Join us  

मासिक पाळीविषयी मुलींशी पालक बोलतात, पण मुलांशी? तुम्हालाही वाटतं, मुलांना कशाला सांगायचं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2024 8:00 AM

मासिक पाळीबद्दल फक्त मुलींशीच बोलायला हवं असं नाही. मुलग्यांनाही मासिक पाळीबद्दल सविस्तर माहिती सांगितली तरच पुढे जावून ते समजूतीने विचार करतील आणि वागतीलही.

ठळक मुद्देआपल्या मुलांनी चुकीची, अशास्त्रीय माहिती बाळगू नये यासाठी मुलग्यांसोबत मासिक पाळीवर बोलणं ही गरज आहे.

- डाॅ. वैशाली देशमुख(टीन एजर मुलांच्या वर्तनाच्या अभ्यासक आणि बालरोग तज्ज्ञ)

ही गोष्ट नाही. खरीखुरी घटना आहे. समीर नावाच्या मुलाची. समीरची तनिशा नावाची मैत्रिण आहे. तिच्यासोबतच तो शाळेत जायचा, शाळेतून घरी यायचा. एकदा दोघेही रस्त्यावर उभे राहून बसची वाट बघत होते. तोच समीरला तनिशाच्या स्कर्टवर लाल डाग पडलेला दिसला. त्याने लगेच तनिशाच्या ते लक्षात आणून दिलं. यामुळे तनिशा संकोचली, ओशाळली. समीरने तनिशाला घरी जायला सांगितलं. पण तनिशाच्या घरी तेव्हा कोणीच नव्हतं. म्हणून समीरने तनीशाला आपल्या घरी नेलं. आपल्या आईला भेटवलं. समीरमुळे तनिशाला त्या दिवशी अडचणीच्या वेळेत महत्त्वाची मदत मिळाली होती. आपल्या समीरने हे खूप चांगलं काम केलं म्हणून समीरची आईही खूष होती. समीर तनिशाची मदत करु शकला कारण त्याला मुलींच्या मासिक पाळीविषयी माहिती होतं. त्याच्या आईने त्याला ते सांगितलं होतं. आपल्या मैत्रिणीची फजिती होवू नये म्हणून समीरने आपल्या मैत्रिणीची केलेली मदत ही खरंच कौतुकास्पदच आहे. पण आज आपल्या आजूबाजूला असे किती समीर असतील बरं? ते निर्माण होणं ही आजची गरज आहे. वयात येणाऱ्या मुलग्यांची आणि मुलींची शारीरिक आणि मानसिक वाढ योग्य होण्यासाठी समीरसारखी इतर मुलांनाही मुलींच्या मासिक पाळीबद्दल माहिती असणं आवश्यक आहे.

मुलग्यांना मासिक पाळीबद्दल सांगणे का गरजेचे?१. मुलं मोठी होतात, वयात येतात पण त्यांना मासिक पाळी म्हणजे काय? याबद्दल काहीच माहिती नसते. असली तरी अत्यंत चुकीची आणि पूर्वग्रहदूषित असते. यामुळे मुलांचा पाळीकडे बघण्याचा चुकीचा दृष्टिकोन तयार होतो. पाळी म्हणजे काहीतरी घाण असते. मुलींसाठी ती फारच अडचणीची असते. पाळीमुळे मुली अशक्त होतात असं काहीबाही त्यांच्या डोक्यात असतं. मासिक पाळीबद्दलचे असे गैरसमज आणि चुकीची माहिती बाळगणं यातून पुढे मुलग्यांचं मुलींवर हसणं, त्यांची टर उडवणं, चुकीचे शब्द वापरले जाणं असे चुकीचे वर्तन होण्याचीच दाट शक्यता असते. सुदृढ समाजासाठी वयात येणाऱ्या मुलग्यांना चुकीची आणि अपूर्ण माहिती असणे घातक असते. आणि म्हणूनच  तारुण्यात मुलींना पाळी का येते? कशी येते? पाळी आली की काय होतं? पाळीत त्रास काय होतात? पाळीसाठी मुली/ महिला कोणती साधनं वापरतात? याबद्दल मुलग्यांशी बोललं जाणं महत्त्वाचं आहे.२. तरुण होताना मुलींच्या शरीरात जे बदल होतात त्याचा अपरिहार्य भाग म्हणजे पाळी असते. केवळ ती मुलीला येते म्हणून फक्त मुलींनाच सांगायचं आणि मुलग्यांपासून लपवायचं या गोष्टीमुळे मुलीही चारचौघात, मुलांसमोर पाळीबद्दल बोलायला कचरतात. हे होवू द्यायचं नसेल तर मुलींइतकीच मुलग्यांनाही पाळीबद्दल माहिती असायला हवी आणि ती माहिती शिक्षक आणि पालकांनी विशेषत: आईने द्यायला हवी.

३. वाढत्या वयात कुतुहलही वाढतं. वयात येणाऱ्या मुलांनाही मासिक पाळीबद्दलचं कुतुहल वाटतं. ते शमवण्यासाठी योग्य माहिती नसेल तर चुकीच्या मार्गाने अपूर्ण आणि चुकीची माहिती मिळण्याची शक्यता असते. आपल्या मुलांनी अशी चुकीची, अशास्त्रीय माहिती बाळगू नये यासाठी मुलग्यांसोबत मासिक पाळीवर बोलणं ही गरज आहे.४. मुलग्यांना मासिक पाळी ही सामान्य बाब आहे, पण आपण आई, बहिण, मैत्रिण यांना मासिक पाळीच्या त्रासात काय मदत करु शकतो याची समज येते. हीच बाब मुलींच्या बाबतीतही आवश्यक आहे. वयात येताना मुलग्यांच्या शरीरातही काय बदलतं याची माहिती मुलींना दिल्यास वयात येणे,वयात येण्याचा त्रास फक्त मुलींच्याच वाट्याला असा दृढ होवू पाहणारा समज दूर होतो.

मासिक पाळीबद्दल मुलग्यांना काय आणि कसं सांगावं? वाचा..https://urjaa.online/how-adolecent-boy-helps-his-friend-in-her-need-talk-to-boys-about-menstruation-why-it-is-important/

टॅग्स :मासिक पाळी आणि आरोग्यलहान मुलंआरोग्यपालकत्व