मुलांना लहान वयात समोर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल कमालीचं कुतूहल असतं. बहुतांश गोष्टी ते अतिशय निरखून पाहताना, अनुभवताना पालक त्यांचे हावभाव अनेकदा टिपत असतात. पालकच त्यांना शिकवतात की हात दाखव, डोकं दाखव, डोळे दाखव. आणि त्यांनी दाखवले ते ते अवयव की खुश होतात. पण त्यांनी नाजूक जागांना हात लावला तर? बरीच लहान मुलं आणि मुलीही आपल्या प्रायव्हेट पार्टशी खेळत असताना, त्यांना सतत हात लावतात. पालक लगेच मुलांनी तसं केलं की त्यांना दटावतात. सतत तसं करु नकोस बाऊ होईल असं म्हणून ओरडतात. पण मुलांसाठी शरीराच्या अन्य अवयवांसारखाच तो एक अवयव असतो. त्याला का हात लावायचा नाही हे मुलांना कसं कळणार? समुपदेशक प्रिती यासंदर्भात काही महत्त्वाच्या टिप्स देतात (Parenting Tips Kids touch Private Parts).
पालकांनी काय करावं?
१. मुलांनी असं केलं की पालक म्हणून खूप काळजी वाटते,मात्र त्याची काहीच आवश्यकता नसते कारण असे करणे अतिशय नॉर्मल आहे हे लक्षात घ्यायला हवे.
२. वय वर्ष २ ते ५ वर्षे वयातील मुलं आपले शरीर नेमकं काय आहे हे तपासून पाहतात. या वयात मुलांनी असे करणे अगदीच ठिक आहे. या वयात त्यांना त्यांच्या आजुबाजूला असणारी प्रत्येक गोष्ट एक्सप्लोअर करायची असल्याने ते असं करतात.
३. या वयात मुलांना कुठे कुठे चढायला आवडतं, इलेक्ट्रीकच्या सॉकेटमध्ये बोटं घालायला आवडतं त्याचप्रमाणे आपल्या शरीराशी खेळायला आवडतं. प्रायव्हेट पार्टला हात लावल्यावर त्यांना चांगलं वाटलं तर ते तसं पुन्हा पुन्हा करत राहतात.
४. अशावेळी पालक त्यांना जोरात ओरडले तर मुलांना या गोष्टीबद्दल आणखी कुतूहल वाटेल आणि ते ती गोष्ट जास्त प्रमाणात करतील. किंवा मुलं कोषात जातील आणि आपल्या शरीराबद्दल त्यांना लाज वाटायला लागेल. मात्र हे दोन्ही योग्य नाही.
५. त्यामुळे ही गोष्ट करु नका असे मुलांना सांगताना अतिशय शांतपणे सांगायला हवी. असं करणं योग्य नाही हे त्यांना गोड भाषेत, प्रेमाने सांगायला हवे. काही दिवसात त्यांचा तो नाद कमी होतो.