Join us  

मुलांना सांभाळताना पालकच चिडतात, संतापतात, पेशंसच संपला म्हणतात? २ गोष्टी, पेशंस ही वाढेल आणि आनंदही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2022 5:08 PM

Parenting Tips Patience in Parenting : पालक म्हणून आपण एखाद्या परिस्थितीला किंवा मुलांनी केलेल्या गोष्टीला कसे रिअॅक्ट होतो?

ठळक मुद्देकाही काळ सतत या गोष्टींचा सराव केला आणि रोज स्वत:ला त्या सांगत राहिल्या तर काही काळाने आपल्याला त्या नक्कीच जमू शकतात.आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे पालक म्हणून आपले काम आहे.

लहान मुलांना सांभाळणे म्हणजे अतिशय पेशन्सचे काम असते. आपल्या हरकतींनी आणि करामतींनी मुलं आपल्या संयमाची अनेकदा परीक्षाच घेत असतात. पण अशावेळी आपण संयम सोडून वागलो तर त्याचा त्यांच्या वाढीवर चुकीचा परिणाम होतो आणि मुलं जास्त हट्टी किंवा हेकेखोर होतात. त्यामुळे आपल्याला मूल होणार हे कळल्यापासूनच आपल्याला अनेकांकडून आता पेशन्स वाढव, बघ काही दिवसांत तुझे पेशन्स इतके वाढतील अशी वाक्ये अगदी सहज कानावर पडतात. मुलांशी पेशन्स ठेवून वागायचे म्हणजे नक्की काय करायचे? प्रत्यक्ष जेव्हा संयम राखण्याची वेळ येते तेव्हा आपला स्वत:वर खरंच ताबा राहतो का? पालक म्हणून आपण एखाद्या परिस्थितीला किंवा मुलांनी केलेल्या गोष्टीला कसे रिअॅक्ट होतो हे पाहणे महत्त्वाचे आहे. पॅरेंटींग डायरीज विथ प्रिती या इन्स्टाग्राम पेजवरुन प्रिती सातत्याने पालकांना काही ना काही महत्त्वाच्या टिप्स देत असतात. त्याचप्रमाणे आताही त्या अतिशय महत्त्वाची आणि आजुबाजूला घडणारी नेहमीच्या गोष्टीबाबत सांगतात. मूल जेव्हा जोरजोरात रडते, ओरडते तेव्हा प्रामुख्याने २ गोष्टी करायला हव्यात (Parenting Tips Patience in Parenting).

१. प्रतिक्रिया देण्यासाठी वेळ घ्या

अनेकदा मूल खूप जोरजोरात ओरडते, किंचाळते, रडते. अशावेळी लगेच प्रतिक्रिया देण्याची घाई न करता काही वेळाने प्रतिक्रिया द्यायला हवी. अशावेळी आपला इगो मधे आणून तू माझ्याशी असं कसं बोलला, मोठ्यांशी किंवा पालकांशी बोलायची ही पद्धत झाली का असं सगळं आपण अतिशय रागाने किंवा तावातावाने बोलतो. मात्र तसे करण्यापेक्षा मधे थोडा वेळ घ्या. यामुळे मूल असं का वागतंय हे समजून घ्यायला वेळ मिळेल आणि आपल्याला काही वेळा मुलांना ओरडल्याचा किंवा मारल्याचा गिल्ट येतो तोही येणार नाही. आता अशाप्रकारे प्रतिक्रिया लांबवणे आपल्याला लगेच जमेलच असे नाही तर काही वेळाने, थोडी प्रॅक्टीस केल्यानंतर आपल्याला हे जमू शकते. 

 

२. समर्थन करणे थांबवा 

अनेकदा मुल असे वागले मग मला राग येणे स्वाभाविक होते, त्याने तसे केल्यावर माझा हात उगारला जाणारच ना असे आपण अगदी सहज म्हणतो. म्हणजेच आपण आपल्या प्रतिक्रियेचे समर्थन करत असतो. मात्र अशाप्रकारे समर्थन करणे पालकत्त्वाच्यादृष्टीने योग्य नाही. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे पालक म्हणून आपले काम आहे. मुलांना ओरडल्याने, मारल्याने काहीच फरक पडत नाही. उलट त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडते. आपण पालक असल्याने आपला स्वत:वर ताबा असणे गरजेचे आहे. या दोन्ही गोष्टी आज ऐकल्या आणि लगेच जमल्या असे नाही. पण काही काळ सतत या गोष्टींचा सराव केला आणि रोज स्वत:ला त्या सांगत राहिल्या तर काही काळाने आपल्याला त्या नक्कीच जमू शकतात. त्यामुळे आपली पालकत्त्वाची भूमिका नक्कीच सोपी होऊ शकेल. 

टॅग्स :पालकत्वलहान मुलं