सायली जोशी-पटवर्धन
मोबाइल ही आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील गरज झाली आहे. मोठ्यांबरोबरच लहान मुलेही आता पाहावं तेव्हा मोबाईलवर असतात. तर दुसरीकडे पालक मूल सतत मोबाइलवर म्हणून चिंतेत असतात. मुलांनी सतत मोबाइल पाहू नये म्हणून पालक आणि मुलांमध्ये होणारे वाद आपण घरोघरी पाहतो. अनेकदा मोबाइलचा वापर न होता गैरवापर व्हायला लागतो आणि तिथेच खरा प्रश्न सुरु होतो. सुरुवातीला मोबाइलचा वापर ही ओरडण्याची बाब असते. मात्र हळूहळू याचे रुपांतर व्यसनात कधी होते हे पालकांना आणि मुलांनाही लक्षात येत नाही (Problem of Mobile Addiction in Children’s Parenting Tips from Experts).
जाहिरात देतो, मोबाईल सोडवा
अशाच मुलांच्या मोबाइल वापरामुळे हैराण असलेल्या एका पालकांनी चक्क पेपरमध्ये याबाबतची जाहिरात दिली आहे. वृत्तपत्रातील छोट्या जाहिरातींमधील इतरविषयक मध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झाली असून ही बाब विचार करण्यासारखी आहे. १३ वर्षे वयाचा मुलगा आणि ८ वर्षे वयाची मुलगी सतत मोबाइलवर गेम्स खेळत असल्याची त्यांची समस्या आहे. या समस्येतून बाहेर पडण्यासाठी काही योजना असेल तर सुचवा आणि त्यांना योग्य ते मानधन देण्यात येईल असे या जाहिरातीत म्हटले आहे. आता ही जाहिरात खरी आहे की खोटी याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र मुलांचे मोबाइलचे व्यसन कमी व्हावे यासाठी पालकांना पैसे देऊन चक्क जाहिरात द्यावी लागली याचा अर्थ ते पालक मुलांच्या मोबाइलवर गेम्स खेळण्याने किती वैतागले असतील हेच यातून दिसून येते.
याबाबत सोशल मीडिया अभ्यासक मुक्ता चैतन्य म्हणतात, पालकांनी मुलांच्या हातात मोबाइल, टॅबलेट यांसारखी गॅझेट देताना योग्य तो विचार करायला हवा. जर मुलं या गोष्टी वापरत असतील तर ते काय खेळतात, किती खेळतात, कोणत्या वयात खेळतात याबाबत योग्य ते लक्ष द्यायला हवे. मुलांच्या हातात मोबाइल दिला की प्रश्न संपला असे होत नाही, उलट यामुळे भविष्यात प्रश्न वाढण्याचीच शक्यता जास्त असते. बरेचदा स्टेटस सिम्बॉल, मूल मागे पडू नये किंवा आपल्याला जे मिळालं नाही ते मुलांना मिळायला हवं या भावनेतून मोबाइल, टॅब त्यांच्या हातात दिला जातो. पण भविष्यात याचे व्यसनात कधी रुपांतर होते तेच पालकांच्या आणि मुलांच्याही लक्षात येत नाही. सुरुवातीपासून योग्य ते नियम न लावता अचानक मोबाइल वापरु नको असं म्हटलं की मुलं सैरभैर होतात आणि मग घरात वाद सुरू होतात.
बरेचदा समुपदेशक किंवा मानसोपचारतज्ज्ञांकडे जाण्याची वेळ येते. असे होण्यापेक्षा पालकांनी आधीपासूनच योग्य ते लक्ष दिल्यास मुले चुकीच्या गोष्टींच्या आहारी जाणार नाहीत. म्हणूनच मुलांच्या मोबाइल वापराबाबत तक्रार करत असताना पालकांचा यामध्ये काय रोल असला पाहिजे हे सगळ्यात आधी लक्षात घेण्याची गरज आहे. मोबाइलमुळे प्रसंगी मुलांचे एकप्रकारचे आभासी जग तयार होते. मग आजुबाजूला असलेली माणसे, भावना यांपासून मुलं नकळत दुरावतात. मोबाइलचे व्यसन ही गोष्ट ऐकायला साधी वाटत असली तरी सध्या ज्यांच्या घरात ८ ते १५ वर्षे वयोगटाची मुलं आहेत त्यांना याचे खरे गांभीर्य लक्षात येऊ शकते.
६ गोष्टी जमतील?
मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर सांगतात, मुलांचा मोबाइल वापर आटोक्यात आणण्यासाठी पालकांनी काय करावे...
१. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मुलांसमोर पालकही जास्त मोबाइल वापरत नाहीत ना हे पाहायला हवे.
२. मोबाइल वापराबाबत काही नियम घालावेत. जसे जेवताना घरातील कोणीच मोबाइल वापरु नये, ९ नंतर कोणीच स्क्रीन वापरु नये.
३. मुलांसोबत पुस्तक वाचणे, गोष्टी सांगणे, चित्र काढणे, बोर्ड गेम्स खेळणे अशा काही अॅक्टीव्हिटीज आपण घरात नक्की करु शकतो.
४. स्क्रीन पाहायचाच असेल तर त्याला काही नियम घालून देणे. जसे अमुक वेळच मोबाइल पाहायचा, त्यातही गोम्स न खेळता उपयुक्त असे व्हिडिओ यू ट्यूबवर त्यांना लावून देऊ पाहू शकतो.
५. मुलं जास्त मोबाइल पाहत असतील तर त्यांना त्यामागचे तोटे शांतपणे समजावून सांगायला हवेत. तसेच एकदम मोबाइलचा वापर बंद न करता हळूहळू वेळ कमी करत आणायला हवी.
६. मोबाइलचा वापर करायचा आणि गैरवापर करायचा नाही हे मुलांना समजून सांगायला हवे. मुलांना घरातल्या कामांमध्ये रमवणे, त्यांच्याशी खेळणे, गाणी-गोष्टी सांगणे असे उपाय करता येतील.