळी खाल्लेले चांगलेही असते. अशावेळी नेमके काय करावे याबाबत ज्योती श्रीवास्तव काही महत्त्वाच्या टिप्स देतात. इन्स्टाग्रामवर त्यांचा लिटील चेरी मॉम नावाने चॅनेल असून त्या माध्यमातून त्या पालकांना मुलांना वाढवताना कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे याविषयी काही ना काही महत्त्वाच्या टिप्स देत असतात. त्याचप्रमाणे आता त्यांनी थंडीच्या दिवसांत मुलांना दही देण्याविषयी उपयुक्त अशी माहिती दिली आहे (Parenting Tips Is it Fine to Offer Curd to Kids in Winter).
१. सहा महिन्यानंतर आपण मुलांना वरचे अन्न सुरू करतो. त्यामुळे ६ महिन्याच्या पुढच्या मुलांना आपण दही नक्की देऊ शकतो.
२. फ्रिजमधून काढलेले गार दही मुलांना देऊ नका, तर सामान्य तापमानाचे दही थंडीत द्यायला हरकत नाही.
३. दही नुसते देण्यापेक्षा त्याला मोहरी, हिंग, हळद, कडीपत्ता याची फोडणी देऊन मग ते द्या. यामध्ये मिरपूड आणि काळे मीठ घातलेले आणखी चांगले.
४. दह्यामध्ये आवळा पावडर घालून त्याला वरुन फोडणी दिल्यास थंडीच्या दिवसांत प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी हा उत्तम उपाय ठरु शकतो.
५. दही देण्याऐवजी त्याच्या तिप्पट पाणी घालून त्याचे ताक केल्यास पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी हा उत्तम उपाय असतो. हे ताक आपण दररोज दिले तरी हरकत नाही. दही उष्ण असल्याने थंडीच्या दिवसांत ते द्यायला काहीच हरकत नाही हे समजून घ्या.
६. मुलांसाठी दही करताना ते साय असलेल्या दुधाचे बनवा, त्यामुळे दुधातील फॅटसही त्यांना मिळतील. तसेच या दह्यामध्ये तुम्ही दुधासोबत साय घातली तरी चालेल, त्यामुळे मुलांना जास्त पोषण मिळण्यास मदत होईल.
७. दही कधीच गरम करु नका. मुलांना सर्दी-कफ असेल तर अजिबात दही देऊ नका. तसेच दही आणि दूध एकत्र करुन देणे अजिबात योग्य नाही. त्यामुळे दही देताना या गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या.