गुंजन कुलकर्णी
(चाईल्ड आणि फॅमिली सायकॉलॉजिस्ट)
'मला एक-दोन मार्क कमी मिळाले असते तर बरे झाले असते. निदान मला ट्रोलिंगचा त्रास तर झाला नसता! '
- असं म्हणणाऱ्या उत्तरप्रदेशातल्या प्राची निगम बद्दल तुम्ही वाचले का?
उत्तरप्रदेशात दहावीला बोर्डात पहिली आलेली ही हुशार मुलगी. निकाल लागला आणि यशस्वी विद्यार्थिनी म्हणून सर्वत्र तिचे फोटो प्रसिद्ध झाले आणि तिच्या दिसण्याबद्दल ट्रोल करणंही सुरु झालं. सोशल मीडियात ट्रोल करणे ही सध्या खूप वारंवार घडणारी बाब झाली आहे. मित्रमंडळींची मजामस्ती, मस्करी करणे, उपहासात्मक बोलणे, दुसऱ्याच्या विरोधात मत मांडणे इतका हा साधा विषय नाही. ट्रोलिंग हा विषय आता अत्यंत गंभीरपणे विचारात घेणे गरजेचे आहे, कारण त्याचे मानसिक परिणाम खूप खोलवर होऊ शकतात.
वयात येणाऱ्या मुलांवर ट्रोलिंगचे परिणाम
१. विशेषतः स्व-प्रतिमा (सेल्फ-इमेज) विकसित होत असलेल्या किशोरवयीन मुलांच्या मनावर तर या ट्रोलिंगचे अनेक त्रासदायक, घातक परिणाम होतात.
२. ट्रोलिंग करणाऱ्या व्यक्तीचा उद्देशच मुळी समोरच्या व्यक्तीला जाणीवपूर्वक दुखावण्याचा असल्याने त्यात संवेदनशील बाबींवरच हल्ला केला जातो. उदाहरणार्थ एखाद्याच्या शारीरिक ठेवणीबद्दल, रंगावर, दिसण्याविषयी, चारित्र्याबद्दल अतिशय अपमानास्पद आणि अर्वाच्य भाष्य केले जाते.
३. किशोरवयातली मुले मुळातच त्यांच्या बॉडी इमेज विषयी सेन्सिटिव्ह असतात. अशा वेळी त्यांच्या दिसण्याबद्दल त्यांना ट्रोल केले गेले तर त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. त्यातून एकलकोंडेपणा (सोशल आयसोलेशन), एकाग्रता कमी होणे, सुडाची भावना मनात घर करून राहणे, आपल्या दिसण्याविषयी टोकाचा कॉन्शिअसनेस, असे परिणाम होताना दिसतात.
४. त्यातून पुढे एन्झायटी, डिप्रेशन, इटिंग-डिसऑर्डर्स, सेल्फ-हार्म, आत्महत्येचे विचार आणि प्रत्यक्ष आत्महत्या असे अतिशय गंभीर परिणाम होताना दिसतात. लक्षात येईपर्यंत वेळ खूप पुढे गेलेली असते. त्यामुळे पालक, शिक्षक आणि समाज म्हणून सोशल मीडिया मधून होणाऱ्या ट्रोलिंगचा विचार आपण गांभीर्याने करायला हवा.
५. ट्रोल करणाऱ्या व्यक्तींचे फारसे काही बिघडत नाही, हे लक्षात आल्यावर अनेकांचे धाडस वाढते. ट्रोल होणारी व्यक्तीही मग सूडाच्या भावनेने स्वतः ट्रोलिंगकडे वळू शकते. त्यातून मग हे चक्र चालूच राहते.
(Image :google)
ट्रोलिंग आणि टीनएजर्सच्या जगण्याची घुसमट
समुपदेशनासाठी माझ्याकडे येणारी १३ ते १९ या वयोगटातली कितीतरी मुले-मुली त्यांचे ट्रोलिंगचे अनुभव सांगतात. त्यातून तयार होणाऱ्या त्यांच्या मानसिक समस्यांवर आम्ही चर्चा करतो. या वयात मुळातच आपल्या शरीराविषयी एक अवघडलेपण मुलां-मुलींमध्ये असते. इन्स्ट्राग्राम, फेसबुक वर मिळणारे लाइक्स, चांगल्या कमेंट्स हे त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचे असते. अशा वेळी त्यांच्या शरीराविषयी कुणी त्यांना ट्रोल केले तर ही मुले तेही खूप सिरियसली घेतात. काही वेळा खाणे कमी करतात; घराबाहेर जाणे बंद करतात; गरज नसताना चेहरा मास्कने झाकून ठेवतात; व्यसनांकडे ओढली जातात; स्वतःला इजा करून घेतात.
पालक-शिक्षक काय मदत करु शकतात?
१. मुलांच्या वागण्यात होणाऱ्या बदलांकडे नीट लक्ष ठेवायला हवे. उदाहरणार्थ, एखाद्या मुलाने खाणे अचानक कमी केले. अशा वेळी 'नाही ते फॅड आहे तुझे' असे म्हणून त्याला अजूनच एकटे पाडण्यापेक्षा त्याचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे. यातून कदाचित त्याला इतरांच्या कमेंट्सचा काही त्रास होतो आहे का ते कळेल. तसे असेल तर त्यावर योग्य ती उपाययोजना करता येईल.
