Join us  

आई, बोअर होतंय काय करु? मुलांच्या या प्रश्नाचं उत्तर देण्याची जबाबदारी आईबाबांची नाहीच कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2023 6:28 PM

Parenting Tips to Encourage Child to Be Self Entertained : मुलांना बोअर होऊ नये म्हणून सतत आईबाबा त्यांना रेडिमेड उत्तर सुचवतात, खेळणी देतात.. पण त्यामुळे होतं भलतंच.

मुलांना कंटाळा आला की सतत त्यांच्यासाठी आपण किंवा काहीतरी अॅव्हेलेबल असावं असं पालकांना वाटत राहतं. त्यामुळे मुलं थोडं कंटाळा आला म्हटली की आपण त्यांच्या दिमतीला ४ पर्याय समोर उभे करतो. सुट्टीच्या दिवसांत तर यामुळे मुलं दर काही वेळाने बोअर होतंय, कंटाळा आला या गोष्टींचा जप करत राहतात. अशावेळी मुलांना सतत नवीन काय द्यायचं असा प्रश्न आई वडीलांसमोर पडतो. एरवी ऑफीस आणि घरकाम यामुळे आपण मुलांना वेळच देत नाही हा गिल्ट मनात असतोच (Parenting Tips to Encourage Child to Be Self Entertained) .

त्यामुळे मग वेळ मिळेल तेव्हा मुलांशी खेळणे, गप्पा मारणे किंवा त्यांना बाहेर कुठेतरी घेऊन जाणे असे काही ना काही तरी पालकांकडून आवर्जून केले जाते. त्यांना सतत रेडीमेड पर्याय देण्यापेक्षा त्यांना बोअर झाल्यावर किंवा कंटाळा आल्यावर त्यांना काहीतरी शोधू द्यायला हवं. त्यामुळे मुलांना स्वत:ची जबाबदारी स्वत: घेण्याची सवय तर लागेलच आणि त्यांचा विकास होण्यासही त्याची चांगली मदत होईल. इन्स्टाग्रामवर आस्था या आपल्या माईंडफुल पॅरेंटींग या पेजवरुन त्याविषयीच काही महत्त्वाच्या टिप्स शेअर करतात. यामध्ये त्या नेमक्या काय सांगतात पाहूया ...

१. मुलांची खेळण्याची जागा अव्यवस्थित करा. त्यांच्या आजुबाजूला कमीत कमी खेळणी आणि पुस्तके ठेवा. तसेच वेळच्या वेळी ही खेळणी आणि पुस्तके बदलत राहा. यामुळे मुलांची निर्णय क्षमता वाढण्यास आणि त्यांचा तार्किक कारणमिमांसा चांगली होण्यास मदत होते. 

२. मुलांना खेळण्यासाठी मोठ्यांची आवश्यकता लागणार नाही अशा प्रकारची खेळणी घ्यायला हवी. अशा खेळण्यांमुळे मुले आपल्यावर अवलंबून राहतात आणि त्यांना सतत आपल्या अटेंशनची आवश्यकता लागते. त्यामुळे मुलांना खेळायला प्रोत्साहन देणारी अशी खेळणी घ्यायला हवीत.

३. कोणत्याही गोष्टीसाठी मुलांना आपली मदत हवी असेल तर अतिशय घाईने धावत जाऊन ती मदत करणे योग्य नाही. तुम्ही सतत मुलांवर लक्ष ठेवून असाल आणि त्यांनी हाक मारल्यावर धावत जाऊन त्यांची मदत करत असाल तर मुलांना तुमच्या सततच्या मदतीची सवय लागेल आणि त्यामुळे ते आपल्या गोष्टी आपण करण्यास असमर्थ राहतील. त्यामुळे त्यांना स्वत:ची मदत स्वत: करु द्या. 

४. अनेकदा आपल्याला स्वत:साठी किंवा आणखी काही करण्यासाठी वेळ हवा असेल तर आपण मुलांच्या हातात मोबाइल देतो. पण असे करणे योग्य नाही. असे करणे मुलांच्या विकासासाठी अजिबात योग्य नाही. 

५. मुलांना खाणे, कपडे घालणे आणि इतर दैनंदिन व्यवहार करण्यासाठी प्रोत्साहन द्या. त्यामुळे मुले स्वतंत्र होतील आणि आपल्या गोष्टी आपण केल्यामुळे मुलांना आनंद मिळेल तो वेगळाच.