माधुरी पेठकरवयात येणाऱ्या मुलांना, तरुण मुलांना समजून घेणं ही साधी गोष्ट नाही. जगभरातल्या पालकांसाठी तर नाहीच नाही. दक्षिण कोरियातही अनेक पालक या आव्हानाला तोंड देत आहेत. जीन योंग हे ही ५० वर्षांची महिला. आपल्या २४ वर्षांच्या मुलाला समजून घेण्यासाठी तिने स्वत:ला ३ दिवस एकांतवासात कोंडून घेतले. जगापासून तुटून एकांतात राहून काय वाटतं हे जीनने प्रत्यक्ष अनुभवलं. कारण गेली तीन वर्षे तिच्या मुलाने स्वत:ला बेडरुममध्ये कोंडून घेतलं आहे. जगाशी संपर्कच तोडून एकांतवासात राहणाऱ्या आपल्या मुलाला नेमकं काय वाटत असेल याचा अनुभव जीनने घेतला.
पार्क हान सिन ही महिला. तिच्याही २६ वर्षांच्या मुलाने गेल्या ७ वर्षांपासून स्वत:ला जगापासून तोडून टाकत एकांतवास स्वीकारला आहे. या काळात त्याला व्हिडीओ गेम्स खेळण्याची सवय लागली आहे. आपला मुलगा असं का वागतो? हे समजून घेण्यासाठी पार्कने स्वत:ला जगापासून तोडत चार भिंतींत कोंडून घेतलं. या एकांतवासात पार्कला समजलं की आपल्याला समजून घेणारं कोणी नाही, असं वाटून त्यावर उपाय म्हणून ही मुलं अशी स्वत:ला कोंडून घेतात.दक्षिण कोरियातील जीन, पार्क यांच्यासारख्या अनेक आया, वडील आपल्या मुलांच्या एकांतवासाचं कारण समजून घेण्यासाठी, मुलांशी संवाद कसा साधावा हे समजून घेण्यासाठी ‘हॅपीनेस फॅक्टरी’मध्ये येतात. हॅपीनेस फॅक्टरी म्हणजे अशी जागा जिथे माणसं स्वत:ला जगापासून तोडून आजूबाजूला फक्त भिंती असलेल्या एका खोलीत स्वत:ला कोंडून घेतात. या खोलीच्या भिंतीला असलेल्या एका छोट्याशा छिद्राद्वारे त्यांना बाहेरचं थोडंसं जग दिसत असतं. बाहेरच्या जगाशी आतल्या माणसाचा हा एवढाच संपर्क.
आज दक्षिण कोरियातील एकूण लोकसंख्येच्या ५ टक्के लोक (१९ ते ३४ वयोगटातील ५ लाख ४० हजार मुलं) यांनी स्वत:ला समाजापासून तोडून टाकलंय. आपली मुलं अशी का वागताहेत याचा अंदाजच पालकांना येत नव्हता, ते कळावं म्हणून एका समाजसेवी संस्थेनं १३ आठवड्यांचा एक प्रशिक्षण कार्यक्रम एप्रिल २०२४ पासून सुरू केला. या प्रशिक्षण कार्यक्रमात एकांतवासाचा पर्याय निवडणाऱ्या मुलांचे पालक मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहेत.ही हॅपीनेस फॅक्टरी त्यांना उत्तरं शोधायला मदत करेल का, माहिती नाही!