Join us  

बाबाला बाळ का होत नाही? ४-५ वर्षांच्या मुलांच्या ‘नाजूक’ प्रश्नांना तुम्ही खरी उत्तरं देता की खोटी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2022 3:29 PM

Parenting Tips of How To Educate Kids about Sex Education : मुलांना लैंगिकतेमधला भेद समजावून सांगायला हवा पण कसा? कधी? आणि केव्हा?

ठळक मुद्देइतरांदेखत आपण कसं योग्य वागायला पाहिजे हे मात्र जरूर शिकवायला हवं. आईवडिलांचे लैंगिक संबंध मुलांच्या देखत होणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. यासाठी संबंधाची वेळ, जागा, याबाबत नियोजन करायला हवं. 

डॉ. लीना मोहाडीकर

आपल्याकडे मूल मोठं झालं की त्याला शालेय शिक्षण द्यायला सुरुवात केली जाते. इतर चांगल्या-वाईट गोष्टी शिकवल्या जातात, कला, क्रीडा, लेखनवाचनासह अनेक गोष्टींची आपण ओळख करुन देतो. पण लैंगिकता शिक्षणाबाबत आपण पालक म्हणून आपण तितके जागरुक असतोच असं नाही. लैंगिक शिक्षण अमुक वयापासून सुरू करावं असं सांगता येत नाही तर ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. बालक जन्माला आल्यानंतर तीन वर्षापर्यंत ते पूर्णपणे आईवडील आणि इतर नातेवाईक (एकत्र कुटुंब असेल तर) यांच्यावर अवलंबून असतं. अलीकडे कपड्यांच्या बाबतीत मुलगा-मुलगी भेद असा फारसा केला जात नाही. गंमत म्हणजे आपण मुलीला मुलाचे कपडे घालतो, पण मुलाला मुलीचे कपडे घालत नाही. लगेच आपला मुलगा बायल्या दिसेल अशी भीती आईवडिलांना वाटत असते. म्हणून आजूबाजूची मुलं मुली घालत असतील असे कपडे घालावे आणि ऋतूमानाप्रमाणे कपडे असावेत (Parenting Tips of How To Educate Kids about Sex Education). 

(Image : Google)

मूल शाळेत जाऊ लागलं की त्याला / तिला मुलगा-मुलगी यांच्या जननेंद्रियातला फरक कळू लागतो. मुलीला वाटू शकतं की त्या शेजारच्या मुलाची शूची जागा लांब आहे, मग माझी गळून पडली की काय? याबद्दल मुलीने पालकांना विचारलं तर काय सांगणार? तर एवढंच सांगावं की मुलगा-मुलगी म्हणजेच स्त्री –पुरुष, अशी दोन प्रकारची माणसं असतात. एवढं सांगणं पुरेसं आहे.  प्रजोत्पादनासाठी हा भेद निसर्गाने केला आहे एवढं अवघड  या ४-५ वर्षाच्या वयात स्पष्ट सांगण्याची गरज नसते. घरात पेट्स (pets)असतील तर मुलांना आपोआपच काही गोष्टी कळतात. मात्र आईवडिलांचे लैंगिक संबंध मुलांच्या देखत होणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. यासाठी संबंधाची वेळ, जागा, याबाबत नियोजन करायला हवं. 

२/३ वर्षांचं मोठं मूल झाल्यावर दुसरं बाळ घरात येणार असेल तर त्याबद्दलही पहिल्या मुलाची/मुलीची मानसिक तयारी करणं आवश्यक आहे. आईला नवीन बाळाकडे पूर्ण लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे मोठ्या मुलाला/मुलीला वडिलांची खूप जवळीक असेल तर त्या मुलाला/मुलीला एकटं पडल्याची भावना येणार नाही. दुसरं बाळ जन्माला आल्यानंतर आई त्याला स्तनपान करते हे मोठं मूल बघतचं. त्याबद्दल ही त्याचा प्रश्न असू शकतो की मी लहान असताना असचं दूध पीत होतो/होते का, तर त्याला व्यवस्थित उत्तर द्यावं की अगदी तान्ह्या मुलांसाठी ही सोय असते, तुलाही असचं दूध पाजलं होतं. यापुढे त्या मोठ्या मुलाची/मुलीची शैशवावस्था चालू झालेली असते, त्याचं कुतूहलही वाढत असतं. मुल पोटात कसं गेलं? बाहेर पोटं फाडून येतं का? बाबांना बाळ का होत नाही? वगैरे प्रश्न मुलं विचारु लागतात.  असे प्रश्न विचारल्यानंतर रागावून मुलाला गप्प करणं चुकीचं ठरतं.

(Image : Google)

आईच्या पोटात गर्भासाठी पिशवी असते, त्यात बाळ वाढतं. पुरेसं मोठं वाढल्यानंतर त्या पिशवीला तोंड असतं त्यातून ते बाहेर येतं. बाबांना अशी पिशवी दिलेली नाही, इतपत माहिती त्या मुलाला / मुलीला पुरेशी असते. पण कुतुहलावर विरजण पडलं तर इतर मोठ्या मुलांकडून चुकीची माहिती कळू शकते. या वयातली लहान मुलं लिंग / योनीला स्पर्श करून सुखद संवेदनांचा अनुभव घेत असतील तर त्याला हस्तमैथुन म्हणून प्रौढ लैंगिक संदर्भ देऊ नयेत, उगीच काळजी करू नये. त्याकडे दुर्लक्ष केलं तरी चालेल. मात्र इतरांदेखत आपण कसं योग्य वागायला पाहिजे हे मात्र जरूर शिकवायला हवं. 

(क्रमश:)

(लेखिका लैंगिकतातज्ज्ञ आहेत.)

टॅग्स :पालकत्वलैंगिक आरोग्यलहान मुलं