लहान मूल म्हणजे मातीचा गोळा असतो, त्याला जसा आकार देऊ तसं ते घडत जातं. मुलांची पहिली ५ ते ७ वर्षँ अतिशय महत्त्वाची असतात. त्यांना आपण ज्या सवयी लावू, जसे संस्कार करु तसे आयुष्यभर त्यांच्यासोबत राहतात. यामुळे आपण लहानपणी त्यांना खाण्या-पिण्याच्या, स्वच्छतेच्या किंवा इतरही अनेक चांगल्या सवयी लावतो. मात्र मुलांच्या मानसिकतेकडे आपलं काही वेळा दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. पण मुलांच्या मनावर काही ना काही गोष्टींचे सतत दडपण असण्याची शक्यता असते. आणि वेळीच आपण हे दडपण दूर केले नाही तर भविष्यात त्यांना मानसिक ताणतणावाला सामोरे जावे लागू शकते. लहानपणीच मुलांना योग्य त्या सवयी लावल्या नाहीत तर भिती, निराशा, एकटेपणा अशा समस्यांना ते सामोरे जातात (Parenting Tips).
५० टक्के मुलांना वयाच्या १ वर्षापासून मानसिक समस्या असण्याची शक्यता असते. तर ७५ टक्के मुलांना त्यांच्या वयाच्या २० व्या वर्षी मानसिक अडचणींना तोंड द्यावे लागते. जी मुले आपल्या वयाच्या इतर मुलांसोबत खेळतात त्यांचे मानसिक आरोग्य अधिक चांगले असते असे केंब्रिज विद्यापीठात झालेल्या एका अभ्यासातून समोर आले आहे. इतरांसोबत खेळण्याने त्यांच्या अनेक क्षमता नकळत विकसित होतात आणि त्यांचा ताण कमी होण्यास मदत होते. त्यामुळे मुलांचे शिक्षण, आरोग्य, आहार यांबरोबरच मुलांच्या मानसिक आरोग्याचीही लहान वयापासून पालकांनी योग्य पद्धतीने काळजी घ्यायला हवी असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यासाठी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचे ते पाहूया.
१. भावना ओळखणे आणि व्यक्त करणे
अनेकदा मुलांना आपल्या भावना कशा व्यक्त करायच्या हे लक्षात येत नाही. विशेषत: राग आल्यावर एखादी वस्तू फेकणे, आदळआपट करणे असे सर्रास केले जाते. मात्र असे न करता रागावर नियंत्रण कसे ठेवायचे. चिडचिड झाली तरी शांत राहण्यासाठी काय करायचे या गोष्टी मुलांना लहान वयापासूनच शिकवायला हव्यात. त्याचा मोठेपणीही त्यांना चांगला फायदा होतो आणि ते आपल्या भावना योग्य पद्धतीने व्यक्त करु शकतात.
२. नेमकं रुटीन असायला हवं
रोजचं एक विशिष्ट रुटीन असणं मुलांच्या मानसिक वाढीसाठी अतिशय गरजेचे असते. जेवण्याचे, झोपण्याचे, खेळण्याचे नेमके रुटीन असेल की अमुक वेळेला अमुक गोष्ट करायची असते हे त्यांच्या डोक्यात पक्के बसते. त्यामुळे त्यांची जीवनशैली आरोग्यदायी होते आणि त्याचा त्यांच्या मनावर आणि शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. कोणत्याही वेळेला काहीही करायची सवय असेल तर मुलांना तशीच सवय लागते आणि जसजसे ते मोठे होतात तशी ही सवय अवघड पडते.
३. क्षमता आणि कौशल्ये विकसित करणे
मुलांना आपण शालेय शिक्षण देतो त्याचप्रमाणे त्यांना व्यवहार ज्ञानही शिकवणे आवश्यक आहे. समाजात वावरताना लोकांशी कसे बोलायचे, वागायचे याचे ज्ञान त्यांना असेल तर त्यांचे काम अडणार नाही. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी मुलांना सक्षम बनवणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यासाठी त्यांना विविध कौशल्ये लहानपणापासूनच शिकवायला हवीत.
४. संधी देणे
मुले जेव्हा स्वत:चे स्वत: काही गोष्टी करतात तेव्हा नकळत त्यांचा आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे मुलांना काही गोष्टी करुन बघण्याची, लहानमोठ्या जबाबदाऱ्या घेण्याची सवय असायला हवी. यामुळे माणूस म्हणून त्यांचा चांगला विकास होण्यास मदत होईल आणि भविष्यात त्यांना अडचणी येणार नाही. रोजच्या आयुष्यात लहानमोठ्या गोष्टी कशा करायच्या हे मुलांना कळले तर मोठेपणी ते अनेक गोष्टींचे निर्णय घेणे, स्वत:च्या स्वत: गोष्टी करणे हे करु शकतात.
५. कल्पकतेला वाव द्या
लहान मुलांमध्ये अनेक गोष्टींबाबत उत्सुकता असते. त्यांची कल्पनाशक्तीही अफाट असते, आपल्याला विश्वास बसणार नाही अशा गोष्टी ते अनेकदा आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर करत असतात. त्यामुळे मुलांना जास्तीत जास्त मोकळीक देणे, त्यांचे अवकाश विस्तारणे हे गरजेचे असते. त्यामुळे मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देणे आवश्यक आहे.