सबा खान (मुख्याध्यापक, इस्पॅलिअर स्कूल)
आपल्या मुलांना मर्यादित स्वातंत्र्य देणं हे वाईट नसतं! असा विचार तुम्ही कधी केलाय का? या जगातल्या सर्व गोष्टींना काहीएक मर्यदा आहेत. आपल्याला आखून दिलेल्या मर्यादेबाहेर निसर्गही जात नाही. म्हणूनच तर सगळं नीट व्यवस्थित घडतं. दुसऱ्या कुणाच्याही मार्गात, कामात अडथळा न आणता अत्यंत सुगमपणे गोष्टी घडतात. उदाहरणार्थ पाहा, समुद्राला उधाण येतं; पण तो कधी आपला किनारा सोडून वेडावाकडा उधाणतो का? नेहमी नाहीच; पण जेव्हा केव्हा असं भयंकर उधाण येतं तेव्हा आपण त्याला त्सुनामी म्हणतो. त्या प्रचंड पुरांत आणि लाटांच्या तडाख्यात सगळं उद्धवस्त होऊन जातं. तेच जंगलांचंही. जंगलातलं वन्यजीवांचं जग सुरळीत सुरू असतं. माणसं आणि प्राणी आपापल्या वाटून घेतलेल्या परिसरात राहतात. आपापल्या सीमा त्यांनी जणू आखून घेतलेल्या असतात; पण त्या सीमा दोघांपैकी एकानेही तोडल्या की, प्राण्यांसह माणसांचा जीवही धोक्यात येतो. त्यामुळे मर्यादांचा, सीमांचा विचार कायम नकारात्मक करायची गरज नसते. उलट मर्यादा हा जगण्यातला एक निर्णायक-आधारभूत पाया असतो.
मारिया माँटेसरींचे उदाहरण कायम दिले जाते. त्या नेहमी सांगत की, मुलांसाठी स्वातंत्र्य अत्यंत महत्त्वाचं असतं. ते खरंच आहे; पण स्वातंत्र्याची ही परिभाषाच काही पालक चुकीच्या अर्थानं उचलतात. अनेक पालकांना वाटतं की, मुलांना स्वातंत्र्य देणं म्हणजे ‘लेटिंग चिल्ड्रन गो!’ म्हणजे काय तर मुलांना जे हवं ते, वाट्टेल ते करू देणं, वाट्टेल तसं वागू देणं. असं करणं म्हणजे मुलांना स्वातंत्र्य देणं असं त्यांना वाटतं; पण माँटेसरी मुलांच्या स्वातंत्र्याबद्दल जे बोलतात त्याचा संदर्भ वेगळा आहे. मुलांना स्वातंत्र्य हे पर्यायांसह द्यायला हवं. त्यांना पर्याय दिले की, त्यातून त्यांची निर्णय घेण्याची क्षमता तयार होते आणि स्व-नियम अर्थात सेल्फ कंट्रोलही ते शिकतात. त्यांचं म्हणणं अगदी स्पष्ट होतं की, मुलं जे त्यांच्या इच्छेनं किंवा अत्यंत आवेगाच्या भरात, इम्प्लसिव्हिटीने जे करतात ते करू देणं म्हणजे स्वातंत्र्य नव्हे.
त्यामुळे मुलांचं स्वातंत्र्य, त्यांना मोकळं सोडणं किंवा त्यांना पंख देत आकाशभरारी घेण्यासाठी ताकद देणं म्हणजे त्यांना वाट्टेल ते करण्याची मुभा देणं असं नव्हे. त्यांच्या मनात येईल तसं ते वागतील, काहीही करतील म्हणजे स्वातंत्र्य नव्हे. पालकांची एक गैरसमजूत दिसते की, मुलांना मर्यादा न सांगता, त्यांना वाट्टेल ते, वाट्टेल तसे करू देणं म्हणजे उत्तम पालकत्व; पण हे खरं नाही, मुलांना पुरेशी मोकळीक असणं, त्यांना स्वातंत्र्य देणं म्हणजे याचा अर्थ असा मुळीच नाही की, मुलांना आपण शिस्तीच्या काही मर्यादाच सांगू नयेत, त्यांना त्यांच्या सीमाच माहिती नसाव्यात. मुलांना त्यांच्या मर्यादा माहितीच हव्यात. त्यांना त्यांच्यासाठीचे ‘डूज ॲण्ड डोण्ट्स’-काय करावे आणि काय मुळीच करू नये हे अत्यंत स्पष्ट असावे, ते पालकांनी अत्यंत स्पष्टपणा सांगायलाही हवे. कारण ज्याक्षणी त्यांना वाटतं की आपल्यावर कुठलेच निर्बंध नाही, शिस्त नाही, नियम नाही, आपण वाट्टेल ते करू शकतो, असं स्वातंत्र्य आहे त्याक्षणी त्यांच्या मनावर सत्ता राज्य करू लागते. आणि अतिरेकाचा परिणाम हा भविष्यातल्या संकटांची चाहूल असते. मुलं इम्पलसिव्ह असतात, भावनेच्या भरात अनेक गोष्टी करतात. भावना नियंत्रणासह वर्तन नियंत्रणासाठीचं प्रशिक्षण नसेल तर वाटलं म्हणून अनेक गोष्टी करून टाकल्या हे तर संकटाला आमंत्रण ठरते.
काय करता येईल?
मुद्दा काय तर, मुलांना पुरेसे स्वातंत्र्य द्यायलाच हवे. मुलांना काचतिल इतक्या कठोर अनाठायी नियमांच्या बेड्याही त्यांच्या पायात घालू नये. मुलं प्रयोग करून पाहतील, शिकतील आपल्या मनानं अनेक गोष्टी करू शकतील अशी मोकळीक, मुभा आणि स्वातंत्र्य मुलांना द्यायलाच हवं;
पण स्वातंत्र्यासोबत जबाबदारी येते. पर्याय निवडीची निर्णयक्षमता येते.
हे दोन्ही मुलांना शिकवले पाहिजे, सांगितले पाहिजे.
विशिष्ट मर्यादेतलं स्वातंत्र्य मुलांना सुरक्षितताही देतं. त्या सुरक्षिततेत ते नव्या संधी शोधतात, नव्या गोष्टी करून पाहतात.
समतोल-बॅलन्स हे जगण्याचे मूळ तत्त्व आहे. अतिरेक कशाचाही वाईट.
कुठल्याही गोष्टीने आपली मर्यादा ओलांडली की, ते त्रासदायक ठरू शकते. एक्सेस इज टॉक्सिक. अती तेथे मातीच. मग ते काहीही असो मुलांसाठी पालकांचं अतिरेकी प्रेम असो की अतिरेकी शिस्त, अतिरेकी निर्बंध असो की अतिस्वातंत्र्य. पालकांनी हा बॅलन्स शिकून घेतला पाहिजे. समतोल राखला पाहिजे.
यिन ॲण्ड यांग या चिनी तत्त्वज्ञानाच्या धारणेनुसार पालकत्वाचाही आईबाबांनी परस्पर पूरक समतोल साधला पाहिजे. आनंददायी पालकत्वाचं हेच सूत्र आहे. त्याच आनंदादायी आणि सम्यक पालकत्वाचा आपण मनापासून स्वीकार करू, समतोल साधू!
espaliersaba@gmail.com