आई झाले आणि मी फार मऊ झाले. सतत वाटतं आपलं काही चुकलं तर, लेकीसाठी जे करतोय ते नीट करतोय ना, आज काय चुकणार? माझा आत्मविश्वासच कमी झाल्यासारखा वाटतो. माणूस म्हणून आपण मोडून पडू की काय इतका संयम कधीकधी लागतो! आई झाले आणि माझं जगच बदललं! -हे कोण सांगतंय माहिती आहे? -प्रियांका चोप्रा. तिच्याकडे पाहून कोण म्हणेल की तिचा कॉन्फिडन्स असा कमी जास्त होत असेल पण आईपण परीक्षा पाहतं आणि आपल्याला अधिक चांगलं माणूस म्हणून घडवत संवेदनशीलही करतं याचं हे एक उदाहरण आहे (Priyanka Chopra told about change in her life after motherhood) . . .
आईपणाचा हा अनुभव अनेकजणी घेतात. अगदी उत्तम करिअर सुरु असताना आईपणाची परीक्षा भलताच पेपर समोर ठेवते आणि वाटू लागतं हे तर आपल्याला काही येतच नाही. आपल्यावर अवलंबून असलेलं लेकरु, त्याची तब्येत, त्याच्यासाठी आपण जे काही करतो, ठरवतो, निवडतो ते सगळं योग्य तर असेल? आपण काही चूक तर करणार नाही असं वाटणंही अगदी नॉर्मल असतं. तेच प्रियांका चोप्रालाही वाटतं. सुपरस्टार असली तरी आईचं काळीज तिचीही परीक्षा पाहतंच.
प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास. त्या दोघांची मुलगी मालती मेरी. ती कधी आपल्या आईसोबत एखाद्या इव्हेंटमध्ये हजेरी लावते तर कधी तिची आईच तिचे फोटो सोशल मीडियात पोस्ट करते.प्रियांका चोप्राने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आई झाल्यानंतरचा आपला प्रवास आणि भावनिक, मानसिक आव्हानं याविषयी काही गोष्टी सांगितल्या.
प्रियांका सांगते, आई झाल्यानंतर मी इतकी मऊ झाले, फार भावून झालं मन. एकदम ठिसूळच. मातृत्त्वाचा माझ्या आत्मविश्वासावर परीणाम झाला की नाही माहित नाही, पण मी व्यक्ती म्हणून सावध मात्र नक्की झाले. सतत वाटतं, आज आपलं काही चुकणार तर नाही? मग स्वत:लाच सांगावं लागतं की जमतं तुला, जमेलही. अनेक गोष्टी जमतात तसं हे जमेल. कॉन्फिडण्ट आहेस तू, काही नाही चुकणार, पण भीती तर वाटतेच!’ सगळ्याच आयांच्या वाट्याला खरंतर हा प्रवास येतो. प्रत्येक आई रोज नव्या गोष्टींचा सामना करत असते आणि त्यातूनच आईपण शिकत जाते. एक मूल वाढवणे ही अतिशय जबाबदारीची गोष्ट. चुकत माकत शिकणं आणि आनंदानं आईपणाचा अनुभव घेणं हेच खरं महत्त्वाचं.