Lokmat Sakhi >Parenting > शाळेत जाण्याचा मुलांनाही ‘स्ट्रेस’ येतो हेच पालकांना पटत नाही! आईबाबांचं चुकतं ‘ते’ हेच कारण..

शाळेत जाण्याचा मुलांनाही ‘स्ट्रेस’ येतो हेच पालकांना पटत नाही! आईबाबांचं चुकतं ‘ते’ हेच कारण..

शाळा सुरू होताना मुलांना हव्या त्या वस्तू दिल्या म्हणजे पालकांची जबाबदारी संपत नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2024 05:56 PM2024-06-18T17:56:07+5:302024-06-18T17:57:55+5:30

शाळा सुरू होताना मुलांना हव्या त्या वस्तू दिल्या म्हणजे पालकांची जबाबदारी संपत नाही !

Parents don't understand that children have 'stress', school anxiety cause problems for kids | शाळेत जाण्याचा मुलांनाही ‘स्ट्रेस’ येतो हेच पालकांना पटत नाही! आईबाबांचं चुकतं ‘ते’ हेच कारण..

शाळेत जाण्याचा मुलांनाही ‘स्ट्रेस’ येतो हेच पालकांना पटत नाही! आईबाबांचं चुकतं ‘ते’ हेच कारण..

Highlightsपालकांनी मोकळा आणि समजून घेणारा संवाद ठेवला तर मुलांसाठी शाळा आनंददायी होईल.

डॉ. श्रुती पानसे (लेखिका मेंदूअभ्यास तज्ज्ञ आहेत.)

शाळा सुरू होते. मुलांनापण वरच्या इयत्तेत जाण्याचा खूप उत्साह असतो. नवनवीन वस्तू घेतल्यामुळे तर हा आनंद द्विगुणित झालेला असतो. बघायला गेलं तर केवळ वस्तूच नाहीत, त्यांच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी बदलणार असतात. अनेकदा मुलांचे मित्र-मैत्रिणी बदलतात. नेहमीच्या मित्र-मैत्रिणी भेटणार नाहीत ही हुरहूर असतेच. त्याबरोबर नव्या वर्गातल्या नव्या मित्र -मैत्रिणींशी जुळवून घ्यायचं असतं. अनोळखी असणाऱ्यांशी मैत्री करायची असते. कदाचित एक दोघांशी मैत्री करून बघणं, त्यातून जमलं तर ठीक, नाहीतर नवीन मैत्री शोधावी लागते. हा एक महत्त्वाचा बदल घडतो. या बदलातून पहिले एक-दोन महिने मुलं जात असतात.

१. मूल एका इयत्तेतून वरच्या इयत्तेत जातं. तेव्हा साहजिकच अभ्यास वाढतो. अभ्यास अधिक अवघड होतो. शिक्षक अनेकदा नवे असतात. शिक्षकांचं वागणं मैत्रिपूर्ण असेल तर मुलांना फारशी अडचण येत नाही. पण तसं नसेल तर तिथेही नव्या शिक्षकांशीदेखील जुळवून घ्यायचं असतं.
२. खूप चांगले गुण मिळवणाऱ्या काही मुलांचे गुण पहिल्या तिमाहीत कमी होतात. नव्या वर्गात मुलं अजून मनाने स्थिर होत आहेत. मनाने स्थिर झाल्याशिवाय अभ्यासातली गती पकडता येत नाही. या काळात त्यांना समजून घेणं आवश्यक आहे. अभ्यासातलं नक्की काय समजत नाही, हे शोधून त्यांना मदत करायला हवी.
यातून त्यांच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारचं धाडस येतं. नव्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता वाढते.

शाळा सुरू होताना पालकांनी मुलांशी काय बोलावं?

‘घर शाळेत गेलं पाहिजे आणि शाळा घरात आली पाहिजे’, असं विनोबा म्हणायचे. शाळा सुरू होताना मुलांशी असं काही बोलता येईल.
१. ‘वरच्या वर्गात जाणं म्हणजे आपण एक पायरी पुढे जाणं. आपण मागच्या वर्षांपेक्षा थोडंसं मोठं होणं. आता नवे मित्र-मैत्रिणी असतील, त्यांच्याशी तू मैत्री करशील. नवे मित्र मैत्रिणी आधीच्या मित्र-मैत्रिणींसारखे असतील किंवा नसतीलही. खरं तर नवी मैत्री होणं ही खूप मस्त गोष्ट असते. मी शाळेत असताना मला असं वाटायचं की, आता यावर्षी माझ्या बाकावर कोण असेल? आमची मैत्री होईल की नाही? बाकावर पट्टीने उभी रेघ तर नाही मारावी लागणार? पण असं झालं नाही. दरवर्षी नवे मित्र-नव्या मैत्रिणी मिळायच्या. त्यातल्या किती जणांची अजूनही भेट होते. तुला तर माहितीच आहे.’
२ ‘तुला शिकवायला सगळेच शिक्षक नवे नसतील, पण काही नवे असतील. ते शिकवतील तो विषय तुझ्यासाठी कदाचित नवा नसेल, पण थोडा बदललेला असेल किंवा नव्या वर्षात एक संपूर्ण नवा विषय तुला समजेल. आधीच्या विषयाबरोबरीने या नव्या विषयाचाही छान अभ्यास करूया आणि तो पहिल्यापासून करूया. अगदी पहिल्या तासापासून.
३. सगळ्याच विषयांचा अभ्यास अगदी पहिल्या दिवसांपासून करूया. एकतर घरी आल्यावर आज जे काही शिकवलेलं आहे ते स्वत:हून वाचायला घ्यायचं. आज शिकवलेली गणितं आजच पुन्हा आपापली सोडवून बघायची. अभ्यासातलं जे काही मजेशीर वाटेल, नवीन माहिती कळेल, ते सांगायचं. अवघड वाटेल तेही सांगायचं.’

४. ‘तुम्हाला प्रत्येक धड्याखाली जे वेगवेगळे उपक्रम दिलेले असतात, ते खूपच वेगळा विचार करायला लावणारे असतात. मागच्या वर्षी खूप नाही, पण त्यातले काही आपण काही केले. विज्ञानातले, भूगोलातले. या वर्षी आपण जरा नेटाने ठरवून जास्त उपक्रम करूया. अगदी जमतील तेवढी करूया किंवा असं करूया का प्रत्येक महिन्याला जे शिकवलं जातंय त्यातलं काय काय आपल्या सगळ्या मिळून करता येईल ते आधी ठरवूया. ते उपक्रम करण्यात सगळ्यांना मजा येते आणि अभ्यास न करताही आपला अभ्यास होऊन जातो.’
५. पालकांनी असा मोकळा आणि समजून घेणारा संवाद ठेवला तर मुलांसाठी शाळा आनंददायी होईल.

drshrutipanse@gmail.com

Web Title: Parents don't understand that children have 'stress', school anxiety cause problems for kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.