Lokmat Sakhi >Parenting > पालकांना मुलांची सुटी कटकट का वाटते? एकीकडे ऑफिसमध्ये रजा मिळत नाही, दुसरीकडे मुलं दिवसभर घरीच..

पालकांना मुलांची सुटी कटकट का वाटते? एकीकडे ऑफिसमध्ये रजा मिळत नाही, दुसरीकडे मुलं दिवसभर घरीच..

पालकांना सुटी नसते, वेळ नसतो. मुलं सुटीत घरी एकेकटी, अशावेळी करायचं काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2024 06:03 PM2024-04-23T18:03:31+5:302024-04-23T18:39:37+5:30

पालकांना सुटी नसते, वेळ नसतो. मुलं सुटीत घरी एकेकटी, अशावेळी करायचं काय?

parents and kids holiday, how to manage kids in vacation what activities should plan? time management, how to balance work | पालकांना मुलांची सुटी कटकट का वाटते? एकीकडे ऑफिसमध्ये रजा मिळत नाही, दुसरीकडे मुलं दिवसभर घरीच..

पालकांना मुलांची सुटी कटकट का वाटते? एकीकडे ऑफिसमध्ये रजा मिळत नाही, दुसरीकडे मुलं दिवसभर घरीच..

Highlightsनेक उपक्रमातून पालकांचे मुलांबरोबर नाते आणखी सुदृढ होते. आणि पालक यातून स्वत: बरंच काही शिकतात हाही एक फायदा आहेच.

-रंजना बाजी (सहज शिक्षण विषयाच्या अभ्यासक)

मुलांची परीक्षा संपून सुट्या सुरू होणं ही आजकाल मुलांसाठी गंमत पण पालकांसाठी टेंशनची गोष्ट झाली आहे. त्यामुळे मुलांना वेगवेगळ्या छंद वर्गांना पाठवलं जातं आणि तिथं गेल्यानं त्यांचा वेळ सत्कारणी लावला, अशी पालकांची समजूत होत जाते. बऱ्याचदा यात मुलांना अडकवणे ही गोष्ट जास्त महत्त्वाची असते. त्यातून मुलाला काही कौशल्ये मिळाली का, त्याला मुळात या गोष्टीची आवड आहे का, हे नगण्य होत जातं. ज्या घरात दोन्ही पालक दिवसभराच्या नोकरीवर जातात त्यांना मुलं घरात एकटी काय करत असतील याची काळजी वाटत राहते. घरात वायफाय, टीव्ही अशा सोयी असतात. अशावेळी आपण घरात नसताना मुलं त्यांचा गैरवापर तर करणार नाहीत ना याचीसुद्धा भीती वाटत राहते. त्यामुळं मुलांना घराबाहेर व्यस्त ठेवण्याकडे पालकांचा कल असतो.

या प्रश्नाकडे थोडं वेगळ्या सखोल पद्धतीनं बघायला पाहिजे, असं वाटतं. पालकत्व ही एक प्रक्रिया आहे. यात पालकांनी मुलांचं निरीक्षण करत राहणं, त्यांना काय आवडतं, काय नाही, त्यांचा कोणत्या कौशल्याकडे कल आहे, हे समजून मुलांना त्या प्रकारच्या गोष्टी करायला उद्युक्त करणं, त्यांची मानसिकता समजून घेणं या आणि इतर अनेक गोष्टी येतात. मुळात मुलाच्या लहानपणापासूनच त्याच्याशी संवाद ठेवणे गरजेचे आहे. त्यातून मोठ्यांना मूल समजतेच. त्याचबरोबर मुलालासुद्धा आपल्याला काय पाहिजे याबद्दल स्पष्टता येत जाते.

(Image :google)

होतं काय?

१. पूर्वीच्या काळी मुलं सुटीत नातेवाईकांकडे जात. तिथली मुलं आणि गावाहून गेलेली मुलं एकत्र बाहेर भटकणं, थिएटरमध्ये चांगले चित्रपट बघणं, घरात दुपारी बैठे खेळ तर बाहेर मैदानी खेळ खेळणं अशा अनेक गोष्टी करत. एकत्र जेवत. यात मोठे लोक प्रत्यक्ष भाग घेत नसत, पण त्यांचं लक्ष असे. मुलांना काही वस्तू लागल्या तर त्या उपलब्ध करून देत. ही एक मोठी सपोर्ट सिस्टम मुलांना सहज उपलब्ध असे. मुलांच्या खेळण्यात, फिरण्यात पैशाची गरज फारशी नसे.
२. आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे. एक तर सहज ज्यांच्या घरी जावं असे जवळचे नातेवाईक कमी झालेत. मुलांना लागतील त्या खेळायच्या वस्तू आईवडील लगेच आणून देतात. त्यामुळं मुलांचं परिसरात उपलब्ध असलेल्या सामानातून स्वत:ला लागतील ती खेळणी बनवणं बंद झालं आहे. पण त्याचा तोटा म्हणजे मुलांची सृजनशीलता कमी झाली आहे.

