मुलांना पौष्टीक खायला घालणं हा आईसमोरचा एक मोठा टास्क असतो. जंक फूड, बिस्कीटं आणि बाहेरचे पदार्थ यांपासून मुलांना दूर ठेवायचं आणि त्यांना घरातलं, फळं, भाज्या यांसारख्या गोष्टी खायला घालायच्या हे एक आव्हान असते. पण लहानपणापासून चांगलं खायची सवय असेल तर दिर्घकाळ मुलांची तब्येत चांगली राहण्यासाठी त्याचा उपयोग होतो. नाहीतर शरीराचे पुरेसे पोषण न झाल्याने सतत आजारी पडणारी आणि आरोग्याच्या तक्रारी असलेली मुलं आपण आजुबाजूला पाहतोच. थंडीच्या दिवसांत तर मुलांना जास्त ऊर्जेची आवश्यकता असते. या काळात शरीराचे पोषण चांगले व्हावे आणि तब्येत सुधारावी यासाठी मुलांच्या आहारात काही ठराविक गोष्टींचा समावेश करायला हवा. पाहूया थंडीच्या दिवसांत मुलांच्या आहारात असायलाच हवेत असे काही खास पदार्थ (Parenting Tips Winter Diet for Children’s 5 Super foods for kids)...
१. गूळ
मुलं अनेकदा गोड खायला मागतात. एनर्जी डाऊन झाल्यावर त्यांना गोड खावेसे वाटते. अशावेळी त्यांना पॅकेट फूड किंवा सतत चॉकलेट आणि काहीतरी देण्यापेक्षा गूळ द्यावा. त्यामुळे एनर्जी तर मिळतेच. पण गुळामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन बी १२, बी ६, फोलेट, कॅल्शियम, आयर्न आणि इतरही बरीच खनिजे असल्याने गूळ खाणे थंडीच्या दिवसांत अतिशय फायदेशीर ठरते.
२. आवळा
आवळा हे फळ अँटीऑक्सिडंटचा उत्तम स्त्रोत आहे. थंडीच्या दिवसांत होणारा ताप, सर्दी खोकला यांपासून सुटका होण्यासाठी आवळा खाणे अतिशय फायदेशीर ठरते. तसेच पचनाशी निगडीत तक्रारी दूर होण्यासाठीही आवळ्याचा अतिशय चांगला उपयोग होतो.
३. रताळी
रताळं म्हणजे उपवासाला खाण्याचा पदार्थ अशी आपली धारणा असते. मात्र रताळी आपण एरवीही खायला हवीत. व्हिटॅमिन, फायबर याचा उत्तम स्त्रोत असलेले रताळे बटाट्याला उत्तम पर्याय ठरु शकते.
४. आंबट फळे
संत्री, मोसंबी, द्राक्षे यांसारखी आंबट फळे थंडीच्या दिवसांत आवर्जून खायला हवीत. यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असल्याने प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी या फळांचा अतिशय चांगला उपयोग होतो. त्यामुळे थंडीत आंबट फळांचा आहारात समावेश असायलाच हवा.
५. खजूर
खजूर गोड असल्याने त्वरीत ऊर्जा मिळण्यास या फळाचा उपयोग होतोच. पण हार्मोन्सचे संतुलन राखले जावे, जळजळ कमी व्हावी आणि प्रतिकारशक्ती चांगली राहावी यासाठी खजूर खाणे फायदेशीर ठरते. दररोज २ ते ३ खजूर बिया मुलांना खायला दिल्यास त्याचा चांगला फायदा होतो.