Join us  

झोपेत मुलांच्या नाकातून, छातीतून घरघर आवाज येतो, खूप शिंका येतात? डॉक्टर सांगतात, याची कारणं आणि उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2023 6:25 PM

Reason and Remedy for nasal Blockage in Infants : पालकांनी घाबरुन न जाता काय करायला हवं याविषयी बालरोगतज्ज्ञ डॉ. पार्थ सोनी एक अतिशय सोपा उपाय सांगतात.

लहान मुलं झोपली की अनेकदा त्यांच्या नाकातून किंवा छातीतून खडखड नाहीतर घरघर आवाज येतो. अशावेळी मुलांना सर्दी झाल्याने श्वास घ्यायला त्रास होत असावा असे आपल्याला वाटते. मूल जम्नाला आल्यापासून ते अगदी वर्षाचे होईपर्यंत ही समस्या उद्भवू शकते. हा आवाज जास्त प्रमाणात येत असेल तर मात्र आपल्याला घाबरुन जायला होते. इतकंच नाही तर काही वेळा मुलांना एकामागे एक खूप शिंका येतात. एकाएकी इतक्या शिंका का येतात असा प्रश्न आपल्याला पडतो. दूध पिताना मुलाचा श्वास अडकला की काय, ढेकर अडकला, सर्दी झाली त्यामुळे होत असेल असं आपण समजतो आणि वाट पाहायचे ठरवतो. मात्र हा आवाज जास्त असेल तर आपल्याला काळजी वाटायला लागते आणि आपण बाळाला डॉक्टरांकडे घेऊन जातो (Reason and Remedy for nasal Blockage in Infants). 

झोपेत छातीतून आवाज येण्यामागे नेमके कारण काय? 

(Image : Google)

छातीत अशी घुरघुर होण्यामागे एक महत्त्वाचं कारण असतं आणि ते म्हणजे मुलांच्या नाकाच्या आतला भाग लहान असल्याने त्यांना योग्य पद्धतीने श्वास घेता येत नाही. असा आवाज येत असेल तर पालकांनी घाबरुन न जाता काय करायला हवं याविषयी बालरोगतज्ज्ञ डॉ. पार्थ सोनी एक अतिशय सोपा उपाय सांगतात. फॅन किंवा एसीने नाहीतर हवाबदल झाल्याने मुलांना असं होतं, श्वास कमी पडतो असं काहीबाही आपल्याला वाटतं. मात्र तसं नसून त्यामागे नाकाच्या आतले हाड मोठे असणे आणि नाकात श्वास घेण्यासाठी पुरेशी जागा नसणे हेच महत्त्वाचे कारण असते हे लक्षात घ्यायला हवे. 

यावर उपाय काय?

लहान मुलांसाठी मेडीकलमध्ये जे सलाईन ड्रॉप्स मिळतात ते दोन्ही नाकपुडीत २-२ थेंब घालणे हा त्यावरील उत्तम उपाय आहे. हे ड्रॉप्स नाकात आणि तोंडात गेल्याने मुलांना काहीही त्रास होत नाही. अनेकदा मुलं हे ड्रॉप्स टाकताना खूप रडतात, हातपाय आपटतात.

पण पालकांपैकी एकाने मुलाला पकडून दुसऱ्याने ड्रॉप्स टाकण्याशिवाय पर्याय नसतो. नाकात गुदगुल्या होत असल्याने मुलं असं करतात, पण त्यांना नीट श्वास घेता यावा यासाठी हे फायद्याचं असल्याने हे ड्रॉप्स आवर्जून घालायला हवेत. इतकेच नाही तर यानंतर कापसाचा एक तुकडा घेऊन त्याचा हातावर फिरवून बारीक नळीसारखे करावे आणि ते नाकात घालून नाकपुड्यांतील घाण काढण्याचा प्रयत्न करावा. याशिवाय बाजारात आजकाल म्युकस सकर मिळतो त्यानेही आपण नाकातली घाण सहज काढू शकतो. हे सगळे बाळाला स्तनपान करण्याच्या आधी करावे ज्यामुळे बाळाला श्वास घेणे सोपे होते.     

टॅग्स :पालकत्वआरोग्यलहान मुलंहेल्थ टिप्स