मग पालक काय करू शकतात?

१. मुलांच्या सुटीच्या दरम्यान शक्य असेल तर एखाद्या पालकाने सुटी घेऊन घरी रहावे. मुलांना घरातच त्यांना हव्या त्या गोष्टी करू द्याव्यात. मुलांना गरज असेल तर आणि तरच त्यांच्याबरोबर त्या कामात सामील व्हावे. पालकांनी घेतलेल्या या सुटीमध्ये स्वत:चे काही छंद असतील तर त्या गोष्टी करत राहावे. मुलांसमोर मग ते एक उदाहरण राहते.
२. परंपरागत नातेवाईकांच्या जागी एका परिसरात राहणारी, वेगवेगळ्या वयोगटातली मुलं असलेली कुटुंबं एकत्र येऊ शकतात. एकमेकांच्या घरी राहायला जाणे, एकत्र प्रवास करणे, एकमेकांशी जोडून असणे यातून एक वेगळी जीवनपद्धती सुरू होऊ शकते. नोकरी न करणारे पालक अशा मुलांना आपल्याकडे ठेवू शकतात, नोकरी करणारे पालक आळीपाळीने सुट्या घेऊन त्यात सामील होऊ शकतात.
३. एकत्र प्रवास करणे, वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव घेणे उदा. एकत्र स्वयंपाक, एकत्र जेवण, एकत्र छंद जोपासणे.. यात मुलांना पाहिजे तो अवकाश मिळू शकतो. एक मूल असलेल्या कुटुंबातल्या मुलांनासुद्धा अशा वेळी इतरांबरोबर राहायची संधी मिळू शकते. दुसऱ्यांसाठी काम करणे, वस्तू शेअर करणे, एकमेकांना मदत करणे ही मूल्ये जोपासली जाऊ शकतात.
४. यासोबतच मुलांना जीवन कौशल्ये आत्मसात करण्याची संधी या सुटीत उपलब्ध करून देता येते. मुलांनी स्वत:ची कामं स्वत: करणं, आंघोळीनंतर कपडे धुणे, घराची स्वच्छता करणे, दुकानातून वस्तू आणणे आणि स्वयंपाकात भाग घेणे इ. यातून मुलं स्वावलंबी होत जातात.

(Image :google)

५. मुलांनी स्वयंपाकात भाग घेणे खूप गरजेचे आहे. यात मुलं खरं तर शास्त्र, भाषा, गणित अशा अनेक गोष्टी शिकतात. भाजीत किती तिखट, मीठ याचा अंदाज हाही गणिताचा भाग आहे. मुलांची ज्ञानेंद्रिये पुन्हा ताजी-तवानी करण्यात स्वयंपाकाची खूप मदत होते. वास, रंग, चव, स्पर्श या सगळ्यांच्या मदतीने तर स्वयंपाक होत असतो.
६. त्याचबरोबर मुलांना घरातल्या वेगवेगळ्या दुरुस्त्या करताना सोबत घेता येते. थोडेफार फाटलेले कपडे पुन्हा शिवून घेणे, बटन लावणे या गोष्टी करता येणे खूप महत्त्वाचे आहे.
७. या काळात मुलांच्याबरोबर देश-विदेशातल्या चांगल्या फिल्म्स बघू शकतो. आपल्या शेजारी किंवा मित्र मंडळीत कोणी परभाषिक असतील तर त्यांची भाषा सहजपणे शिकू शकतो. वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाऊ शकतो. गावाबाहेर जाणकार व्यक्तींच्या बरोबर ट्रेक, जंगल बघणे, प्रत्यक्ष शेतात जाऊन प्रसंगी तिथे राहून शेतीबद्दलची माहिती घेऊ शकतो.

८. मुलं जर एकटीच घरात राहणार असतील तर त्यांना आवडीच्या गोष्टी करायचा टास्क दिवसभरासाठी देता येतो. संध्याकाळी घरी आल्यावर त्याबद्दल साधी चर्चा करता येते. काय केलं, कसं केलं, त्यातून काय काय समजलं हे बोलता येतं. मुलांना अगदी साध्या टास्कपासून सुरुवात करून त्याची काठीण्य पातळी वाढवत नेत मुलांच्या क्षमता वाढवता येतात.

९. मुलांना मॉल किंवा तत्सम ठिकाणी नेऊन सतत त्यांचे आनंद पैशाशी न जोडता बिन-पैशाचे असे आनंद किती तरी असतात याची ओळख मुलांना करून देता येते. अशा अनेक उपक्रमातून पालकांचे मुलांबरोबर नाते आणखी सुदृढ होते. आणि पालक यातून स्वत: बरंच काही शिकतात हाही एक फायदा आहेच.

dranjana12@gmail.com

Web Title: parents and kids holiday, how to manage kids in vacation what activities should plan? time management, how to balance work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.