आपल्यााल ज्याप्रमाणे राग सहन होत नाही त्याचप्रमाणे लहान मुलांनाही अनेकदा राग सहन होत नाही. रागच नाही तर भावनांवर नियंत्रण नसणे आणि त्या योग्य पद्धतीने व्यक्त न करता येणे यामुळे मुलांची काहीवेळा मानसिक आणि भावनिक ओढाताण होते. याचाच परीणाम मुलांच्या वागण्यात दिसून येतो. लहान मुलांना ताण नसतात असं आपल्याला वाटत असतं पण आई-वडीलांचे एकमेकांशी असलेले संबंध, त्यांना आई-वडीलांचा मिळत असलेला वेळ किंवा शाळा, पाळणाघर, त्याठिकाणची इतर मुले या आणि अशा अनेक गोष्टींचा मुलांच्या मनावर ताण येत असतो (Parenting Tips To deal with child Hitting and biting).
बऱ्याच गोष्टी मुलं मोकळेपणाने बोलू शकत नसल्याने ते वागण्यातून हा ताण व्यक्त करतात. बरेचदा मुलं लहान सहान गोष्टींवरुन आई-वडीलांवर, बहिण-भावंडांवर किंवा अगदी घरातील कोणावरही हात उगारतात. काही वेळा त्यांची मजल चावण्यापर्यंतही जाते. अशावेळी पालक म्हणून आपला स्वत:वर ताबा राहत नाही आणि आपण मुलांवर रागावतो, हात उगारतो प्रसंगी कडक शिक्षाही करतो. मात्र याचा म्हणावा तसा उपयोग होतोच असे नाही. त्यामुळे अशावेळी पालकांनी नेमकं काय करायला हवं ते समजून घेऊया...
१. मुलांची अशी कोणती गरज आहे का जी पालक म्हणून आपल्याकडून भागवली जात नाहीये, ते शोधण्याचा प्रयत्न करा आणि त्यासाठी योग्य ती पाऊले उचला.
२. मुलांना दात येत असतील तरी त्यांची चिडचिड होते आणि ते अशाप्रकारचे चुकीचे वागू शकतात. त्यामुळे हे कारणही लक्षात घ्या.
३. मुलं काही कारणाने पालकांपासून डिसकनेक्ट झाली असतील, त्यांना आपल्याच पालकांसोबत असुरक्षित वाटत असेल तरीही असे होऊ शकते.
४. आपण मुलांकडे पुरेसे लक्ष देत नसल्याने लक्ष वेधून घेण्यासाठी मुलं असं करतात का याकडेही लक्ष द्या.
५. स्वत:चे एखाद्या व्यक्तीपासून, परिस्थितीपासून संरक्षण करण्यासाठी मुलं अशाप्रकारे मारत किंवा चावत नाहीत ना हे पाहायला हवे.
६. आपल्या जवळच्या व्यक्तीला कोणीही कोणत्याही प्रकारची हानी पोहोचवू नये म्हणून बरेचदा मुलं हात उगारण्याचा किंवा चावण्याचा स्टँड घेऊ शकतात.