Lokmat Sakhi >Parenting > आई-बाबा सतत बिझी आणि मुलांच्या वाट्याला अस्वस्थ एकाकी नैराश्य, उपाय काय?

आई-बाबा सतत बिझी आणि मुलांच्या वाट्याला अस्वस्थ एकाकी नैराश्य, उपाय काय?

वयात येणाऱ्या मुलांच्या वर्तन बदलांकडे पालक दुर्लक्ष करतात आणि ऐन तारुण्यात मुलांना अनेक प्रश्न छळतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2024 18:06 IST2024-12-11T17:56:50+5:302024-12-11T18:06:35+5:30

वयात येणाऱ्या मुलांच्या वर्तन बदलांकडे पालक दुर्लक्ष करतात आणि ऐन तारुण्यात मुलांना अनेक प्रश्न छळतात.

Parents are constantly busy and kids lonely, disturbed, self image problems-what's the solution? | आई-बाबा सतत बिझी आणि मुलांच्या वाट्याला अस्वस्थ एकाकी नैराश्य, उपाय काय?

आई-बाबा सतत बिझी आणि मुलांच्या वाट्याला अस्वस्थ एकाकी नैराश्य, उपाय काय?

Highlightsमुलांमध्ये होणारे चांगले-वाईट वर्तन बदल, नकारात्मक लक्षणं समजून घेऊन त्यावर काम करायला हवे.

सायली कुलकर्णी ( मानसोपचारतज्ज्ञ)

गार्गी, पुण्यात राहणारी २२ वर्षांची तरुणी. आपल्या मावशीसोबत माझ्याकडे कौन्सिलिंगसाठी आली. रात्री लवकर झोप लागत नाही, अनेक विचार मनात येत राहतात, खूप एकटं एकटं वाटत राहतं, संध्याकाळी विनाकारण रडू येतं, मधेमधे पॅनिक अटॅक्सही येतात. या आणि अशा अनेक समस्यांची यादी तिने माझ्यापुढे मांडली.

गार्गी आणि तिच्या मावशीशी सविस्तर बोलत असताना तिच्या समस्यांशी निगडित काही महत्त्वाचे घटक माझ्या लक्षात आले.
गार्गी ही एकुलती एक मुलगी. गार्गीच्या आई आणि बाबा दोघांच्याही कामाच्या वेळ जास्त. त्यात त्यांचा गार्गीबरोबर भावनिक संवादाचा अभाव. गार्गीला सांभाळण्यासाठी नियुक्त केलेल्या मावशी सारख्या बदलत असत. पुण्यामधल्या एका मोठ्या सोसायटीत त्यांचा टुमदार बंगला होता. आजूबाजूला मात्र समवयस्क मित्र-मैत्रिणीही नव्हते. गार्गी अभ्यासात तशी जेमतेमच होती. एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीजसाठी आणण्या-नेण्याचा प्रश्न कायमचाच, त्यामुळे त्यातही विशेष प्रगती नाही. टीव्ही बघण्याचं लागलेलं अत्याधिक वेड. एक प्रकारचं तासन्तास टीव्ही बघत राहणं हे तिचं वाढीच्या वयातलं व्यसनच होतं.
तिच्याशी बोलता बोलता लक्षात यायला लागलं की, प्रश्न फक्त एवढाच नव्हता.

अगदी पहिलीत असल्यापासूनच गार्गीला मोठ्या भिंगाचा चष्मा लागला होता. त्यामुळे वर्गातील मुलं-मुली तिला चिडवत. बॉडी शेमिंगचा अनुभव तर तिला सतत येत होता. इयत्ता सहावीत असताना वर्गातील मुलींकडून इमोशनल बुलिंगचाही त्रास तिला झाला. भरीसभर म्हणून तिचे केस सोडणं, ते ओढणं, बेंचवरून तिला खाली ढकलणं, बुक्क्या मारणं यांसारख्या फिजिकल बुलिंगचा त्रास झाला.