२. मुलांशी ट्रोलिंग या विषयावरती मोकळेपणाने बोलायला हवे. सध्या सोशल मीडिया मध्ये लहानांपासून प्रौढांपर्यंत, सामान्य नागरिकांपासून सेलेब्रेटीजपर्यंत, अनुयायांपासून नेत्यांपर्यंत सगळेच ट्रोलिंगला सामोरे जात आहेत. ट्रोलिंग हाताळण्याचे चांगले-वाईट मार्ग मुलांना या उदाहरणांमधून दाखवता येतील. शिवाय टेक्निकल कंट्रोल्स वापरून आपले अकाउंट प्रायव्हेट ठेवण्याविषयीही मुलांशी बोलायला हवे.
३. काही घरांमध्ये मुलांवर त्यांच्या रंगाविषयी, दिसण्याविषयी, शारीरिक ठेवणीविषयी कॅज्युअल कमेंट्स केल्या जातात. त्यातून मुळातच मुलांमधला आत्मविश्वास कमी होतो. मग ती जास्त सहजपणे सोशल मीडिया वरच्या ट्रोलिंगला बळी पडू शकतात. आपल्या कुटुंबात असे वातावरण आहे का याचा विचार करायला हवा. त्याविषयी आजी-आजोबा, नातेवाईक यांच्याशीही बोलायला हवं.
(Image : google)
४. आपल्या मुलांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर आपले लक्ष आहे का? आपले मूल इतरांना ट्रोलिंग करते आहे का? तसे असेल तर त्याला भावनांचे नियमन (इमोशनल मॅनेजमेंट) करायला शिकवायला हवे.
५. ट्रोलिंग करणाऱ्या व्यक्तींमध्ये विशेषतः तदानुभूती (एम्पथी) ही भावना कमी असल्याचे दिसते. मुलांना एम्पथी ही भावना शिकवणे खूप गरजेचे आहे. त्यातून ती इतरांच्या भावना ओळखायला आणि त्यानुसार योग्य प्रतिक्रिया द्यायला शिकणार आहेत.
६. या प्रक्रियेत योग्य वेळी तज्ज्ञांची (सायकॉलॉजिस्ट, सायकियाट्रिस्ट) मदत घेणेही आवश्यक आहे. इतरांना सोशल मीडियावरून ट्रोल करत राहणे, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी, चारित्र्याविषयी, कुटुंबीयांविषयी अत्यंत अपमानास्पद, अर्वाच्य, अश्लील कमेंट्स करणे ही मानसिक विकृती आहे. या विकृतीला बळी पडण्यापासूनही आपण आपल्या मुलांना जपायला हवे आणि या विकृतीच्या आहारी जाण्यापासूनही मुलांना थांबवायला हवे.
ट्रोल कोण करतं?
ट्रोलिंग हे भावनिक बुद्धिमत्ता कमी असण्याचे लक्षण आहे. त्याची कारणे अनेक असू शकतात. घरात, कुटुंबात अस्थिर वातावरण असणे; पालकांमध्ये पालकत्वाचे चुकीचे निकष आणि गैरसमजुती असणे; वाईट संगती मध्ये राहणे; यापासून ते अगदी मानसिक आजारांपर्यंत अनेक कारणांमुळे ट्रोलिंगची मानसिकता तयार होऊ शकते. काही वेळा ट्रोल करणारी व्यक्ती ही मानसिकदृष्ट्या अत्यंत कमकुवत आणि असुरक्षित (मेंटली इन्सिक्युअर) असते. अशा वेळी, 'आपल्याला जे यश मिळवता येत नाही ते दुसऱ्याने मिळवले' हे पाहून असूयेची भावना तयार होते. या जेलसी मधून यशस्वी व्यक्तीला दुखावण्याचे प्रयत्न ट्रोलिंग मधून केले जातात. काही बाबतीत ट्रोलिंगची सुरुवात 'करून तर बघू' अशी होते. कधी एखाद्या गटाचा भाग होण्यासाठी, त्यांचे अनुकरण म्हणून केले जाते.
काही व्यक्तींच्या बाबतीत मात्र ‘इतरांना ट्रोल करणे’ हा गंभीर मानसिक आजाराचा भाग आहे. 'दुसऱ्याला शारीरिक, मानसिक दुःख, वेदना देऊन त्यातून स्वतः आनंद मिळवणे (सेडिझम)' हे निश्चितच मानसिक अस्वास्थ्याचे लक्षण आहे. या प्रकारची मानसिकता वर्षांनुवर्षे चालत आलेली आहे. जागतिक महायुध्दांपासून ते अगदी घरगुती हिंसेपर्यंत (डोमेस्टिक व्हायलंस) ही मानसिकता आपण वाचत, ऐकत, पाहत आणि काही जण अनुभवतही असतो. ट्रोलिंग हे तर सोशल मीडिया मधून होत असल्याने ते करणाऱ्या व्यक्तीची ओळख बऱ्याचदा गुप्त राहू शकते. ही बाब ट्रोल करणाऱ्या व्यक्तीला खोटे का होईना पण धाडस देते. 'आपण पकडले जाण्याची शक्यता नाही' या विचारामुळे कुठल्याही पातळीवर जाऊन भाष्य करायला बळ येते. 'आपल्या बोलण्याची जबाबदारी घेण्याची आपल्याला गरज नाही' या विचारापाठीमागे लपता येते.