Join us  

शाळेचं नाव काढताच मुलं रडू लागतात, घाबरतात? शाळा सुरु होण्यापूर्वीच मुलांशी बोला ४ गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2023 10:50 AM

Parenting Tips Parenting of toddlers While Starting Schooling : शाळेसाठी शारीरिक तयारी करताना भावनिक तयारी सुद्धा तेवढीच महत्वाची आहे.

ऋता भिडे 

जून महिना चालू झाला की शाळेचे वेध लागायला सुरुवात होते. मुलांच्या बरोबरच पालकांना सुद्धा त्यांच्या वेळापत्रक त्यानुसार अनेक गोष्टी बदलाव्या लागतात. काही मुलांसाठी शाळेचा अनुभव पहिल्यांदाच येणार असेल, तसंच आपलं मूल शाळेमध्ये गेल्यावर नीट राहील का?, त्याला सगळ्या गोष्टी नीट समजतील का?, काही हवं असेल तर त्याला सांगता येईल का?, अशासारखे अनेक प्रश्न पालकांना पडणं साहजिक आहे. शाळेसाठी शारीरिक तयारी करताना भावनिक तयारी सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. मुलांना कोणताही नवीन अनुभव मिळत असताना त्यांच्या भावना या  मिश्र स्वरुपाच्या असतात (Parenting Tips Parenting of toddlers While Starting Schooling). 

काही मुलं रडतात, काही मोठ्याने ओरडतात, काही शाळेमध्ये जायचं नाही यासाठी असहकार पुकारतात म्हणजे कपडे न घालणे, नाश्ता न करणं वगैरे, तर काही मात्र छानपैकी शाळेमध्ये जातात आणि लगेच रमतात सुद्धा. मुलांना शाळेमध्ये गेल्यावर नवीन वातावरणाशी जुळवून घ्यायला वेळ लागतो. नवीन जागा, नवीन माणसं, शिस्त, वेळापत्रक, भाषा अशा अनेक गोष्टींबरोबर मुलांना जुळवून घ्यावं लागतं. याशिवाय एरवी आई किंवा घरातील इतर मंडळी करत असलेल्या काही गोष्टी शाळेत गेल्यावर मुलांना स्वतःच्या स्वतः कराव्या लागतात. मग हे सगळं समजून घ्यायला त्यांना थोडा वेळ द्यायला हवा ना. 

शाळेत जायला लागल्यावर मुलं अचानक वेगळं वागत असतील तर...

(Image : Google)

१. मुलांना स्वतःच्या गोष्टी घरामध्ये करायला शिकवणे- यामध्ये सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्वतःच्या हातानी खाता येणं, पाणी पिता येणं आणि बाथरूमला जाता येणं या आहेत, त्याचबरोबर गोष्टी बॅग मध्ये भरून ठेवणं, स्वतःच नाव सांगता येणं वगैरे गोष्टी सुद्धा महत्वताच्या आहे. अनेकदा पालक मुलांना शाळेमध्ये घालायचं आहे म्हणून त्यांच्या अभ्यासाकडे जास्त लक्ष देतात आणि या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात, पण अभ्यास मुलं शाळेमध्ये गेल्यावर शिकणारच आहेत. आपण मुलाला स्वतःच्या गोष्टी स्वतः करायला शिकवण्याकडे लक्ष द्यायला हवे. 

२. शाळेत सोडल्यावर आपण परत घ्यायला येणार आहे हा विश्वास देणं- अनेकदा मुलं घरातल्या व्यक्ती आपल्याला इथे सोडून गेल्यावरती परत येणार नाहीत या भीतीमुळेही रडतात. त्यामुळे आपण परत येणार आहोत असा विश्वास निर्माण करा. शाळा म्हणजे दुसरी जागा जिथे तुझी काळजी घेतली जाईल, खेळायला मिळेल, आई आणि बाबा परत येणार आहेत. तुम्ही मुलांना घ्यायला नक्की कधी येणार हे स्पष्ट सांगा, खोटं बोलणं टाळा. 

(Image : Google)

३. मुलांना शाळा म्हणजे अभ्यास हे न सांगता शाळा म्हणजे नवीन गोष्टी शिकण्याची जागा हे समजावून सांगा- हे सांगताना नुसतं बोलून समजणार नाही त्यासाठी तुम्ही शाळा शाळा खेळू शकता. आजूबाजूच्या मुलांना एकत्र करुन किंवा घरी सुद्धा तुम्ही शाळा शाळा खेळू शकता. 

४. बाकी मुलं शाळेमध्ये जाताना तुमच्या मुलाला दाखवा - तुमची मुलं जर बसने किंवा व्हॅनने शाळेमध्ये जाणार असतील तर शाळा चालू होण्याआधी इतर मुलं शाळेमध्ये बसने जात असताना तुमच्या मुलांना दाखवा. जमल्यास त्यांना बसमध्ये किंवा व्हॅनमध्ये सुद्धा बसवा. 

(लेखिका समुपदेशक आणि मेंदू व भाषाविकासतज्ज्ञ आहे.)

rhutajbhide@gmail.com

 

 

टॅग्स :पालकत्वलहान मुलंशाळा