मूल वाढवणे हे वाटते तितके सोपे नाही. एकवेळ मुलांना जन्माला घालणे सोपे आहे पण त्यांना उत्तम व्यक्ती म्हणून घडवणे, स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम करणे, व्यवहारज्ञानाच्या गोष्टी शिकवणे, त्यांच्यावर उत्तम संस्कार करणे या सगळ्या गोष्टी वाटतात तितक्या सोप्या नाही. त्यांच्यापुढे विविध गोष्टींची कवाडं उघडी करत असताना पालकांनी त्यांच्यावर आपले म्हणणे लादू नये. मुलांवर पालक म्हणून अधिकार गाजवणे, त्यांना सतत धाकाखाली ठेवणे किंवा यांसारख्या विविध गोष्टींमुळे मुले कोमेजतात. मुलांना आपली दहशत किंवा अडचण न वाटता आपण त्यांच्या सोबत आहोत हे वाटणे महत्त्वाचे. यासाठीच मुलांचे संगोपन करताना सगळ्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष देणे आवश्यक असते. पालकत्त्वाची भूमिका निभावताना पालकांनी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी (Parenting Tips) , याबाबत प्रसिद्ध उद्योजिका आणि लेखिका सुधा मूर्ती काही मुद्दे आवर्जून सांगतात, ते खालीलप्रमाणे...
१. प्रत्येकाचे स्वप्न वेगळे असते. अनेकदा आपल्याला अमुक एक गोष्ट करायला जमली नाही म्हणून माझ्या पाल्याने ती करायला हवी अशी आपली अपेक्षा असते. करिअरच्याबाबतीत अनेकदा आपण त्याप्रकारचे सल्ले मुलांना देतो. पण त्यांची आवड वेगळी असू शकते, ती समजून घेऊन त्यामध्ये त्यांना मार्गदर्शन करा. मात्र तुमचे म्हणणे त्यांच्यावर लादल्याने मुले आपल्या इच्छा-आकांक्षा विसरुन जाऊ शकतात.
२. आयुष्यात पैसा हेच सर्वस्व नाही हे मुलांना पटवून द्या. पैशाच्या पलिकडे बरेच मोठे जग आहे जे आपल्याला असंख्य गोष्टी शिकवते, मात्र मुले लहान असल्याने त्यांना यातील महत्त्व कळत नसते. एखाद्या मित्राने महागडी खेळणी किंवा उंची कपडे आणले की मुलांनाही तेच हवे असते. मात्र त्यातील फोलपणा मुलांना वेळीच समजावून सांगा.
३. मुलांनी एखादी गोष्ट आपल्याला मागितली तर त्यांना ती लगेच घेऊन देऊ नका. त्यामुळे मुलांना आपण मागेल ते मिळते अशी सवय लागू शकते. त्या गोष्टीची आता खरंच गरज आहे का याचा अभ्यास करा आणि मूल फारच हट्ट करत असेल तर काही वेळ गेल्यानंतर मुलांना ती गोष्ट आणून द्या. म्हणजे त्यांनाही त्याचे महत्त्व कळेल.
४. मुलांशी मोकळेपणाने संवाद साधणे ही अतिशय उत्तम गोष्ट असते. मुलांच्या मनात काय चालले आहे हे समजून घ्यायचे असेल तर मुलांशी भरपूर गप्पा मारणे हा उत्तम उपाय आहे. मुलांना रोजच्या जीवनात येणाऱ्या अडचणी आणि त्यांना विविध गोष्टींतून मिळणारा आनंद समजून घेण्यास यामुळे मदत होईल. यामुळे मुलांच्या आवडी-निवडी समजण्यास तर मदत होईलच पण आपले मूल कोणत्या पद्धतीने विचार करते हेही समजणे पालकांना सोपे जाईल. त्यामुळे मुलांशी जास्तीत जास्त संवाद साधणे आवश्यक आहे.
५. तुम्ही मुलांना आदर दिलात तर तेही नकळत तुमचा आदर करतील. ते लहान असतील तरी त्यांना आदराने वागवा, ती गोष्ट ते नोटीस करतात आणि लक्षात ठेवतात. तसेच घरातील व्यक्तींनी एकमेकांशी आदराने वागणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे मुलांना आदर द्यायचा असतो हे वेगळे सांगावे लागणार नाही तर तुमच्या कृतीतून तो त्यांच्यापर्यंत पोहचू शकेल.