लहान मुलांना कसले आलेत ताण असं आपल्याला वाटत असलं तरी त्यांना त्यांच्या स्तरावर वेगवेगळ्या प्रकारच्या ताणांना सामोरे जावे लागतेच. वय कितीही लहान असलं तरी प्रत्येकाचा आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर झगडा सुरूच असतो. लहान मुलांना असणारे ताण काहीवेळा आपल्याला जाणवत नाहीत पण ते अनेकदा त्यामध्ये अडकले जातात. बरेचदा या लहानग्यांच्या मनात एकप्रकारची भितीही घर करुन असते. हे ताण आणि भिती दिर्घकाळ राहीली तर मुलांच्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीने ती अजिबात चांगली नसते. पण यामागे नेमके काय कारण आहे त्याचा शोध घेऊन आपण ही भिती काही प्रमाणात तरी कमी करु शकतो का याचा पालक म्हणून आपण विचार करायला हवा (Reason Behind child tress and anxiety).
मुलांच्या मनातील ताण आणि भितीचे मुख्य कारण पालक असतात. आता असे कसे तर आपल्या मनात असणाऱ्या विविध प्रकारच्या शंका किंवा ताणांचा मुलांवर थेट परीणाम होत असतो आणि त्यामुळे मुलांवर हा ताण प्रतिबिंबीत होतो. आपल्या मुलांकडून आपल्या काही अपेक्षा असतात. आणि नकळत या अपेक्षा मुलांवर लादल्या जातात. आपल्या मनात एखाद्या गोष्टीविषयी असलेली भिती आपल्याही नकळत मुलांच्या मनात जाते आणि मग मुलं अस्थिर किंवा ताणात असल्याचे आपल्याला जाणवायला लागते. आपल्या अपेक्षा मुलांवर लादल्याने आणि त्यांच्याकडून प्रमाणापेक्षा जास्त अपेक्षा ठेवल्याने नकळत मुलांवर एकप्रकारचा ताण येतो.
मुलांची त्यांच्या वयाच्या इतर मुलांशी तुलना करणे, आपल्याला हवी असलेली एखादी गोष्ट त्यांना करायला लावणे असे पालकांकडून होते. पालक म्हणून आपली अपेक्षा असणे ठिक आहे पण यांसारख्या गोष्टी मुलांसाठी बऱ्याच प्रमाणात ताण वाढवणाऱ्या किंवा मनात भिती निर्माण करणाऱ्या असू शकतात. आपल्या अपेक्षा आणि मुलांच्या अपेक्षा यांमध्ये असलेली तफावत यांमुळे मुलांच्या मनात एकप्रकारचा गोंधळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपली मुलं लहान वयापासून तणावात नको असे वाटत असेल तर पालकांनी आपल्या ताणाचे आणि अपेक्षांचे योग्य पद्धतीने नियोजन करायला हवे.