Join us  

वाढीच्या वयात मुलांनी ‘पिस्ते’ का खायला हवेत? सर्वांगिण वाढीसाठी मदत करणारा खाऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2023 5:47 PM

Parenting Tips: मुलं जंक फूड खातात अशी तक्रार करण्यापेक्षा मुलांना पौष्टिक आणि चविष्ट खाऊचा पर्याय द्यायला हवा.

मीनाक्षी पेट्टुकोला

शाळा सुरु झाल्या. शाळेत जाताना मुलांच्या डब्याचे वेळापत्रक सांभाळले जावे आणि त्याबरोबरच मुलांच्या पोटात पौष्टिक अन्न जावे अशी पालकांची इच्छा असते. मुलांनी पौष्टिक पदार्थ खावेत असंही पालकांना वाटतं. पण तेलकट-कुरकुरीत पदार्थांचा मोह पडत असताना मुलांना पौष्टिक आणि आवडेल असं काय द्यायचं? उत्तर सोपे आहे- सुकामेवा. बदाम, पिस्त्यासारखे सुकामेव्यातील पदार्थ कुरकुरीतही असतात आणि पोटभरीचेही असतात! पिस्ते हा पौष्टिक खाऊ आहे. दोन जेवणांमधील भूक भागवण्यासाठी हा खाऊ उपयुक्त आहे. पिस्ते खाल्ले तर मुले जेवणापूर्वी किंवा दोन जेवणांच्या मध्ये जंक फूड खाणार नाहीत किंवा अतिरिक्त आहारही घेणार नाहीत. 

पौष्टिक खाऊ म्हणून सुक्यामेव्याची निवड का केली पाहिजे?

युनायटेड स्टेट्स फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनने (एफडीए) सुक्यामेव्याला हृदयासाठी आरोग्यकारक अन्न म्हणून मान्यता दिली आहे. एफडीएच्या म्हणण्यानुसार, “संपृक्त मेद व कोलेस्टेरॉल कमी असलेला आहार म्हणून, पिस्त्यासारखे बहुतेक सुकेमेवे दररोज १.५ आउन्सेस (सुमारे ४२ ग्रॅम्स) एवढ्या प्रमाणात, खाल्ल्यास हृदयविकाराचा धोका कमी होतो हे शास्त्रीय पुरावा म्हणून सिद्ध झाले नसले, तरी तसे संकेत संशोधनात मिळाले आहेत.” सॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण कमी असलेल्या आहाराचा भाग म्हणून दररोज पिस्ते खाल्ल्यास पालकांसाठी आणि मुलांसाठी चविष्ट तसेच हृदयासाठी आरोग्यकारक खाऊ ठरेल.

पिस्त्याच्या प्रत्येक सर्व्हिंगमध्ये सहा ग्रॅम प्रथिने असतात! मुलांना चिप्सचे पॅकेट किंवा कॅण्डी खायला देण्याऐवजी पिस्ते खायला दिल्यास त्याच्या आरोग्यासाठी ते लाभदायी ठरते. संपृक्त मेदाने व साखरेने भरलेल्या खाऊला पिस्ते हा उत्तम पर्याय आहे. कारण, पिस्त्यांमध्ये प्रथिने, कर्बोदके आणि असंपृक्त मेदाचा उत्तम समतोल असतो.

पिस्ते मुलांसाठी चविष्ट खाऊ का आहेत?

पिस्ते चविष्ट तर असतातच, शिवाय ते खाल्ल्यास पोटही भरते. कवच फोडून त्यातील पिस्ते काढून खाणे हा मुलांसाठी मजेशीर खेळ होऊ शकतो. कॅलिफोर्निया पिस्टॅचिओजमध्ये तुम्हाला प्रत्येक सर्व्हिंगमध्ये सुमारे ४९ पिस्ते मिळतात. जेवण असो, अभ्यास असो किंवा एकंदर आयुष्याचा दर्जा असो, तुमच्या मुलाला सर्वकाही सर्वोत्तम मिळावे म्हणून एक पालक म्हणून तुम्ही नेहमीच प्रयत्नशील असतात. म्हणून मुलांच्या दैनंदिन आहारात सुक्यामेव्याचा समावेश केला, तर त्यांचे आरोग्य आयुष्यभर चांगले राहील आणि ती आनंदी राहतील. लहानपणापासून चांगल्या अन्नाच्या सवयी मुलांना लावल्या तर त्यांच्या भविष्यकाळातील आहाराच्या सवयीही उत्तम राहतील.

(लेखिका पोषणतज्ज्ञ आणि आरोग्यविषयक सल्लागार आहेत.)