Lokmat Sakhi >Parenting > मुलांनी हट्टच केला आणि मुलांसह आईबाबा निघाले पुणे ते पंढरपूर २३० किलोमीटर सायकलवारीला!

मुलांनी हट्टच केला आणि मुलांसह आईबाबा निघाले पुणे ते पंढरपूर २३० किलोमीटर सायकलवारीला!

आईबाबा आणि मुलं एकमेकांसाठी प्रेरणा बनले आणि आधारही, त्यातून त्यांनी यशस्वी केली एक अनोखी मोहिम, त्या मोहिमेची गोष्ट.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2024 05:40 PM2024-06-12T17:40:35+5:302024-06-12T17:52:13+5:30

आईबाबा आणि मुलं एकमेकांसाठी प्रेरणा बनले आणि आधारही, त्यातून त्यांनी यशस्वी केली एक अनोखी मोहिम, त्या मोहिमेची गोष्ट.

Pune family and inspirational story of 230 kilometer pune to Pandharpur cycle wari, fitness and passion journey-cycle expedition. | मुलांनी हट्टच केला आणि मुलांसह आईबाबा निघाले पुणे ते पंढरपूर २३० किलोमीटर सायकलवारीला!

मुलांनी हट्टच केला आणि मुलांसह आईबाबा निघाले पुणे ते पंढरपूर २३० किलोमीटर सायकलवारीला!

Highlightsआता तुम्हीच सांगा आहे की नाही ही वाघ फॅमिली एक आयडियल स्पोर्ट फॅमिली?

माधुरी पाचपांडे (लेखिका सायकलिस्ट, होम बेकर आणि युट्यूबर आहेत.)

मुलांनी हट्ट करावा तर कशाचा करावा? त्या हट्टाचीच ही गोष्ट. एका आदर्श परिवाराची ही गोष्ट. सिद्धार्थ वाघ, रुपाली वाघ आणि त्यांची मुले मीरा आणि मल्हार या कुटुंबाची गोष्टच अनोखी आहे, आणि त्या प्रवासात त्यांच्यासोबत आहे त्यांची सायकल. त्या सायकलने या कुटुंबाला एकमेकांशी जोडलेच पण त्यांचं जगणंही सुंदर झालं. नक्की झाला कसा हा प्रवास, वाचाच..

सिद्धार्थ वाघ हे एक आयटी प्रोफेशनल आहेत. रनिंग त्यांचं पॅशन आहे. फिजिकल फिटनेसची आवड जोपासल्यामुळे त्यांना रनिंग सोबत सायकलिंग सुद्धा करून बघूया असं वाटलं. इंडो ऍथलेटिक सोसायटी सोबतच्या काही सायकल राईड केल्यानंतर आपण आता पुणे ते पंढरपूर ही २३० किलोमीटरची सायकलवारी सुद्धा करायलाच हवी असे त्यांनी ठरविले. त्यांची ही इच्छा त्यांनी जेव्हा घरी सांगितली त्यानंतर जे काही घडले ते सामान्य कुटुंबात सहजासहजी घडणार नाही याची मला खात्री आहे. पुणे ते पंढरपूर सायकल वारी करायची असे सांगितल्याबरोबर त्यांचा मुलगा मल्हार (वय वर्ष १३) याने मीसुद्धा तुमच्यासोबत सायकलवारी करणार असं सांगितलं. मल्हार दादा सायकलवारी करणार तर मग मी पण काय कमी आहे का? मी पण ही सायकलवारी करणारच असं मुलगी मीरा( वय वर्ष १०) हिनेसुद्धा सांगून टाकले. 

पुणे ते पंढरपूर २३० किलोमीटर ची सायकलवारी ही काही सोपी वारी नाही. खूप प्रॅक्टिस, फिजिकल फिटनेस, योग्य आहार या सर्व गोष्टींकडे लक्ष देऊन योग्य ती प्रॅक्टिस करावी लागते असं बाबांनी समजावून सांगितलंही. पण तुम्ही जे सांगाल ते सर्व करायला आम्ही तयार आहोत पण ही सायकलवारी करणारच यावर ही दोन्ही मुले ठाम होती. हट्टच करु लागली. वडिलांपुढे फार मोठा प्रश्न होता. आता सांगायचं तरी काय? मला एकट्याला तुम्हा दोघांकडे लक्ष देणे शक्य होणार नाही. अंतर फार मोठे आहे, दिवसभरचा सायकल प्रवास आहे, त्यामुळे तुम्ही सायकलवारी करणे शक्य होणार नाही असे सांगितल्यावर मुलांनी त्यांचा मोर्चा त्यांच्या आईकडे वळवला.