हे सारं तिनं आईबाबांना सांगितलं नाही का. तर तिने प्रयत्न केला, पण त्यांना त्यातलं गांभीर्य कळलं नसावं किंवा त्यांनी फारसं लक्ष दिलं नसावं. त्यामुळे या अनुभवांबाबत आईबाबांशी बोलण्याचा तिनं केलेला प्रयत्नही फोलच गेला.
ती मोठी होत हाेती. शरीर बदलांमुळे होणाऱ्या बोधनिक- भावनिक आंदोलनांचा हा काळ.
अगदी आठवीपासूनच ऑफलाइन-ऑनलाईन प्रकारे ‘आपलं कोणीतरी असावं’ यासाठी तिने केलेले, थोडाच काळ टिकून राहण्यात यशस्वी ठरलेले अनेक प्रेमप्रयत्न. यातून पदरात पडलेली निराशा, एकटेपण…
आणि त्यानंतर आता तरुण झालेली गार्गी.
विशेष कोणतेही छंद-कौशल्य आत्मसात करू न शकणारी, स्वप्रतिमेचा अभाव असणारी, भावनिकदृष्ट्या अस्वस्थ, एकाकी पडलेली २२ वर्षांची तरुणी माझ्यापुढे हताश होऊन बसलेली होती. तिला या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी सायकोथेरपीच्या आधारे विविध मार्ग शिकवत आहे. तिचे प्रश्न सुटतीलही.
पण राहून राहून मनात अनेक प्रश्न फेर धरतात. की असं का झालं?

तिचं असं का झालं?

१. गार्गीच्या टीनेजमधले तिचे हे सारे प्रश्न कोणी ओळखू शकलं असतं तर? त्याचवेळी गार्गीसाठी कौन्सिलिंगचा आधार घेतला गेला असता तर?
२. गार्गीच्या आई-बाबांसोबत फॅमिली थेरपीचे सेशन घेऊन त्यांच्यातला संवाद, नातं सुधारता आलं असतं तर?
३. गार्गीला असरटिव्हनेस ट्रेनिंग, संवाद कौशल्य यांसारखे सोशल स्किल्स् शिकवले गेले असते तर?
४. विचारांचे निगेटिव्ह पॅटर्न सुधारून तिची स्वसंकल्पना वेळीच सुधारली गेली असती तर? .
५. असे बरेच जर-तर फक्त उरले. कारण आपल्या मुलांना होणारे त्रास पालक वेळेत ओळखत नाहीत. त्यावर काम करत नाहीत किंवा त्यासाठी मदत मागत नाहीत.

६. आज सगळ्याच पालकांना सांगावेसे वाटते की, मुलांना कसला आलाय ताण, त्यांचे कसले भावनिक प्रश्न असं म्हणू नका. वर्तनबदल दिसले तर मदत घ्या. मुलांकडे लक्ष द्या.
७. चपलेत अडकलेला, अस्वस्थ करणारा एखादा खडा वेळीच काढून टाकला तर प्रश्न सुटतो नाहीतर तो पायाला मोठी जखम करून जात नाही. असंच मानसिक, भावनिक समस्यांचंपण असतं.
८. वेळीच या समस्या योग्यपद्धतीने हाताळल्या, सोडवल्या नाही तर त्या व्यक्तिमत्त्वाचे मोठे नुकसान करतात.
९. प्री टीनेज, टीनेजमधल्या आपल्या मुलांच्या केवळ भौतिक गरजाच नाही तर मानसिक- भावनिक गरजांबाबतही पालकांनी जागरूक असणं महत्त्वाचं आहे.
१०. मुलांमध्ये होणारे चांगले-वाईट वर्तन बदल, नकारात्मक लक्षणं समजून घेऊन त्यावर काम करायला हवे. त्यासाठी तज्ज्ञांची मदत घेण्यातही काहीच कमीपणा नाही. उलट मुलांच्या भवितव्यासाठी, सर्वांगीण वाढीसाठी ते फायद्याचं ठरेल.

sayaliskulkarni@gmail.com

Web Title: Parents are constantly busy and kids lonely, disturbed, self image problems-what's the solution?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.