Join us  

मुलं कॉन्फिडण्ट व्हावी असं वाटत असेल तर पालकांनी अजिबात करु नयेत ४ चुका, मुलं आत्मविश्वास गमावतात कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2023 10:10 AM

Parents Should Avoid these 4 Mistakes to Make Your Child more Confident : मुलांवर प्रेम कराच पण म्हणून कुठे सूट द्यायची कुठे नाही हे वेळीच ठरवा...

आपली मुलं समाजात आत्मविश्वासानं वावरावीत, त्यांनी सगळ्या परिस्थितीला व्यवस्थित तोंड द्यावं अशी आपली इच्छा असते. त्यासाठी आपण त्यांना लहानपणापासून अनेक गोष्टी शिकवत असतो. मुलांनी स्वत:च्या पायावर उभे राहावे, आपले स्थान निर्माण करावे अशी आपली साहजिकच इच्छा असते. आपल्या मुलांनी मोठं होऊन नाव कमवावं असंही साहजिकच पालकांना वाटत असतं. मुलांचं सगळं चांगलं व्हावं यासाठी अनेकदा पालक मुलांना सगळ्या गोष्टी मुबलक प्रमाणात पुरवतात. इतकंच नाही तर त्यांचे निर्णयही स्वत:च घेऊन मोकळे होतात. हे आपण मुलांच्या फायद्यासाठी करतोय असं त्यांना वाटतं खरं पण प्रत्यक्षात यामुळे मुलांच्या विकासात अडथळे निर्माण होत असतात हे त्यांच्या लक्षात येत नाही. यासाठी पालकांनी काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवं आणि आपल्या वागण्यात बदल करायला हवेत. तरच मुलांची चांगल्या पद्धतीने प्रगती होईल आणि मुलांचा आत्मविश्वास वाढण्यास त्याची मदत होईल (Parents Should Avoid these 4 Mistakes to Make Your Child more Confident). 

१. निर्णय स्वातंत्र्य 

अनेकदा मुलांच्या फायद्याचे म्हणून मुलांचे बहुतांश निर्णय त्यांचे पालक घेतात. मुलांना काय वाईट किंवा काय चांगलं हे सांगणं पालक म्हणून आपलं काम असतं. हे जरी खरं असलं तरी मुलांना त्यांचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आपण द्यायला हवे. तसे न केल्यास मुलांची निर्णयक्षमता कमी होते आणि त्याचा त्यांच्या आत्मविश्वासावर परीणाम होतो. 

२. अपयशाची ओळख

आपलं मूल कायम यशस्वी असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. पण म्हणून त्यांची अपयश किंवा घाबरणे या भावनांशी ओळखच झाली नाही तर ते भविष्यात अवघड होऊन बसते. मुलांना प्रोटेक्ट करण्याच्या नादात आपण त्यांना काही भावनांपासून दूर ठेवतो. पण पुढे जाऊन त्यांना या भावनांशी सामना करावा लागला तर त्यांना त्याच्याशी किमान ओळख असायला हवी. 

३. प्रमाणापेक्षा जास्त स्वातंत्र्य देणे 

मूल मोठे झाले किंवा आता कॉलेजला गेले म्हणून पालक त्यांना बऱ्याच बाबतीत स्वातंत्र्य देतात. मुलांना स्वातंत्र्य देणे ठिक आहे पण ते प्रमाणाबाहेर असेल तर त्याचा स्वैराचार व्हायला वेळ लागत नाही हे लक्षात घ्यायला हवे. म्हणूनच स्वातंत्र्य आणि स्वैराचार यांच्यातील सीमा वेळीच ओळखायला हव्यात.

४.  आपली कामे आपण करणे 

मुलांना सुखात ठेवायचे म्हणजे त्यांना अजिबात काम करु द्यायचे नाही असा काही पालकांचा समज असतो. म्हणून मुलांचे कपडे आवरण्यापासून त्यांची वह्या-पुस्तके नीट ठेवण्यापर्यंतच्या बहुतांश गोष्टी पालक करत राहतात. प्रेमापोटी हे करणे ठिक आहे. पण मुलांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव वेळीच करुन दिली आणि त्यांची कामे त्यांना करायला लावली तर त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. 

 

टॅग्स :पालकत्वलहान मुलं