आई , तू सुद्धा ही पुणे पंढरपूर सायकल वारी आमच्या सोबत कर म्हणजे बाबा आम्हाला पण सोबत नेतील. तू आलीस तरच आमची ही सायकलवारीची इच्छा पूर्ण होईल नाहीतर बाबा आम्हाला नेणार नाहीत, असा हट्टच मुलांनी रूपालीकडे चालू ठेवला. खरंतर कधीही हट्ट न करणारी ही मुलं पण पुणे ते पंढरपूर सायकल वारी करण्यासाठी आईने आमच्या सोबत यायलाच हवं या हट्टाला पेटली होती.  शेवटी आईने ही सायकल वारी करण्यास होकार दिला. 
आता खऱ्या अर्थाने पूर्ण परिवाराची आयुष्यात पहिल्यांदाच २३० किलोमीटर इतकी सर्वात मोठ्या पल्ल्याची सायकलवारी पूर्ण करण्यासाठीची तयारी सुरू झाली. 
सुरुवातीला फक्त आणि फक्त मुलांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक आई सायकल चालवीत होती पण जसजशा प्रॅक्टिस राईड होत गेल्या तसतशी त्यांना त्यात मजा येऊ लागली.  ग्रुपमधले अतिशय उत्साही वातावरण, नवऱ्याची साथ, मुलांची धडपड बघून रूपालीने अतिशय आवडीने सायकलवारीची जय्यत तयारी सुरू केली.  आई- बाबा आणि दोन मुलं अशा या पूर्ण परिवाराने पुणे ते पंढरपूर सायकलवारीसाठी रजिस्ट्रेशन केले. 
जवळजवळ ९०० किलोमीटरच्या प्रॅक्टिस राईड अतिशय शिस्तबद्ध आणि योग्य पद्धतीने या परिवाराने केल्या. 

मीरा आणि मल्हारने स्वतःहूनच आई-वडिलांना त्रास न देता आहारात आणि त्यांच्या दिनचर्येत बदल केला. सुट्टीच्या दिवशी आपले मित्र मैत्रिणी आरामात झोपले असताना ही मुलं पहाटे तीन /चार वाजता उठून आपली प्रॅक्टिस राईड सुरू करीत होती. प्रॅक्टिस राईडला पहाटे निघायच्या आदल्या दिवशी आपली आपली तयारी करून ठेवणे, पौष्टिक आहार घेणे, बाहेरचे, जंक फूड पूर्ण बंद करणे, पहाटे लवकर निघावे लागते त्यामुळे लवकर झोपणे, प्रत्येक राईडमधून स्वतःची इम्प्रूमेंट करून घेणे या आणि अशा अनेक गोष्टी मुलांनी करायला सुरुवात केली.

सुरुवातीला सिद्धार्थच्या रनिंगच्या पॅशनमुळे घरात मुलांमध्ये आपोआपच रनिंगची आवड निर्माण झाली होतीच. मीराने वयाच्या पाचव्या वर्षापासून, मल्हारने वयाच्या आठव्या वर्षापासून मॅरॅथॉनमध्ये मेडल्स मिळवायला उरुवत केली होती. वडिलांसारखाच डायट आणि फिटनेस मुलांमध्ये आपोआप जपला गेला. रुपालीनेसुद्धा घरातच मुलांना वेगवेगळे पौष्टिक हेल्दी पदार्थ न कंटाळता करून खाऊ घातले त्यामुळे लहानपणापासूनच मुलांची बाहेरच्या जंक फूडची आवड कमी झाली. एका आईचे कष्ट खरंच सार्थकी लागले .

