मुलांना वाढवणं ही पालकांसाठीही एक शिकण्याची प्रक्रिया असते. मुलांच्या बौद्धिक, शारीरिक, मानसिक वाढीशी जुळवून घेताना अनेकदा पालक म्हणून आपलाही कस लागण्याची शक्यता असते. काही वेळा आपण मुलांवर प्रमाणापेक्षा जास्त प्रेम करतो, अमुक गोष्ट आपल्याला मिळाली नाही म्हणून त्यांना ती मिळायला हवी असं आपल्याला वाटत असतं. वेळ देऊ शकत नाही म्हणून आपण त्यांनी केलेल्या अनेक मागण्या अगदी सहज पूर्ण करतो. पण असे करणे मुलांच्या आणि पर्यायाने आपल्या भवितव्यासाठी घातक असू शकते. म्हणूनच मुलांचे संगोपन करताना ३ गोष्टींकडे आपण आवर्जून लक्ष द्यायला हवे. त्या कोणत्या पाहूया (Parents Should Avoid These 3 Mistakes Parenting Tips) ...
१. ओव्हर प्रोटेक्टीव्ह होऊ नका
मुलांवर आपलं प्रेम असल्याने आपण नकळत त्यांच्या बाबतीत खूप प्रोटेक्टीव्ह होतो. मुलांना अपयश येऊ नये त्यांना कोणता सेट बॅक बसू नये अशी आपली इच्छा असते. मात्र असे करणे मुलांसाठी फायद्याचे नसते. मात्र एखाद्या परिस्थितीशी जुळवून घेणे, स्वातंत्र्य आणि लवचिकता हे तिन्ही अतिशय महत्त्वाचे गुण असून ते आयुष्यभरासाठी शिकायचे असतील तर मुलांनी सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यायला हवा. त्यामुळे पालक म्हणून तुम्ही ओव्हर प्रोटेक्टीव्ह होऊ नका.
२. नियम तयार करताना त्यात स्पष्टता नसणे
मूल लहान असतं तेव्हा त्यांच्या मेंदूला काय चूक, काय बरोबर हे समजतेच असे नाही. त्यामुळे तुम्ही एखाद्या गोष्टीचे नियम तयार करताना ते नेमके नसतील तर मुलांना नेमके काय करायचे ते समजत नाही आणि त्यामुळे मुले तिच ती चूक पुन्हा करण्याची शक्यता असते. मग त्यावरुन आरडाओरडा होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणतेही नियम तयार करताना ते नेमके असतील याची काळजी घ्या.
३. शिस्त लावण्यासाठी सुरुवातीपासूनच शिक्षा करणे
मुलांना शिस्त लावणे अतिशय गरजेचे असते. हे जरी बरोबर असले तरी याबाबत त्यांना सकारात्मक पद्धतीने समजून सांगायला हवे. एखाद्या गोष्टीवरुन लगेचच शिक्षा करणे हा योग्य उपाय होऊ शकत नाही. कारण या शिक्षेचे मुलांच्या मनावर दूरगामी खोलवर परीणाम राहू शकतात. विशेषत: १२ वर्षाच्या खालील मुलांवर शिक्षेचे परीणाम बराच काळ राहतात.