एकापेक्षा जास्त म्हणजेच २ मुलं असतील तर त्यांना वाढवताना पालकांची होणारी ओढाताण अनेक घरांमध्ये दिसते. लहान मुलाचा जन्म झाला की नकळत मोठ्या मुलाला बऱ्याच बाबतीत तडजोड करावी लागते. घरातील मंडळींकडून त्याला वारंवार तसे सांगितलेही जाते. तो लहान आहे, तू मोठा किंवा मोठी आहेस मग अमूक वस्तू लहानाला दे. त्याला खेळूदे, त्यानी असं केलं तर तू मोठा आहेस म्हणून तू समजून घ्यायला हवे, शहाण्यासारखे वागायला हवे (Parenting Tips growing 2 children's at a time).
हा ताण मोठ्या मुलावर नकळत पालकांकडून आणि इतरांकडूनही टाकला जातो. पण प्रत्यक्षात आपण मोठे म्हणत असलेले मूलही खरंच मोठे असते का, त्याने मोठे असावे हा त्याचा चॉईस असतो का, त्यात त्याची काही चूक असते का. मग त्यालाच कायम का तडजोड करायला सांगितली जाते असा प्रश्न वयाने मोठ्या असलेल्या मुलांच्या मनात नकळत येतो. तुम्हीही २ मुलांचे पालक असाल आणि मोठ्याला तडजोड करायला सांगत असाल तर पॅरेंटींग कोच आंचल जिंदाल काही महत्त्वाच्या टिप्स देतात.
नेमकं होतं काय?
लहान मुलांने काही मागितलं की आपण नकळत मोठ्याला म्हणतो दे त्याला तो लहान आहे. मोठ्याने ते दिलं नाही की लहान मूल लगेच रडारड करतं. मग पालक नकळत त्याला ती गोष्ट देतात. यामुळे रडल्यानंतर मला सगळं मिळतं असा त्या लहानग्याचा समज होतो आणि पुढे तो प्रत्येक गोष्टीसाठी तसंच करतो.
याचा २ मुलांच्या नात्यावर काय परीणाम होतो ?
अशाप्रकारे सतत मोठ्याला तडजोड करायला लावल्याने मुलांच्या नात्यावर त्याचा नकळत परीणाम होतो. कारण मोठ्या मुलाला वाटतं आपली आई किंवा बाबा कायम लहान मुलाच्याच बाजुने असतात. यामुळे मोठं मूल लहान मुलासोबत खेळणार तर नाहीच पण त्याच्यासोबत कोणती गोष्ट शेअर करणेही त्याला आवडणार नाही. यामुळे नकळत २ भावंडांमध्ये फूट पडायला इथूनच सुरुवात होईल.
मग पालाकांनी काय करायला हवं?
मोठं मूल एखाद्या खेळण्याशी खेळत असेल आणि लहान मूल ते खेळणं मागत असेल. तर पालकांनी नेमकं काय करावं याबाबत आंचल जिंदाल सांगतात, मोठ्या मुलाला ते खेळणं देण्यासाठी पालकांनी जबरदस्ती करु नये. लहान मूल रडत असेल तर त्याला प्रेमाने समजवा तरीही ऐकत नसेल तर त्याला काही वेळ रडू द्या. पण म्हणून मोठ्या मुलाने लहानाने मागितलेली प्रत्येक गोष्ट द्यायलाच हवी असा अट्टाहास करु नका. त्याचा दोन्ही मुलांच्या मानसिकतेवर आणि त्यांच्या नात्यावर दिर्घकालिन वाईट परीणाम होतो हे लक्षात घ्या.