सायकलवारीचे रजिस्ट्रेशन केल्यानंतर येणाऱ्या प्रत्येक शनिवार रविवारी या पूर्ण परिवाराने नवनवीन ठिकाणी प्रॅक्टिस राईड केल्या. या प्रॅक्टिस राईडमुळे त्यांना पुणे ते पंढरपूर २३० किलोमीटरच्या सायकलवारीचे नियोजन करायला सोपे गेले.
प्रत्यक्ष पुणे ते पंढरपूर सायकलवारीच्या दिवशी मल्हारकडे रूपाली आणि मीराकडे सिद्धार्थ लक्ष देणार होते. त्यादिवशी ४० ते ४५ डिग्री टेंपरेचर होते, सूर्य जणू आग ओकत होता. अशा वातावरणात दिवसभर चढ-उताराच्या रस्त्यावर सायकल चालवत राहायची म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. 
इंदापूर आल्यावर मीराला थोडा उन्हाचा त्रास व्हायला लागला होता. पण तिने कुठलीही तक्रार न करता थोडा आराम करून व्यवस्थित हायड्रेशन घेऊन पुन्हा सायकल चालवायला सुरुवात केली. या वारीमध्ये सात वर्षापासून ते ७० वर्षापर्यंतचे सायकल वारकरी सहभागी होते. या सर्वांना आपल्या आजूबाजूला सायकल चालवताना बघून एक वेगळाच उत्साह प्रत्येकाच्या मनात उसळत होता. हे करतात तर आपणही करूच शकतो अशी हिम्मत प्रत्येकाला मिळत होती. शेवटचे 30 किलोमीटर अंतर राहिले असताना भर उन्हामुळे मल्हारच्या मनातसुद्धा  गिव्ह अप करण्याचा विचार एकदा येऊन गेलाच पण या पठ्ठ्याने निगेटिव्ह विचारांना क्षणात झटकून टाकून पुन्हा सायकल चालवायला जी सुरुवात केली ती पंढरपुरात वारी पूर्ण करून थांबवली.

आई-बाबांसाठी हा खरच खूप गर्वाचा क्षण होता. इतके दिवस केलेल्या सर्व कष्टांचे फळ मिळाले होते. दोन्ही मुलांनी आईबाबांच्या कष्टाचे सार्थक केले होते.
काही वेळा गिव्ह अप करावे वाटणाऱ्या क्षणातच तुम्ही तसं न करता जेव्हा पुन्हा हिंमत करता, आणि तुमचे टार्गेट पूर्ण करून दाखवता, तेव्हाच तुम्ही खरे जिंकता, आणि हीच तुमची खरी अचिव्हमेण्ट असते हे मला आज समजले असे मल्हारचे मेडल घेतानाचे शब्द ऐकून त्याच्या आई वडिलांच्या डोळ्यात पाणी तरळले. 
मीरा आणि मल्हार यांनी त्यांच्या आई-वडिलांसोबत अतिशय प्रतिकूल वातावरणात २३० किलोमीटरचा पुणे पंढरपूर सायकलवारीचा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण करून सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. 

रूपालीने मुलांसाठी२३० किलोमीटर एवढा लांबचा पल्ला प्रथमच सायकलवर पार केला. मुलांमुळे सुरुवात झाली खरी पण वारी पूर्ण केल्यानंतर त्यांचे विश्व च बदलले, त्यांचा स्वतःबद्दलचा आत्मविश्वास जबरदस्त वाढला, भीती निघून गेली, त्यांना त्यांच्या शक्तीचा नव्याने साक्षात्कार झाला. स्त्रियांनी स्वतः स्वतःला घातलेल्या कुंपणातून एकदा तरी बाहेर यावे आणि स्वतःसाठी काहीतरी करून दाखवावे असे रूपाली सर्वांना सांगतात.  रूपाली ताई स्वतः हाफ मॅराथॉनही पळतात.
आई-वडिलांचेच अनुकरण मुले करतात. तुम्ही जर मला हे जमणार नाही म्हटलात तर तुमची मुलेसुद्धा पुढे काही करण्याचा प्रयत्न करणारच नाहीत. त्यासाठी तुम्ही मुलांना योग्य ते मार्गदर्शन करून आपण हे कसं शक्य करू शकतो याचे मार्गदर्शन करा. मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण करा. मुलांचा स्क्रीन टाईम आपोआप कमी होईल असे रूपाली सांगतात.

आता तुम्हीच सांगा आहे की नाही ही वाघ फॅमिली एक आयडियल स्पोर्ट फॅमिली?

 

Web Title: Pune family and inspirational story of 230 kilometer pune to Pandharpur cycle wari, fitness and passion journey-cycle expedition.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.